अंजनेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंजनेरी
Anjanerikilla.jpg
अंजनेरी गड
नाव अंजनेरी
उंची ४,२०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव अंजनेरी
डोंगररांग त्र्यंबकेश्वर
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायर्‍यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते.

इतिहास[संपादन]

अंजनेरी किल्ला जनमानसात परिचित आहे तो हनुमान-जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला 'अंजनेरी' नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. येथे १०८ जैन लेणी आहेत.

गडावरील ठिकाणे[संपादन]

अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायऱ्याच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय आहेत. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. त्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावरुन वेतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा आहे. पठारावर एक तलाव आहे.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी फाट्यावर उतरावे. या फाट्यापसून १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी या गावात पोहोचावे. गावातून नवरा - नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो.

मुळेगावचा रस्ता ही पायी चालणार्‍यांसाठी चांगली पायवाट आहे. ह्या वाटेने आल्यास विशेष मजा येते. उतरताना तेथेच येण्यासाठी बुधली या अवघड मार्गाचा वापर केल्यास लवकर खाली पोचता येते. परंतु धाडसी माणसांनीच या मार्गाचा अवलंब करावा.

अंजनेरीच्या डोंगरावरील दुर्मीळ वनस्पती[संपादन]

जुई पेठे या वन विभागाच्या सहकार्याने अंजनेरी प्रकल्पावर काम करीत आहेत. अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले. त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात. ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही दुर्मीळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही ती अंजनेरी डोंगरावर आहे.

ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशा काही वनस्पती अंजनेरी डोंगरावर अद्यापि तग धरून आहेत. काळ्या कातळात अतिशय कमी मातीचा थर असतो. या परिस्थितीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती वाढतात. त्यात कीटकभक्षी वनस्पतीही आहेत.

एखाद्या दुर्मीळ वनस्पतीचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका केवढे दुष्परिणाम घडवून आणू शकतो, यावर तिच्या संवर्धनाच्या कामाची निश्चिती होते. त्यासाठी ‘आययूसीएन’ (International Union for Conservation of Nature and Natural Resources) या आंतरराष्ट्रीय संस्थेने मानके निश्चित केली आहेत. त्याकरता संबंधित वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सिद्ध करावे लागते. अंजनेरी प्रकल्पात जुई पेठे यांनी त्या मानकांनुसार अभ्यास केला. परिसरातील आठ दुर्मीळ वनस्पतींना या संस्थेने आधीच त्या गटात स्थान दिले आहे. या अभ्यासामुळे ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही अतिशय दुर्मीळ वनस्पती या गटात समाविष्ट करून घेण्याच्या त्यांच्या प्रयत्‍नांना यश मिळाले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]