Jump to content

नृसिंह सरस्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीनृसिंहसरस्वती या पानावरून पुनर्निर्देशित)
नृसिंह सरस्वती

नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती (इ.स. १३७८-१४५९) हे श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात.[] नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे. परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व नृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन आले आहे. हा ग्रंथ दत्तभक्तांचा 'वेद' मानला जातो. नृसिंह सरस्वतींमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. गुरुचरित्रातील एक कथा पुढीलप्रमाणे-- नृसिंह सरस्वतींनी जन्मतःच ॐकाराचा उच्चार केला. परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे.

वयाच्या आठव्या वर्षी माता-पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्रीकेदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्णसरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्णसरस्वतींनी नरहरीला मठपरंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गांव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले.

त्यानंतर गाणगापुरी ते चोवीस वर्षे राहिले. त्या वेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन (दुसरा) याने त्यांची पूजा केली. आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले.

नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वानी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.

महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे कारंजा , औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली.

नृसिंह सरस्वती इ.स. १३८८ ते १४२१ या काळात तीर्थयात्रेवर गेले. चातुर्मासात औदुंबर गावी (इ. स. १४२१), इ. स. १४२२ ते १४३४ या काळात नरसोबावाडीत व इ. स. १४३५ ते १४५८ या काळात गाणगापूर येथे राहिले. 'गुरुचरित्र' हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होय. याची पारायणे महाराष्ट्रात होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे. नृसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्रनायक आहेत. गुरुचरित्राच्या ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे.

नृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. नृसिंहसरस्वती यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीनवन दिले.

नृसिंह सरस्वतींची शिष्यपरंपरा

[संपादन]
  1. ) माधव सरस्वती
  2. ) बाळसरस्वती
  3. ) कृष्णसरस्वती
  4. ) उपेंद्र माधव सरस्वती
  5. ) सदानंद सरस्वती
  6. ) ज्ञानज्योति सरस्वती
  7. ) सिद्ध सरस्वती

नृसिंह सरस्वती यांची मराठीतील चरित्रे

[संपादन]
  • द्वितीय दत्तावतार श्री नृसिंहसरस्वती (चरित्र, परंपरा, कार्य व गूढे) : लेखक अप्रबुद्ध
  • नृसिंह सरस्वती गाणगापूर यांचे चरित्र (श्रीपादशास्त्री किंजवडेकर)


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "दत्तसंप्रदायातील सत्पुरुष!". १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]