Jump to content

वासुदेवानंद सरस्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टेंबेस्वामी या पानावरून पुनर्निर्देशित)

वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ वासुदेव गणेश टेंब्ये ऊर्फ टेंबे स्वामी (१३ ऑगस्ट, १८५४[] माणगाव - २४ जून, १९१४[] गरूडेश्वर) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्‍नीच्या मृत्यूनंतर त्यांनी उज्जयिनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते.[]

लहानपण

[संपादन]

श्री क्षेत्र माणगाव (जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) येथे सन १८५४ मध्ये १३ ऑगस्ट (श्रावण वद्य ५ शके १७७६) रोजी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांचा टेंबे कुटुंबात जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी वासुदेवाची मुंज झाली. यानंतर त्रिकाळ स्नानसंध्या. अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन, भिक्षा मागून वैश्वदेव-नैवेद्य करून भोजन, असे नित्य आन्हिक तो करू लागला. याच बरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरू केला. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत, विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. एकात्म आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिक म्हणजे स्वामीमहाराजांचे व्यक्तिमत्व, वाङ्मय, आणि जीवनदृष्टी आहे. श्री स्वामिनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले. या प्रवासात सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन व प्रवचन असा त्यांचा नित्यनेम होता. "निसर्गाकडे चला" असा संदेश त्यांच्या पवित्र तीर्थक्षेत्र, नद्या यांच्या वर्णनावरून अनुभवाला येतो. त्यांनी श्री गरुडेश्वर येथे सन १९१४ साली समाधी घेतली.

ग्रंथ व वाङ्मय

[संपादन]

श्री स्वामी महाराजांचा समाधी शताब्दी सोहळा नुकताच भारतात सर्व ठिकाणी साजरा झाला. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा विश्वशांतीमंत्र जगाला देऊन त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. हे वाङ्मय या काळामधील एक चमत्कारच आहे. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामीमहाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या वाङ्मयावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या प्रांतातील अभ्यासकांनी प्रबंध तयार करून त्या त्या विद्यापीठातून मान्यता मिळवलेली आहे. भौतिक प्रगती बरोबरच शाश्वत चिरंतन मूल्याचा ठेवा आपण प्राणपणाने जपला पाहिजे असे त्यांचे वाङ्मय सांगते.श्री दत्तोपासना ही सांप्रदायिक आचार, सकाम भक्ती अशा मर्यादांमध्ये बंदिस्त झाली होती. श्रीस्वामीमहाराजांनी तिच्यात ज्ञानभक्तीचे, साक्षात्कार साधनेचे, अद्वैत तत्त्वदृष्टीचे अधिष्ठान स्पष्ट केले. त्यांच्या कार्यामुळे आणि वाङ्मयसंपदेमुळे दत्तभक्तीचा मूळ शुद्ध प्रवाह प्रवाहित झाला. ईश्वरीप्रेरणेने सिद्धप्रज्ञेतून स्फुरलेली ही त्यांची वाङ्मयसंपदा म्हणजे आधुनिक काळातील 'ईश्वरी लेणे' आहे. वेद-उपनिषदातील ऋषीमुनीची आठवण करून देणारे श्री स्वामीमहाराजांचे लोकोत्तर व्यक्तिमत्व, त्यांचे लोकसंग्रहात्मक ईश्वरी अवतारकार्य आणि त्यांची दैवी वाङ्मयसंपदा ही भारतीय तत्त्वज्ञान, धर्म आणि संस्कृती यांच्या अभ्यासकांना ध्येयदृष्टी देणारी आहे.

  • श्रीदत्तपुराण
  • समश्लोकीसंहिता व द्विसाह्स्त्री संहिता नावाचे संस्कृत संक्षेप
  • सप्तशती गुरुचरित्रसार
  • दकारादिसहस्त्रनाम
  • सत्यदत्तव्रत
  • करुणात्रिपदी

संस्कृत लेखन

[संपादन]
  • सटीक संस्कृत दत्तपुराण
  • मराठी गुरुचरित्राचा संस्कृत अनुवाद असलेली श्री गुरूसंहिता

मराठी लेखन

[संपादन]
  • श्रीदत्तलीलामृताब्धिसार (इ.स. १९०३)
  • दत्तमाला वर्णांकित माघमाहात्म्य (इ.स. १९०४)
  • श्री दत्त माहात्म्य (इ.स. १९११) (ओवीबद्ध)
  • घोरकष्टोद्धरण स्तोत्र (घोराष्टक स्तोत्र)

वामनराव गुळवणी यांनी टेंब्यांच्या समग्र साहित्याचे बारा खंड इ.स. १९५० साली प्रकाशित केले.

टेंबे स्वामी यांची चरित्रे

[संपादन]
  • टेंबे स्वामी (वि.दा. फरांदे)
  • पीयूषधारा (सुलभा -माई- साठे)
  • वासुदेवानंदसरस्वती (टेंब्ये स्वामी) महाराज यांचे चरित्र आणि कार्य (श्रीपादशास्त्री किंजवडेकर)

टेंबे स्वामी यांच्या विषयीची पुस्तके

[संपादन]
  • टेंबे स्वामींचे दिव्य साक्षात्कार (राम सैंदाणे) प्रस्थान आणि योगी ------विद्याधर भागवत

स्वामींचा अंतिम प्रवास

[संपादन]

दत्तअवतारी प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी वयाच्या ६० व्या वर्षी मंगळवार आषाढ शुक्ल प्रतिपदा शके १८३६, दिनांक २४ जून १९१४ या दिवशी नर्मदाकिनारी श्री क्षेत्र गरुडेश्वर, (जिल्हा नर्मदा, गुजरात) मुक्कामी समाधी घेतली.

शिष्य गण

[संपादन]

प.प.श्रीस्वामीमहाराजांचे संन्यासी शिष्य

[संपादन]
  • प.प.श्रीनृसिंहसरस्वती दीक्षित स्वामी महाराज
  • प.प.श्रीयोगानंद सरस्वती (गांडाबुवा) स्वामी महाराज
  • श्रीमज्जगद्गुरू श्रीनृसिंहभारती शंकराचार्य श्रीकरवीर-संकेश्वर पीठ
  • प.पू.श्री नाना महाराज तराणेकर, इंदोर

प.प.श्रीस्वामीमहाराजांचे ब्रह्मचारी शिष्य

[संपादन]
  • श्री.सीताराम महाराज टेम्बे
  • श्री. नरहरि दिवाण (वठार)
  • श्री योगिराज गुळवणीमहाराज
  • श्री रंगावधूत महाराज

संदर्भ

[संपादन]
  1. ^ वि.दा. फरांदे. "टेंबेस्वामी". १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ संजय वझरेकर. "नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत २४ जून". १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.
  3. ^ "दत्तसंप्रदायातील सत्पुरुष!". १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]