संताजी घोरपडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संताजी घोरपडे ( - १८ जून १६९७) हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापतीपदावर होते

धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देउन मराठा साम्राज्य तगवून धरले होते.

संताजीने लढलेल्या काही लढाया[संपादन]

जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजीत आणि राजारामराजांत वाद निर्माण झाला. संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासीमखान जिंजीकडे चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासीम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरमनजीक कावेरीपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणि खान कांचीपुरमला पळून गेला, तिथे त्याने देवळांचा आश्रय घेतला आणि धोका मिटेपर्यंत तिथेच लपून बसला.

याच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केली आणि ते याचप्पा नायका संगे मोगलांविरोधात लढू लागले. राजारामने संताजीससुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवांकडे देण्यात आले. सेनापतिपद गेले तरी संताजीने मोगलांविरोधातला लढा चालूच ठेवला. तो मोगलांना वतनासाठी किंवा कुठच्या पदासाठी जाऊन मिळाला नाही. १६९५च्या जानेवारी महिन्यात संताजीने कर्नाटकातून मुसंडी मारली ती थेट बऱ्हाणपुरात. मोगली सुभेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या २००० सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बऱ्हाणपूर सोडून पळून गेला. मराठ्यांनी बऱ्हाणपूर लूटले. ही बातमी जेव्हा औरंगजेबास कळली तेव्हा त्याने बऱ्हाणपूरच्या सुभेदारास बांगड्यांचा आहेर पाठवला. नंतर संताजीने सुरत लुटण्याचा बेत आखला होता, पण शेवटी तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजीबरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसला नाही आणि तो परत खटाव प्रांतात आला. तिथे त्याने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पळून गेले, अनेक सरदार कैद झाले.

संताजीच्या कारकिर्दीतले दोन मोठे विजय म्हणजे दोड्डेरीची लढाई आणि दुसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासीमखानाबरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक नामवंत सरदार पाठवले होते. कासीमखानाबरोबर सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि कामबक्षचेसुद्धा सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होता. त्याला गुप्तहेराकडून बित्तंबातमी मिळत होती. कासीमखानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजीने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासीमखानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतवण्यासाठी कासीमखानने आपले बरेच सैन्य खानाजाद खानाबरोबर तिथे पाठवून दिले. संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली. आता कासीमखानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पुरी वाताहत करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोड्डेरीच्या गढीचा आश्रय घेतला. संताजीने या गढीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोड्डेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासीम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले. कासीमखान आणि त्याचे सरदार दोरखंड लावून एक रात्री सेनेला संताजीच्या तोंडी देऊन किल्ल्यात निघून गेले. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली. खानाचे सैन्य उपाशी मरू लागले. शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवदानाची याचना केली. संताजीने मोगलांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडडणी घेतली. ही नामुष्की सहन न होऊन कासीमखानाने विष पिऊन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकारांनी दिले आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.