Jump to content

रामचंद्र विष्णु गोडबोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रा.वि.गोडबोले तथा स्वामी स्वरूपानंद (१५ डिसेंबर, १९०३:पावस, महाराष्ट्र - १५ ऑगस्ट, १९७४) हे भारतीय आध्यात्मिक गुरू होते. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस या ट्रस्टतर्फे पावस येथील स्वामी स्वरूपानंदांच्या निवासस्थानाची व समाधी-मंदिराची व्यवस्था पाहिली जाते.

पूर्व जीवन

[संपादन]

स्वामी स्वरूपानंद यांचे मूळ नाव रामचंद्र होते. त्यांना "आप्पा" किंवा "रामभाऊ" या नावाने ओळखत. त्यांच्या वडिलांचे नाव विष्णूपंत गोडबोले आणि आईचे नाव रखमाबाई गोडबोले होते. रामभाऊ (आप्पा) यांचे प्राथमिक शिक्षण पावसमध्ये आणि माध्यमिक शिक्षण रत्‍नागिरी येथे झाले. १९१९ साली त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये प्रवेश केला होता. या शाळेत विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक प्रशिक्षण देण्यात येत असे.

१९२१ साली म.गांधीजींच्या आवाहनाप्रमाणे कॉलेज शिक्षण सोडून १) स्वावलंबन २) राष्ट्रीय शिक्षण 3) सूतकताई ४) स्वदेशी वस्तूंचा अंगिकार या चतुःसूत्रीला अनुसरून पावस येथे राष्ट्रीय शाळा सुरू केली. तेथील मुलांना शिक्षण देऊन ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेले. पुण्यात सर्वश्री दत्तो वामन पोतदार, शंकरराव देव, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्या ते संपर्कात आले.

आध्यात्मिक जीवन

[संपादन]

स्वामी स्वरूपानंदांना नाथसंप्रदायाची दीक्षा लाभलेली होती. त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी गणेशनाथ महाराज ऊर्फ बाबा महाराज वैद्य यांचा अनुग्रह झाला. त्यांनी स्वामींना सोहम-मंत्राची दीक्षा दिली. सोहम साधनेमुळे त्यांच्या देह-मनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले. १९२४ साली आलेले सहा महिन्यांचे आजारपण आणि त्यानंतर आजन्म बाबा देसाई यांच्या घरातील म्हणजे अनंत निवास येथील वास्तव्य यात साधनेची तीव्रता वाढत गेली. स्वामी स्वरूपानंद यांना भगवान विष्णूचा साक्षात्कार झाला होता. त्यांच्याकडे येणाऱ्या साधकांना ते रामकृष्णहरि हा नाममंत्र सांगत असत. १९३४ ते १९७४ या कालावधीत स्वामी अनंत निवासात वास्तव्यास होते.

ग्रंथसंपदा

[संपादन]
 • स्वामी स्वरूपानंदानी ज्ञानेश्वरांच्या भाषेच्या कठीणतेमुळे दुर्बोध झालेल्या सर्व ग्रंथांचे अभंगांच्या स्वरूपात रूपांतर केले आणि ते आकलन सुलभ करून दिले. म्हणून त्यांना प्रति-ज्ञानेश्वर असे संबोधले जाते.

ग्रंथ-रूपांतरे

[संपादन]
 • श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी
 • श्रीमत् अभंग - ज्ञानेश्वरी (संक्षिप्त)
 • श्रीमत् अभंग - ज्ञानेश्वरी (नित्यपाठ)
 • श्रीमत् अभंग अमृतानुभव
 • श्री चांगदेवपासष्टी (अभंगात्मक अनुवाद)
 • श्रीमत् भावार्थ गीता श्री गीता तत्त्वसार
 • श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ

स्वतंत्र रचना

[संपादन]
 • संजीवनी गाथा - (२६१ अभंगाचा संग्रह)
 • अमृतधारा - (आत्म-चरित्रात्मक म्हणता येईल असे दीर्घकाव्य)
 • स्वरूप-पत्र-मंजुषा
 • तीन प्रवचने
 • स्वामी स्वरूपानंद (संक्षिप्त चरित्र)

समाधीवरील वचन

[संपादन]

त्यांच्या मूळ जन्म-घराजवळ त्यांचे भव्य समाधी मंदिर आहे. तेथे त्यांच्या समाधीवर पुढील वचन कोरलेले आहे. ''आजकालचे नव्हेच आम्ही. माउलीनेच आम्हाला इथं पाठविलं. दिलं काम तिच्याच कृपेने पूर्ण झालं.आता आम्हाला नाही कुठं जायचं. इथंच आनंदात रहायचं. आणि आता माउलीनेच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्यस्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच.''

बाह्य दुवा

[संपादन]

स्वामी स्वरूपानंदांवरील साहित्य Archived 2021-12-22 at the Wayback Machine.


स्वामी स्वरूपानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यातील अनुबंध