जंगली महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जंगली महाराज हे नाव महाराष्ट्राच्या संतमंडळात प्रख्यात आहे. जंगली महाराज हे मध्ययुगीन संत नसून अगदी अलिकडच्या काळातील संत होते. जंगली महाराज या नावावरुन ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. हे नाव इतके रूढ झालं आहे की, ते आपलेच संत आहेत, असं विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटतं आणि यातच त्यांचं खरं संतत्व दडलं आहे.

जंगली महाराज म्हटले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजुत आहे. तीही चुकीची आहे, असं म्हणता येणार नाही, कारण महाराजांचं वास्तव्य बराच काळ पुण्यातच होतं आणि त्यांचं बरंचसं कार्यही पुण्यातच झालं आहे. जंगली महाराज हे अलिकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहीत नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील उत्कृष्ट चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास एक तपभर संशोधन करून जणू एक तपचं केलं. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध विभागात गेले. त्यांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. (तात्यासाहेब) खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली.


बालपण[संपादन]

जंगली शहा यांचं जन्मगाव सोलापूर जवळील होनमूर्गी हे लहानसं खेडं आहे. हिंदू इस्लाम आणि वीरशैव अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावात शतकानुशतकं गुण्यागोविंदानं नांदत आहेत. होनमूर्गीचं कुलदैवत बसवेश्वर हे आहे. तिथं जसं बसवेश्वराचं मंदिर आहे त्याचप्रमाणं मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही आहे. जंगलीशहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू आणि फार्सी या भाषा त्यांनी बालपणापासूनच आत्मसात केल्या होत्या. त्यांची प्रवृत्ति धार्मिक असल्यानं त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला. त्यामुळं त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण अतिशय व्यापक झाला. ते शेतात जाऊन कष्टाची कामंही करीत व द्रव्यार्जन करीत. श्रमप्रतिष्ठेवर त्यांचा भर होता. आपल्या वयाच्या तरुणांना ते धार्मिक शिक्षण देत. बालपणीच त्यांनी अनेक धर्मांच्या ग्रंथांचा अभ्यास केला.

कुस्तीसाठी कार्य महाराष्ट्रातील शाहूंच्या कारकिर्दीत बहरली गेलेली कुस्ती पश्चिम महाराष्ट्रात वाढवली पाहिजे आणि बलोपासना व अध्यात्म यांचा समन्वय साधून राष्ट्रोन्नत्ती केली पाहिजे हि मनात जिद्द निर्माण करून जंगली महाराजांनी जिथे जिथे आश्रम आहेत तिथे तिथे कुस्ती सक्तीची केली. ध्यान धारणा आणि समाधी या अवस्थेत जाताना समाजाला बलोपासनेचा संदेश मिळावा यासाठी त्यानी त्यांच्या सर्व शिष्याना मल्लविद्या आत्मसात करायला शिकवले..!

निर्वाण[संपादन]

इ.स. १८९० च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावत चालली. त्या काळातही ते योगसाधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्यानंच जणू भांबुडरयाच्या टेकडीवर आपल्या समाधीची/कबरीची जागा त्यांनी निश्चित करून ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपविली.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.