चावंड
चावंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे. या तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर (कुकड मावळ) असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे. चावंड हा किल्ला स्थानिक महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता.
चावंड किल्ला - परंपरागत नाव
चामुंडगिरी - यादवकालीन नाव
चाऊंड/चुंडगड - बहमणी साम्राज्यातील नाव
जोंड - निजामशाही आमदानातील नाव
प्रसन्नगड - शिवकाळातील नाव
किल्ले चावंड - पेशवेकालीन नाव
किल्ले चावंड / प्रसन्नगड | |
किल्ले चावंड | |
नाव | किल्ले चावंड / प्रसन्नगड |
उंची | ३४०० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | चावंड, कुकडेश्वर, माणकेश्वर |
डोंगररांग | नाणेघाट |
सध्याची अवस्था | बरी |
स्थापना | {{{स्थापना}}} |
माहिती
[संपादन]चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥
गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥
जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे.
1)जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन.
२) जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन.
३) जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन.
चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेव कोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेष आणि राजमार्ग यांचा अभ्यास केला असता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून किल्ल्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौलिक लोकसाहित्यात नक्की सापडेल.
चामुंडा हे देवीचे क्रूर रूप. या रूपात सर्व काही भयानक, अमंगल. ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली. स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड. ध्वजावर अग्रीपुराणाप्रमाणे चार हात. शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे.
सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ - देवी भागवत
इतिहास
[संपादन]१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले. बहनमी राजघराण्याच्या एकनिष्ठ असलेल्या राजप्रतिनिधीकडून किंवा त्या प्रांताच्या फौजदाराला न जुमानणाऱ्या मराठी सरदाराकडून मलिक नायबचा मुलगा मलिक अहमद(निझामशाही संस्थापक) याने किल्ला जिंकला.
२)मूर्तिजा निझामशहा कारकिर्दीत (इ.स.1565-1588) त्याचा वजीर (मुख्यप्रधान) खानेखानान मौलाना हसन तब्रीजी याला या किल्ल्यावरील कैदखान्यात ठेवण्यात आले होते. पुढे चंगीजखानाच्या मध्यस्तीने त्याची सुटका करण्यात आली. मूर्तिजा निझामशहा याचा आणखी एक वजीर असदखान हा सुद्धा काही वर्षे या किल्ल्यावर कैद होता.
3)दुसरा बुऱ्हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.इ.स.1594-1594 मध्ये निझामशाहीतील सुप्रसिद्ध चांदबीबी आणि इब्राहिम निझामशहाचा अवघ्या एक वर्षचा मुलगा येथे कैद होता. पुढे त्याची वजीर मिया मंजू ने सुटका केली.
4)निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले.
5)निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकुम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला.
6)अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली.
7)इ.स.1636 मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
8)इ.स.1672-1673 मध्ये पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.
9) मुघल बादशहा औरंगजेब जेव्हा स्वराज्य काबीज करण्यासाठी दक्षिणेत तेव्हा त्याच्या फौजने हा किल्ला जिंकून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जुन्नर प्रांतातील किल्ले जिंकण्यासाठी बादशहाने मोठया सरदारांसोबत मोठी फौज पाठवली. मावळ्यांनी अतिशय चिकाटीने झुंज दिली.सन 1694 मध्ये औरंगाजेब ने सुरतसिंग गौड याला किल्ल्याचे किल्लेदार नेमले पण तो तेथे येण्यापूर्वीच मराठ्यानीं किल्ला जिंकला.नंतर लगेचच गजीउद्दीन बहादूर याने किल्ला काबीज केला.पुढे पेशवे काळापर्यंत किल्ला मुघलांच्या ताब्यात होता.
10) 8 जानेवारी 1695 मध्ये गाजिउद्दीन बहादूर याने चावंड किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्या सोन्याच्या किल्ल्या औरंगजेबच्या नजरेखालून गेल्या.
11)10 ऑगस्ट 1749 रोजी चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते यांच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडलेली आहे. यात भांडी,घरगुती वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे.
12)पेशवाईत देखील हा किल्ला राजकैदी यांच्यासाठी होता. पेशवे माधवराव यांच्या काळात हा किल्ला कैदीसाठी होता. तसेच नाना फडणीस यांनी येथे दुसऱ्या बाजीरावास काही काळ कैद ठेवले होते.
13) 1 मे 1818ला किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार यांनी इंग्रजांविरुद्ध किल्ला लढवत आपल्या प्राणाची आहुती दिली.
14) 1 मे 1818 - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात 2 मे रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला.
15) तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात 1 डिव्हिजन इंग्रजांनी जुन्नर प्रांत जिंकण्यासाठी पाठवली होती. त्यापैकी 2 ब्रिगेड ह्या किल्ले चावंड, किल्ले जीवधन आणि नाणेघाट जिंकण्यास पाठवले होते. 2 मे 1818 रोजी इंग्रजांनी किल्ला पूर्णपणे जिंकला.किल्ल्यावरील सैन्याने दोन दिवस कडवी झुंज दिली.इंग्रजांनी किल्ल्यातील लोकांना शरण येण्यास सांगितले पण मावळे शरण न येता किल्ला लढवत राहिले. किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी मॉर्टर आणि हॉवीतझर यासारख्या 100 तोफांनी वेढा घातला व सुमारे 300 पेक्षा जास्त तोफगोळ्यांनी किल्ल्याच्या तटबंदी वर मारा केला आणि किल्ला जिंकला.
16) या किल्ल्याचा उपयोग राजकैदी यांच्यासाठी होता त्यामुळे किल्ल्यावर महाल तसेच वाडे असणार असे पुरावे किल्ल्यावरील अवशेष यांच्यातून मिळते. परंतु इंग्रजांनी किल्ल्यावरची वास्तूची नासधूस केली.
छायाचित्रे
[संपादन]-
किल्ले चावंड
-
चावंडादेवी
-
मुख्य दरवाजा - कोरलेला गणेश
-
गडावरील मंदिर
गडावरील ठिकाणे
[संपादन]दरवाजातून आत जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा. जवळ जवळ १५ ते २० वास्तू इथे आहेत. जेथे चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्र अशी टाकी आहेत येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी.च्या परिसरात १०-१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत. ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदी असून आग्रेय भाग कडांनी व्यापला आहे. यावरून कळून येतं की गड किती दुर्गम आहे. म्हणूनच बहादूरशाह निजामाला येथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिऱ्याचे दगड गाडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकऱ्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात. येथे रॅपलिंग करून जाता येते.यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कडांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या कि.मी.च्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात. इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाद्या ऋषींचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ कि.मी.चा व्यास असावा. गडाच्या ईशान्येस असणाऱ्या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बऱ्याच दंतकथा ऐकण्यात आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. सातवाहनांचा इतिहास फार भव्य आहे, पण त्यांच्या किल्ल्यांचे अजून संशोधन झाले तरच या भव्य इतिहासावर जास्त प्रकाश पडेल. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, त्यांना भेटायला, तर का आपण जाऊ नये? येथील स्थानिक महादेवकळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो, तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गडावर जाण्याच्या वाटा : गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण १५ पायऱ्या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोटा तोफेची नळी जमिनीत पुरली आहे. साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २ १/२ फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३ १/४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.या पायऱ्या अगदीच छोटा आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरूंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
[संपादन]चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी.च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.
राहण्याची सोयः गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जण. इथे उंदीर त्रास देऊ शकतात. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते.
पाण्याची सोयः गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: १ तास चावंड गावापासून.
संदर्भ
[संपादन]- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर