Jump to content

राजमाची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजमाची
नाव राजमाची
उंची ८३३ मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव लोणावळा,खंडाळा
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {{{स्थापना}}}


राजमाची हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर खोपोलीलोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[]

सर्व्हे ऑफ इंडिया खात्याने काढलेले राजमाचीचे ब्रिटिशकालीन रेखाचित्र

भौगोलिक स्थान

[संपादन]

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर 'उल्हास नदीचे खोरे' म्हणून ओळखला जातो.याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते.याच 'उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे.कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे.या बंदरापासून बोरघाटमार्गेपुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग.जसा नाणेघाट तसा बोरघाट,त्यामुळे या मार्गावरूनही मोठा प्रमाणात वाहतूक चालत असे.या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे.यापैकी सर्वात प्रमुख' किल्ले राजमाची.किल्ल्याचा भौगोलिक दृष्टा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.


इतिहास

[संपादन]

राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणं आहे. यालाच 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात.ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत.ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरुवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोंकणचा दरवाजा'संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.१७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला.त्याने राजमाची किल्ला घेतला.यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.

राजमाचीवर मनरंजनश्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. हे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते. इसवीसन १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले. नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रितील किल्ले वनखात्याच्या ताब्यात दिले. त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे संरक्षित वन तयार झाले. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असावा. त्यांच्या नावाचा शिलालेख सदर तलावाच्या भिंतीत (भिंतीच्या उत्तरेकडील टोकापासून काहि अंतरावर) आहे. सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. मंदिराच्या मागून एक झरा (पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. याप्रकारे, एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे. राजमाचीवरील उढेवाडीच्या विकासासाठी राजमाची रुरल एड अँड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या स्वयंसेवी संस्थेने इसवीसन १९७६ पासून अनेक वर्षे काम केले. वाडीतील मुलांचे शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, रोजगार निर्मिती, झाडांची लागवड, किल्यावरील जलाशयांची साफसफाई करून वाडीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी पुरविणे, अशी विविध कामे सदर संस्थेने केली.त्यामुळे, उढेवाडीच्या विकासाला चालना मिळाली.

राजमाची किल्ला पहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कॅंपिंग साइट सदर संस्थेने उढेवाडीजवळच तयार केली आहे.

उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठा दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे.पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे.या परिसरात याला 'जिजाऊ कुंड 'म्हणतात या कुंडात लोक मोठा श्रद्धेने सूर्यस्नान करतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

लोणावळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येताना वाटेतच गडाच्या वेशीजवळ एक वीरशिल्प व स्मृतीशिळादिसते. जवळच तटबंदीचे व बुरुजांचे अवशेष तसेच गणपति आणि मारुतीचे लहान मंदिर आहे. तेथून पुढे मार्ग श्रीवर्धनगडाला वळसा घालून किल्ल्याच्या माचीवरील 'उधेवाडी' गावात येतो. गावात मारुतीचे मंदिर आहे. गावाच्या उत्तरेस असलेल्या खिडकीच्या वाटेने कोकणात कोंढाणे लेणी कडे उतरता येते. उधेवाडीच्या दक्षिणेस देवराई असून पलिकडे महादेवाचे जूने मंदिर व उदयसागर तलाव आहे. ह्या तलावावर एक शिलालेख असून तलावाशेजारी चुणा मळण्याचा घाणा व दगडी चाक आहे. महादेव मंदिरामागील पठारावर काही स्मृतीशिळा आहेत. पश्चिमे दिशेला कोकण दरवाजाचे अवशेष आहेत. श्रीवर्धन व मनरंजन ह्या दोन्ही दुर्गांच्या मधील खिंडीत भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरापुढे दीपस्तंभ व काही मुर्त्या आहेत. मंदिरा समोरून श्रीवर्धनगडावर तर मंदिरामागून मनरंजनगडावर वाट जाते.
मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. या किल्ल्याला दोन दरवाजे असून दोनहक दरवाजे समोरील तटबंदीमुळे लगेच दिसून येत नाहीत. मनरंजनच्या माथ्यावर छत नसलेली एक वास्तू, एक मोठा तलाव व काही इमारतींचे अवशेष आहेत. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे व तीन चार मोठे बुरुज ह्ता तटात आहेत. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाक, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.
श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.दरवाजाची कमान बऱ्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्यांच्या देवडा आहेत. किल्ल्यावर माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहे. गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदिचा म्हणजेच चिलखती बुरज आहेत. गडाच्या माथ्यावरून लोहगड , तुंग, मोरगिरी , कोरीगड , घनगड, बहिरान पठार , खंडाळा, सोनगिरी, माथेरान , ढाक हा परिसर दिसतो.

श्रीवर्धनगडावरील दक्षिण बुरुज व तेथून दिसणारा कातळदरा धबधबा

गडावर जाण्याच्या वाटा

[संपादन]

पायी लोणावळ्याहून तुंगार्ली मार्गेः लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात पायी जाता येते. ही वाट एकदंर १५ कि.मी लांबीची आहे.वाटेने किल्ल्यावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात.
पायी कर्जतहून कोंदीवडे मार्गेः कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने किंवा गाडीने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट उभ्या चढाची आहे. किल्यावर पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात.
गाडी मार्ग : लोणावळा किंवा खंडाळा येथून कुणेगाव - फणसराई मार्गे गडावर मोठी चारचाकी किंवा दुचाकी गाडीने उधेवाडी ह्या गडाच्या माचीवर वसलेल्या गावात पोहोचता येते. हा मार्ग कच्चा मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे. तसेच ओढ्यांवर पुलही बांधण्यात आलेले आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "पुणे डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्स" (इंग्रजी भाषेत). 2013-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-१०-११ रोजी पाहिले.