Jump to content

"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५५: ओळ ५५:
* संत नामदेव गाथा (कानडे / नगरकर)
* संत नामदेव गाथा (कानडे / नगरकर)
* घास घेई पांडुरंगा (कादंबरी, लेखक -रवींद्र भट)
* घास घेई पांडुरंगा (कादंबरी, लेखक -रवींद्र भट)

==नामदेवांची स्मारके==
* महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव सिंपी म्हणतात.
* पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.
* पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.
* पंजाबमधील घुमान येथे संत नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय होऊ घातले आहे. (२०१६ची बातमी)


==संदर्भ==
==संदर्भ==

०७:२०, १८ मे २०१६ ची आवृत्ती

संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबीब्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.

नामदेव हे ‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.

पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.

संत ज्ञानेश्ववरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्ढा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये ( शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी ) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो.

संत नामदेवांची अभंगगाथा

"लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय थोरपण मिरविसी व्यर्थ। खोटेपणा स्वार्थ कळों आलें॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ। वचन यथार्थ बोल आतां॥" पंढरीचा विठुराया संत नामदेवांच्या कालखंडात म्हणजे १३व्या शतकातही (नामदेवांचा जन्म शके ११९२ म्हणजे सन १२७०मधला ) उभ्या मर्‍हाटी प्रांतातील बहुजन समाजाचे आराध्य दैवत होतेच. त्याची भक्ती आणि स्तुती करणाऱ्या संतांची परंपरा नामदेवांच्या आधी व नंतरही होतीच. पण तरीही नामदेव विठुरायावर आपल्या शब्दशस्त्रांनी प्रहार करत होते. ते वृत्तीने व कृतीनेही बंडखोर होते, हे खरेच, पण त्याहून महत्त्वाचे हे की, ईश्वरावर टीकेचे आसूड ओढल्याने आपण स्वजनांत व हरिभक्तांच्या मेळयात अप्रिय होऊ याची भीती त्यांना नव्हती. नामदेवांचे समकालीन संत ज्ञानेश्वर हेसुद्धा बंडखोरच. पण त्यांचे बंड तत्त्वज्ञानाशी हुज्जत घालणारे. त्यामुळेच साक्षात भगवान श्रीकृणांच्या मुखातून निर्माण झालेल्या व महर्षी व्यासांनी शब्दबद्ध केलेल्या गीतेतील तत्त्वज्ञान केवळ संस्कृत जाणणार्‍या मूठभर समाजापुरते मर्यादित राहू नये, म्हणून त्यांनी गीतेचे निरूपण प्राकृत मराठीत केले व ज्ञानेश्वरीला जन्म दिला. ही बंडखोरीच. पण नामदेवांची बंडखोरी वेगळी होती . त्यांनी विठ्ठलाच्या महतीलाच आव्हान दिले.
"लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय थोरपण मिरविसी व्यर्थ। खोटेपणा स्वार्थ कळों आलें॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ। वचन यथार्थ बोल आतां॥"
"देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण। पाहें हें वचन शोधूनियां॥ नसतां पतित कोण पुसे तूतें। सांदिस पडतें नाम तुझें॥"
साक्षात विठ्ठलाला असे खडसावणार्‍या नामदेवांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची विचारसरणी आणि त्यांच्या रचना यांचा विचार करता त्यांना रुढ अर्थाने ' संत ' म्हणणे हा दांभिकपणा वाटेल. परंतु नामदेवांना ' संतशिरोमणी ' म्हटले गेले व त्यांना ज्ञानेश्वर, एकनाथ व तुकारामाच्या पंगतीत बसवण्यात आले, कारण त्यांची ईश्वरभक्ती केवळ भावनेपोटी वा भीतीपोटी नव्हे, तर तर्काच्या कसोटीवर तपासून घेतलेली होती. नामदेवांनी विठ्ठलभक्ती शिकवली, त्यांचा विठ्ठल या नावातील दैवी शक्तीवर विश्वासही असावा, पण ज्या भक्तीने अन्य संत व वारकरी यांनी विठ्ठल या देवाची पूजा बांधली आणि त्याच्या समोर शरणागती पत्करली, तसे करणे नामदेवांना मान्य नसावे. त्यामुळेच "पतितपावन नाम ऐकुनी आलों मी द्वारां। पतिपावन नव्हेसी म्हणुनी जातों माघारा॥"' या प्रसिद्ध अभंगाच्या अखेरच्या चरणात ते "नामा म्हणे देवा तुझें न लगे मज कांही"', हे सुद्धा स्पष्ट करतात. नामदेवांचे बंड केवळ त्यांच्या रचनांमध्ये नाही, तर त्यांच्या वर्तणुकीतूनही वारंवार दिसत राहते. संत ज्ञानेश्वरांचे ते समकालीन. त्यांनी एकत्र प्रवासही केला. ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर नामदेव पुढे ५४ वर्षे जगले. या काळात त्यांनी खचून न जाता पंजाबपर्यंत प्रवास केला व तिथे पंजाबी भाषा शिकून गुरु"खीत रचना केल्या. शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथसाहेबात नामदेवांच्या ६२ रचनांचा समावेश असल्याचे पाहायला मिळते . ही नामदेवांची एक प्रकारची बंडखोरीच . नामदेव उत्तरेचा प्रवास करत होते, तेव्हा यवनांच्या आक्रमणांचा दररोज धोका होता. त्यांच्यासाठी हा नवखा प्रांत होता. मात्र तरीही न डगमगता त्यांनी मार्गक्रमणा केली व आपले ईप्सित कार्य संपवल्यावर ते पुन्हा महाराष्ट्रातही आले. हा पराक्रम करणे एखाद्या बंडखोरालाच शक्य होते.

देवाचे देवपण हे मनुष्याच्या दुबळेपणात, त्याच्या व्याधींमध्ये आणि त्याच्यावर कोसळणाऱ्या संकटांमुळे भयग्रस्त होणार्‍या त्याच्या मनात आहे, असा सिद्धान्त नामदेवांनी मांडला .
" रोग व्याधि पीडा जनांसी नसती। तरि कोण पुसती वैद्यालागी॥ ... नामा म्हणे विठो दैवें आलों घरा। नको लावूं दारा आम्हालागीं॥"
या अभंगात नामदेवांनी हाच सिद्धान्त मांडला आहे. माणसे माणसांवर चिडतात; त्यांच्याशी भांडणे उकरून काढतात; त्यांना बोल लावतात, पण देवाच्या बाबतीत असे कोणी करत नाही. आपल्या बाबतीत काही वाईट घडले, तरी त्याला कारण आपणच, मात्र चांगले झाले, तर ते देवाचे उपकार, असे मानण्याची प्रवृत्ती असते. नामदेव मात्र त्यातले नाहीत. त्यांचे विठ्ठलावर निस्सीम प्रेम तर आहेच, पण वेळ प्रसंगी ते देवालाही शेलक्या भाषेत दूषणे देण्यास मागे - पुढे पाहात नाहीत. प्रसंगी रस्त्यावरच्या भांडणांप्रमाणे हमरी - तुमरीवरही येतात. एका अभंगात ते चिडून देवाला म्हणतात,
"मुळीच मी जाणें तुझा ठेंगेपणा। काय नारायणा बोलशील॥ पुरे पुरे आता तुमचे आचार। मजशीं वेव्हार घालूं नको॥ लालुचाईंसाठीं मागे भाजीपाना। लाज नारायणा तुज नाहीं॥ नामा म्हणे काय सांगों तुझी कीर्ती। वा उगी फजिती करूं तुज॥"

नामदेवांचा जन्म पंढरपुरातलाच. त्यामुळे बालवयापासून तिथल्या विठ्ठलाशी त्यांची सलगी. कदाचित त्यामुळेच नामदेवांनी आपल्या रचनांत असे स्वातंत्र्य घेतले असेल का? पण इतर वेळी देवावर अतोनात प्रेम करणारे नामदेव जेव्हा त्याच्यावर चिडतात, त्याला कारणेही तशीच असावीत. कुठे काही अन्याय झालेला त्यांना दिसला आणि भगवंतांनी काहीच केले नाही, असे त्यांना वाटले की, नामदेवांची बंडखोर वृत्ती उफाळून यायची. दक्षिण मावळ प्रांतात पाण्याचे दुर्भिक्ष झाले, तेव्हा नामदेव चिडले. त्यांनी लिहिले,
" काय तुज देवा आले थोरपण। दाविशी कृपण उणें पुरें॥ पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी। गोकुळाभीतरीं खेळ मांडी॥ हलाहल शांत करी तत्क्षण। अमृतजीवन नाम तुझें॥ तुझें नाम सर्व सदा गोपाळासी। नामा म्हणे यासी काय जालें॥"'

दुष्काळ संपेना आणि माणसांचे कष्टसुद्धा वाढतच चालले, तेव्हा नामदेव आणखी चिडले. कमरेवर हात ठेवून शांतपणे उभा राहिलेला विठुराया आता त्यांना चीड आणत होता. नामदेव त्या निर्गुणपणाच्या मूर्तीकडे पाहात लिहितात,
" निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना। तुज नारायणा सोडी ना मी॥ काय तुझी भीड धरावी म्यां आतां। कृपाळू अनंता म्हणें ना मीं॥" नामदेवांचा राग असा होता. "कल्पतरुतळीं बैसलिया। कल्पिलें फळ न पाविजे॥ कामधेनु जरी दुभती। तरी उपवासी कां मरावें॥ उगे असा उगे असा। होणार ते होय जाणार तें जाय॥ नामा म्हणे केशवा काय तुझी भीड। संता महंतां देखतां सांगेन तुझी खोड॥"
हातात एकतारी आणि चिपळ्या घेऊन फिरतानाचे नामदेवांचे चित्र आपण नेहमीच पाहतो. पण या शांत दिसणार्‍या चेहऱ्याच्या आड एक बंडखोर दडला आहे, हे कोणास कसे कळावे? नामदेवांच्या साक्षात्‌ भगवंतांविरुद्धच्या सततच्या बंडाचे कारण तरी काय असावे? ते जन्माने शिंपी. म्हणजेच ब्राह्मण व तत्सम तत्कालीन उच्च व विद्याविभूषित समाजापेक्षा वेगळे. त्यांनी वेद-विद्येचे पाठ केले नाहीत, पण त्यांना समाजातील पीडितांची दुःखे ठाऊक होती. ईश्वरावर अंधश्रद्धा असणार्‍यांची लुबाडणूक आणि फसवणूक पंढरपुरातलेच बडवे करत असल्याचे त्यांनी पाहिले होते. अशा अंधश्रद्धेपासून जनतेला दूर करून त्यांना कर्मयोगाच्या मार्गाला लावण्याचा अंतस्थ हेतू नामदेवांच्या रचनांतील बंडखोरीत असावा. केशवसुतांनी "देव दानवा नरें निर्मिलें , हे मत लोका कळवूं द्या" असे लिहिले. नामदेव हे त्यांचेच पूर्वज असावेत. कारण त्यांनी केशवालाच लबाड म्हटले. "साचपण ब्रीद सोडवीन तुझ्या। आता केशिराजा पण हाचि॥ लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय मूर्खपणें सांगशिल गोष्टी। थोरपणें मोठीं पुरे आतां॥ नामा म्हणे काय खवळिसि आम्हां। लाज नाहीं तुम्हा कवणेविसीं॥" अशा बंडखोरीच्या रचना करतानाच नामदेव भक्तांना जी एक महत्त्वाची शिकवण देतात, ती कर्मयोगाची आहे . भगवान श्रीकृष्णांनी गीतेत अर्जुनाला कर्मयोगाची शिकवण दिली. तीच पुढे लोकमान्य टिळकांना भावली व त्यांनी गीतारहस्य म्हणजेच कर्मयोगशास्त्र विशद केले. नामदेव ज्ञानेश्वरांच्या संगतीत राहिले. त्यांनी नेमके हेच सांगितले.
"मीच माझा देव मीच माझा भक्त। मी माझा कृतार्थ सहज असे॥ बंध आणि मोक्ष मायेची कल्पना। पडली होती मना भ्रंती कैसी॥ विठ्ठले विचारें दाखविलें सुख। होते जे अशंख हरपले॥ नामा म्हणे सोय सांपडली निकी। जालो येकायेकी हरिचा दास॥"
हे मंथन करताना नामदेवांमधला बंडखोर शस्त्रे खाली टाकतो आणि तो देवाचरणी लीन होतो. त्यांची महती हीच आहे. नामदेवांच्या बंडाच्या कथा श्रवण केल्यानंतर हा अभंग अंतर्मुख करायला लावणारा आहे. नामदेवांची थोरवी आणि वैचारिक प्रगल्भता त्यातच आहे . याच भावातील एक अभंग असाः
"कांसवीची पिलीं राहती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय॥ जैसा जवळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥ तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥ नामा म्हणे सलगीनें करितों मी निकट । झणें मज वैकुंठ पद देसी ॥"

नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य

  • नामदेवांची गाथा (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन -एकूण २३३७ अभंग)
  • आद्य मराठी आत्मचरित्रकार-संत नामदेव (डॉ.सौ. सुहासिनी इर्लेकर)
  • श्री नामदेव : चरित्र, काव्य आणि कार्य (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
  • श्री नामदेव चरित्र (वि.स. सुखटणकर गुरुजी-आळंदी)
  • श्री संत नामदेव महाराज चरित्र (प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत)
  • श्री संत चांगदेव महाराज चरित्र (शैलजा वसेकर)
  • श्री नामदेव चरित्र ग्रंथ तत्त्वज्ञान (शंकर वामन दांडेकर)
  • श्री नामदेव चरित्र (वि.ग. कानिटकर) (सरकारी प्रकाशन)
  • नामदेव गाथा (संपादक : नानामहाराज साखरे)
  • नामदेव गाथा (संपादक: ह.श्री. शेणोलीकर)
  • संत नामदेव गाथा (कानडे / नगरकर)
  • घास घेई पांडुरंगा (कादंबरी, लेखक -रवींद्र भट)

नामदेवांची स्मारके

  • महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव सिंपी म्हणतात.
  • पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.
  • पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.
  • पंजाबमधील घुमान येथे संत नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय होऊ घातले आहे. (२०१६ची बातमी)

संदर्भ

बाह्य दुवे