वेणाबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेणा बाईंनी विष पचवून दाखवले

वेणाबाई (अंदाजे इ.स. १६२७-२८ - चैत्र वद्य चतुर्दशी शके १६००, इ.स.१६७८ (समाधी )) या मराठी संत होत्या.

बालपण[संपादन]

१६ व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी वेगळ्याच हेतूने आपले कार्य सुरू केले होते. सर्व समाज त्यांना संघटित करावयाचा होता. धर्मसंघटनेची उभारणी त्यांनी सुरू केली त्यावेळी मिरजेला त्यांची वेणाबाईंशी पहिली भेट झाली. वेणाबाई या ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या बालविधवा होत्या. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे यांच्या वेणाताई मुलगी होत्या. लहान वयातच लग्न होऊन त्या मिरजेला सासरी गेल्या. दुर्दैवाने पतीचे निधन लवकर झाल्याने बालविधवीचे जीवन जगणे त्यांच्या नशिबी आले. त्या काळात विधवा स्त्रीने घरकाम करीत, देवाचे नाव घेत, धर्मग्रंथांचे धार्मिक ग्रंथांचे वाचन करीत आपले जीवन कंठायचे, अशी रीतच होती. समर्थ रामदास स्वामी त्याच्या घरी भिक्षा मागायला आले तेव्हा समर्थांचे त्यांना प्रथम ओझरते दर्शन झाले. काही दिवसांनी रामदास स्वामी पुन्हा त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आले. तेव्हा वेणाबाई तुळशी वृंदावनापाशी एकनाथी भागवत वाचीत होत्या. समर्थांनी विचारले "मुली तुला यातले समजते का काही?” त्यावर वेणाबाईंनी समर्थांना पंचवी प्रश्न विचारले. त्या प्रश्नातून समर्थांना वेनाबाईंची. ही भेट वेणाबाईंच्या जीवनाचा रस्ता बदलणारी ठरली. रामदास स्वामींच्या भेटीचा, बोलण्याचा वेणाबाईंच्या मनावर खूप परिणाम झाला. हेच आपले गुरू आहेत. त्यांच्याकडून उपदेश घ्यावा. त्यांची सेवा करीत जीवन घालवावे. असे त्यांना वाटू लागले. रात्रंदिवस वेणाबाई त्यांचाच विचार करीत देह माझे मन माझे|सर्व नेले गुरुराजे अशी त्यांची अवस्था झाली. वेणाबाईंना कोल्हापूरला पाठवून दिले.[१]

व्यतिगत माहिती[संपादन]

या मूळच्या कोल्हापूर येथील राधिकाबाई आणि गोपजीपंत गोसावी यांच्या कन्या होत्या. विवाहानंतर त्या मिरज येथील देशपांडे यांच्या घरी गेल्या. काही काळातच, वयाच्या बाराव्या वर्षी विधवा झाल्या. तेथेच त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले. नंतर त्या मिरज येथे परत आल्या. समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जन निंदेला सामोरे जावे लागते. समर्थ त्याला अपवाद नव्हते. वेणाबाई, अक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले आणि मठपती बनवले.[२] समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात. तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत. वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात. त्यांचे आई-वडील समार्थांचेच अनुगृहीत होते. तर सासू-सासरे एकनाथ महाराजांचे अनुगृहीत होते. कोल्हापुरातील मंडळींची मजल तर वेणा बाईंना विषप्रयोग करण्यापर्यंत गेली. वेणा बाईंनी विष पचवून दाखवले. निंदकांना पश्चात्ताप झाला. त्यांनी वेणाबाई आणि समर्थांची क्षमा मागितली. प्रारंभी कणखर मनाने जननिंदा सोसणाऱ्या वेणा बाईंनी कोमल अंतःकरणाने सर्वांना क्षमा केली.[३] समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. त्या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला चाफळात ठेवून उत्सवाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात असे. एक वर्ष ही जबाबदारी वेणास्वामींच्यावर सोपविण्यात आली. उत्सवासाठी सगळ्या प्रकारची धान्ये निवडून ठेवणे, लोणची, चटण्या, सांडगे, पापड, मेतकुट या सर्व गोष्टी सिद्ध ठेवणे, समर्थांनी पाठवलेली भिक्षा कोठीघरात व्यवस्थित लावून ठेवणे अशी विविध कामे करावी लागत. ऐन उत्सवाच्या १५ दिवस आधी वेणाबाई आजारी पडल्या.त्या तापाने एवढ्या फणफणल्या की त्यांना चालताही येईना. राम-मंदिरातील खांबाला धरून मोठ्या मुश्किलीने त्यांनी रामाजवळ करून भाकली. वेणाबाईंची ही केविलवाणी अवस्था पाहून चाफळातील राममूर्तीच्या डोळ्यांत अश्रू आले आणि काय आश्चर्य! विठ्ठलाने ज्याप्रमाणे नाना रूपे धारण करून संत जनाबाई, संत एकनाथ, या संतांची सेवा केली त्याप्रमाणे रामचंद्रांनी रामबाईंच्या रूपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली. 'मी बत्तीस शिराळ्याची असून रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठविले आहे'. असे रामाबाईंनी वेणाबाईंना खोटेच सांगितले. समर्थ भिक्षेहून परतल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि रामाबाई ही गुप्त झाल्या. वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे.[४] सीतास्वयंवर वगैरे काही स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. सीतेचे स्वयंवर वेणाबाईंच्या पूर्वी आणि नंतर अनेकांनी वर्णिले आहे, पण वेणाबाईच्या ग्रंथाची योग्यता काही अनोखीच आहे. रामदासस्वामींनी इ.स.१६५६ मध्ये बांधून दिलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे. वेणाबाईंना आदराने वेणास्वामी असे म्हटले जाते .

वेणाबाईंची ग्रंथरचना :[संपादन]

 • उपदेशरहस्य - रामायणी प्रकरण
 • कौल - रामायणी प्रकरण, एकूण २६ श्लोक
 • पंचीकरण - वेदान्तावरील गद्य टिप्पण्या
 • रामगुहकसंवाद किंवा नावेचे श्लोक - रामायणी प्रकरण
 • रामायणाची कांडे : आदि, अयोध्या, अरण्य, किष्किंधा व सुंदरकांड. एकूण दीड हजार श्लोक
 • सिंहासन - रामायणी प्रकरण
 • सीतास्वयंवर - एकूण चौदा समास, ओवीसंख्या १५६८
 • स्फुट - अभंग पदे, वगैरे.[५]

संदर्भ[संपादन]


 1. ^ कर्वे, स्वाती (2014). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २७. ISBN 978-81-7425-310-1.
 2. ^ Webdunia. "भक्तीनिष्ठ 'संत वेणाबाई'". marathi.webdunia.com (इंग्रजी भाषेत). 2019-01-12 रोजी पाहिले.
 3. ^ कर्वे, स्वाती (२०१२). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २७. ISBN 978-81-7425-310-1.
 4. ^ "वेणाबाई की गुरुनिष्ठा". Mahila Utthan Mandal - Sant Shri Asharam Ji Ashram (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-09-28. 2019-01-12 रोजी पाहिले.
 5. ^ Gaikwad, Priyanka. "वेणाबाई |" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-02-12. 2019-01-12 रोजी पाहिले.