स्वामी समर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीस्वामी समर्थ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)
ShriSwamiSamarth.jpg
श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट)
संप्रदाय दत्त संप्रदाय
भाषा मराठी
कार्य महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार
प्रसिद्ध वचन 'भिऊ नकोस,
मी तुझ्या पाठीशी आहे'
संबंधित तीर्थक्षेत्रे अक्कलकोट, गाणगापूर

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभश्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.

जीवन[संपादन]

विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून ते प्रकट झाले, अशी मान्यता प्रचलित आहे.[१] त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले.

स्वामी समर्थ प्रकट दिन[संपादन]

इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.

वासुदेव बळवंत फडके[संपादन]

इ.स. १८७५ सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते.

महती[संपादन]

सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास... और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज... तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.

प्रकट पूर्वपीठिका[संपादन]

इ.स. १४५९ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)[२] श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते.

आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.

दीक्षा[संपादन]

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

अक्कलकोट प्रवेश[संपादन]

इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.

अवतार कार्य समाप्ती[संपादन]

इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील अशी त्यांंच्या भक्तांंची श्रद्धा व धारणा आहे.

स्वामी समर्थ पुण्यतिथी[संपादन]

श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले.

पूर्णब्रह्मस्वरूप अवतार[संपादन]

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत अशीही भक्तांंची धारणा आहे.

श्री स्वामी जयघोष[संपादन]

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थांचे वरील जयघोष जसे प्रभावी आहेत. त्याच प्रमाणे महाराजांचे स्वामी समर्थ तारक मंत्र हा सुद्धा फार प्रभावी आहे, असे त्यांचे भक्त मानतात.

“स्वामी समर्थ तारक मंत्र”[संपादन]

नि:शंक होई रे मना | निर्भय होई रे मना |
प्रचंड स्वामी बळ पाठीशी | नित्य आहे रे मना ||
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी |
अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय |
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||
आज्ञेविना काळ ना नेई त्याला |
परलोकी ही ना भीती तयाला || २ ||

उगाची भीतोसी भय हे पळू दे |
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे ||
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा |
नको घाबरू तू असे बाळ त्याचा || ३ ||

खरा होई जागा | श्रद्धेसहित |
कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त ||
कितीदा दिला बोल त्यांनीच हात |
नको डगमगू | स्वामी देतील साथ || ४ ||

विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ |
स्वामीच या पंचप्राणामृतात ||
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |

न सोडी कदा स्वामी जया घेई हाती || ५ ||

  • कोणतीही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व निराळा तारक मंत्र म्हणावा. संकटे दूर होतात, असे बक्त समजतात.

!!श्री स्वामी स्तवन!![संपादन]

श्री गणेशाय नमः! श्री सरस्वत्यै नमः! श्री गुरुभ्यो नमः! श्री कुलदेवतायै नमः! श्री अक्कलकोटनिवासी-पुर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामीराजाय नमः!!

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमुर्तिम्‌! द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्‌‍! एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं! भावातीतं त्रिगुणरहितं सद्‌गुरुं तं नमामि!!

ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा- टोपी- च माला कमण्डलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामीसमर्थावतारधारक पाहि माम्‌! पाहि माम्‌!

आता करू या प्रार्थना! जयजयाजी अघहरणा! परात्परा कैवल्यसदना! ब्रह्मानंदा यतिवर्या! जयजयाजी पुराणपुरुषा! लोकपाला सर्वेशा! अनंत ब्रह्मांडधीशा! देववंद्या जगद्गुरु!! सुखधामनिवासिया! सर्वसाक्षी करुणालया! भक्तजन ताराया! अनंतरुपे नटलासी! तू अग्नी तू पवन! तू आकाश तू जीवन! तूची वसुंधरा पुर्ण! चंद्र सूर्य तूच पै! तू विष्णु आणि शंकर! तू विधाता तू इंद्र! अष्टदिक्‌पालादि समग्र! तूच रुपे नटलासी! कर्ता आणि करविता! तूच हवी आणि होता! दाता आणि देवविता! तूच समर्था निश्चये! जंगम आणि स्थिर! तूच व्यापिले समग्र! तुजलागी आदिमध्याग्र! कोठे नसे पाहतां! असोनिया निर्गुण! रूपे नटलासी सगुण! ज्ञाता आणि ज्ञान! तूच एक विश्वेशा! वेदांचाही तर्क चाचरे! शास्त्रातेही नावरे! विष्णु शंकर एकसरे! कुंठित झाले सर्वही! मी केवळ अल्पमती! करु केवी आपुली स्तुती! सहस्रमुखी निश्चिती! शिणला ख्याती वर्णितां! दॄढ ठेविला चरणी माथा! रक्षावे मजसी समर्था! कृपाकटाक्षे दीनानाथा! दासाकडे पाहावे! आता इतुकी प्रार्थना! आणावी जी आपुल्या मना! कृपासमुद्री या मीना! आश्रयदेईजे सदैव! पाप ताप आणि दैन्य! सर्व जावो निरसोन! इष्टलोकी सौख्यदेवोन! परलोकसाधन करवावे! दुस्तर हा भवसागर! याचे पावावया पैलतीर! त्वन्नाम तरणी साचार! प्राप्त होवो मजला ते! आशा मनीषा तृष्णा! कल्पना आणि वासना! भ्रांती भुली नाना! न बाधोत तुझ्या कृपे! किती वर्णु आपुले गुण! द्यावे मज सुख साधन! अज्ञान तिमिर निरसोन! ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै! शांती मनी सदा वसो! वृथाभिमान नसो! सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी! भवदुःखे हे निसरो! तुझ्या भजनी चित्त वसो! वृथा विषयांची नसो! वासना या मनाते! सदा साधु समागम! तुझे भजन उत्तम! तेणे होवो हा सुगम! दुर्गम जो भवपंथ! व्यवहारी वर्तता! न पडो भ्रांती चित्ता! अंगी न यावी असत्यता! सत्ये विजयी सर्वदा! आप्तवर्गाचे पोषण! न्यायमार्गावलंबन! इतुके द्यावे वरदान! कृपा करुनि समर्था! असोनिया संसारात! प्राशीन तव नामामृत! प्रपंच आणि परमार्थ! तेणे सुगम मजलागी! कर्ता आणि करविता! तूची एक स्वामीनाथा! माझिया ठाई वार्ता! मीपणाची नसेची!!

"गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः! गुरुः साक्षात्‌ परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः!!"

!!श्री स्वामी समर्थार्पणमस्तु!!

महाराजांची काही चरित्रे[संपादन]

  1. स्वामी चरित्र सारामृत (पारायणासाठी पोथी, लेखक - विष्णू बळवंत थोरात)

चित्रपट[संपादन]

  • स्वामी समर्थ यांच्या आयुष्यावर ’देऊळ बंद’ हा चित्रपट २०१५ साली निघाला. त्यात स्वामींची भूमिका मोहन जोशी यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे व प्रणीत कुलकर्णी यांनी केले आहे.
  • तत्पूर्वी २०१२ साली ’कृपासिंधू श्री स्वामी समर्थ’ ही दूरचित्रवांणी मालिका ’मी मराठी’ या वाहिनीवर आली होती. हिचे प्रसरण शंभराहून अधिक भागांत झाले होते.या मालिकेचहे दिग्दर्शन

संदर्भ[संपादन]

  1. ^ Hanumante, Mukund M. (1999). A Glimpse of Divinity: Shri Swami Samarth Maharaj of Akkalkot. Kenner, USA: Akkalkot Swami Samarth Foundation ISBN 978-0-9669943-0-8
  2. ^ http://balsanskar.com/marathi/lekh/486.htmlWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.