केशवचैतन्य
केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य) हे संत तुकारामांचे गुरू मानले जातात. त्याचे मूळ नाव विश्वनाथ. जन्म पुनवाडी किंवा पुणेवाडी (पुणे) येथे. पित्याचे नाव नृसिंह आईचे आनंदी. उपनाम राजर्षी किंवा राजऋषी. गिरिजा नामक स्त्रीशी त्याचा विवाह झाला होता. त्याशिवाय त्याच्यावर मोहित झालेल्या झबुन्नीसा आणि रोशन ह्या यवन स्त्रियांचाही त्याने भार्या म्हणून स्वीकार केला होता. पुढे आलेल्या एका आपत्तीत झबुन्निसा आणि रोशन ह्यांना मरण आले व गिरिजेसह तो ओतुरास (जि.पुणे) आला. तेथे राघव चैतन्य ह्या सत्पुरुषाची गाठ पडून विश्वानाथाने त्यांचे शिष्यत्व पतकरले आणि संन्यास घेतला. केशव चैतन्य हे त्याचे संन्यास धर्मातील नाव होय. त्याची समाधी ओतूर येथेच आहे. कृष्णदास बैरागीकृत चैतन्यलीला ह्या अप्रकाशित ग्रंथात केशव चैतन्याने पुढील पाच ग्रंथ लिहिल्याचे म्हणले आहे :भक्तिप्रकाश, वैकुंठपद, वासनामय देह, गीताभागवतसार आणि परमार्थविचार तथापि ते सर्व अनुपलब्ध आहेत. त्याच्या नावावर असलेले एक पद आढळते. त्यात ‘नवविधा भक्ति निरंतर करवावी । केशव चैतन्य शरण तुला रे ।।’ अशी ओळ आहे. तथापि तीत उल्लेखिलेला केशव चैतन्य हाच होय, असे मानण्यास पुरावा नाही. केशव चैतन्याने अनेक अद्भुत चमत्कार केल्याच्या आख्यायिका आहेत. तुकाराम महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य आणि हा एकच होत, असे काही विद्वान मानतात तथापि बाबाजी चैतन्य हा त्याचा शिष्य होता, असे काही विद्वानांनी निदर्शनास आणून दिले आहे.त्यांची समाधी ओतूर येथे असून त्यांचा समाधिकाल सन १५७१ असावा. समाधी स्थानाच्या शेजारी 'मांडवी' नदीचा प्रवाह वाहतो.[१]
गुरुपरंपरा
[संपादन]- वेदव्यास
- राघवचैतन्य
- केशवचैतन्य
तुकारामांना केशवचैतन्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही, तर स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला. याला प्रमाण म्हणून तुकारामांचा खालील अभंग सांगितला जातो.
सदगुरूराये कृपा केली मज । परी नाही घडली सेवा काही ॥धृ॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥१॥
भोजना मागती तूप पावशेर । पडला विसर स्वप्नामाजी ॥२॥
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥३॥
बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्णहरी ॥४॥
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥५॥
संदर्भ
[संपादन]