संत जनाबाई
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
संत जनाबाई | |
---|---|
जन्म |
अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड |
मृत्यू |
अंदाजे इ.स. १३५० |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
वडील | दमा |
आई | करुंड |
जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या.
जीवन
जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.
बालपण
परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.
आयुष्य
संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.
‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.[१]
संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.
संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)
जनाबाईंवरील पुस्तके/व्हीडिओ/चित्रपट
- ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका - मंजुश्री गोखले)
- संत जनाबाई (लेखन - संत जनाबाई शिक्षण संस्था; प्रकाशन - डायमंड पब्लिकेशन्स)
- संत जनाबाई (सुहासिनी इर्लेकर|डाॅ. सुहासिनी यशवंत इर्लेकर]]; पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन)
- संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)
- संत जनाबाई जीवन चरित्र (व्हीडिओ; दिग्विजय बाबर)
- संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन - राजू फुलकर)
- संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक - गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका - हंसा वाडकर)
- संत जनाबाई अभंग गाथा (संपादक - नितीन सावंत)
- संत जनाबाई - अभंग संग्रह १ ([१])
- संत जनाबाई - अभंग संग्रह २ ([२])
हे सुद्धा पहा
- विठ्ठल
- बहिणाबाई पाठक (संत)
- संत साहित्य
- नामदेव (संत नामदेव पासून पुनर्निर्देशन)
- बाळकृष्ण लळीत
- वेणाबाई
बाह्य दुवे
- संत जनाबाई संपूर्ण माहिती
- संत जनाबाई Archived 2011-07-12 at the Wayback Machine.
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ कर्वे, स्वाती (२०१२). १०१ कर्तृत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २२. ISBN 978-81-7425-310-1.