मुक्ताबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संत मुक्ताबाई (जन्म : आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : महत् नगर तापीतीर ( महतनगर-मुक्ताईनगर )जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात.

कौटुंबिक पार्श्वभूमी[संपादन]

संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. रुख्मिणी आणि विठ्ठलपंत हे आई-वडील. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वरसंत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले.

गुरुपरंपरा[संपादन]

मच्छिंद्रनाथ ऊर्फ मत्स्येंद्रनाथ - गोरखनाथ ऊर्फ गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - मुक्ताबाई अशी ही गुरुपरंपरा आहे.

अध्यात्म-जीवन[संपादन]

संत मुक्ताबाई यांनी आपल्या शिष्यांना सोऽहम् मंत्राची शिकवण दिली आहे असे त्यांच्या उपदेशपर अभंगातून स्पष्ट होते.

कार्यकर्तृत्व[संपादन]

 • आपले परात्पर गुरू असणाऱ्या गोरक्षनाथांची आपल्या साधनेच्या आधारावर योगमार्गाने भेट घेतली.[१]
 • ताटीचे अभंग लिहून संत ज्ञानेश्वरांना लेखनप्रवृत्त केले.
 • योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले.
 • भक्तश्रेष्ठ म्हणून सुविख्यात असणाऱ्या संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. संत मुक्ताबाईमुळे त्यांना विसोबा खेचर या गुरूंचा लाभ झाला.
 • नाथसंप्रदायातील सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या मुक्ताबाई ह्या पहिल्याच स्त्री-सद्गुरू होत्या.

जीवनपट[संपादन]

जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१) (शकाबद्दल अभ्यासकांमध्ये दुमत आहे.)

बालपण[संपादन]

बालपणी आई-वडील यांच्यासोबत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. त्यानंतर अल्पावधीतच आई-वडिलांचा देहत्याग झालेला आहे. त्यामुळे लहान वयातच तीन भावंडाच्या पाठीवरील ही धाकटी बहीण प्रौढ बनली.

मुक्ताबाईस दिलेली सनद[संपादन]

वडील-बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपानदेव यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरू बंधुभगिनी असे एक हृद्य नाते निर्माण झाले. मुक्ताबाईना आलेल्या साधनेतील शंका त्यांनी ज्ञानेश्वरांना विचाराव्यात आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे पुढे वाटचाल करावी असे चालू असे. एके दिवशी ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस सांगितले, आठवे समाधीचे अंग आले तुज, आता नाही काज आणिकांसी. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हे संवाद ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या नावाने प्रसिद्ध आहेत.

यानंतर विसोबा खेचर शरण आले आहेत असे दिसते. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी चारही भावंडे गेलेली असताना, मुक्ताबाईबद्दलची पैठणकरांची प्रतिक्रिया अशी होती की, हे तिन्ही अवतार तीन देवाचे l आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली ll मुक्ताबाईचा ब्रह्मचित्कला नावाने देखील सन्मान झाला असल्याचे आढळते.

- ताटीच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांना विनवणी - ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती - मुक्ताबाईने चांगदेवाना 'पासष्टी'चा अर्थ सांगितला. - मुक्ताबाईचा पहिला शिष्य - चांगदेव - नामदेवांची भेट - गोरक्षनाथ कृपेचा वर्षाव - अमृत संजीवनीची प्राप्ती - चिरकाल अभंग शरीराचे मिळालेले वरदान - निवडक शिष्यांसमवेत अज्ञातवास - तीर्थयात्रेवरून परतलेल्या ज्ञानदेवादींची भेट - ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी) - सोपान व वटेश्वरांची समाधी (सासवड) - चांगदेवांची समाधी (पुणतांबे) - आपेगावी मुक्काम - वेरूळ, घृष्णेश्वर येथे मुक्काम - 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती - तापीतीरी स्वरूपाकार झाली. (वैशाख वद्य दशमी)[२]

मुक्ताबाईंची समाधी महत् नगर तापीतीर मेहुण (जळगाव जिल्हा) येथे आहे.

साहित्य[संपादन]

 • मुक्ताबाईंनी 'ज्ञानबोध' या ग्रंथाचे लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.
 • संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. या लोकारूढ समजुतीला काही प्रतीकात्मक अर्थ आहे.
 • मुक्ताबाईंचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य प्रकाशित आहे.
 • त्यांची ‘निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई’ ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.

संत मुक्ताबाई आणि इतर संत यातील अनुबंध[संपादन]

गुरू गोरक्षनाथ आणि संत मुक्ताबाई[संपादन]

मुक्ताबाईंनी गोरोबांकरवी नामदेवांची घेतलेली परीक्षा, हा प्रसंग सर्वश्रुत आहे. मात्र या कथेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे गोरोबा म्हणजे गोरा कुंभार नसून नाथसंप्रदायातील एक थोर अध्वर्यु गोरक्षनाथ हे होत, असे अनेक पुराव्यांनी सिद्ध करता येते. मुक्ताबाईंनी गोरक्षनाथांची स्वतःच्या योगसामर्थ्याच्या आधारावर भेट घेतली. ही भेट कशी शक्य झाली याचे वर्णन नामदेवांनी केले आहे ते असे - ''गोरा जुनाट पै जुने । हाती थापटणे अनुभवाचे । परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी । वैराग्याचे वरी पाल्हाळला ।।'' हा परब्रह्म म्हातारा म्हणजे साक्षात गोरक्षनाथ हे मुक्ताबाईंचे वैराग्य पाहून स्वतःला प्रकट करते झाले.[३]

संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई[संपादन]

संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई[संपादन]

ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरुबंधू-भगिनी असे नाते आहे. ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या लहानशा प्रकरणग्रंथामध्ये त्याचे दर्शन घडते. या ग्रंथाचे स्वरूप असे आहे की, येथे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना साधनेसंबंधी विविध प्रश्न विचारले आहेत. आणि त्यांची उत्तरे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत. ज्ञानेश्वरांनी येथे मुक्ताबाईस गुरुप्रणित सोऽहम् साधनेसंबंधी मार्गदर्शन केले आहे. सोऽहम् संबंधी सखोल विवेचन झाल्यावर ज्ञानेश्वर मुक्ताबाईस म्हणतात, ''यापरता नाही उपदेश आता ।।'' ज्ञानेश्वरांना सोऽहम् साधनेसंबंधी जे ज्ञात होते ते सर्व त्यांनी मुक्ताबाईंना सांगितले असावे, असे वरील वाक्यावरून लक्षात येते. ज्ञानेश्वरांनी केलेल्या शंकानिरसनामुळे मुक्ताबाईंचेही समाधान झाले. तो सर्व भाग त्यांनी स्वतः आत्मसात केला, त्यातून त्यांची अवस्था बदलली. त्या उच्चदशेस जाऊन पोहोचल्या. त्यांच्यातील हा बदल ज्ञानेश्वरांच्याही लक्षात आला आणि त्यामुळे त्यांनी मुक्ताबाईंना निःशंक शब्दामध्ये एक प्रशस्तिपत्रही दिले - ते म्हणाले, ''आठवे समाधिचे अंग आले तुज । आता नाही काज आणिकांसी ।।'' [४]

संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई[संपादन]

संत नामदेव आणि संत मुक्ताबाई[संपादन]

विसोबा खेचर आणि संत मुक्ताबाई[संपादन]

योगीराज चांगदेव आणि संत मुक्ताबाई[संपादन]

ज्ञानेश्वरादी भावंडांची थोरवी ऐकून भेटायला आलेल्या योगीराज चांगदेवांना तिन्ही भावंडानी मुक्ताबाईंकडे सोपविले आहे. आणि मग त्यांच्यामध्ये गुरू शिष्य हे नाते निर्माण झाले. आपण मुक्ताबाईचे शिष्य झालो यातील धन्यता चांगदेवांनी पुढील शब्दांत व्यक्त केली आहे, ''चौदा शत झाली बुद्धी माझी गेली l सोय दाखविली मुक्ताईने ll''

मुक्ताबाई ही आई आणि चांगदेव हे तान्हे बालक अशी कल्पना करून लिहिलेले मुक्ताबाईंचे अंगाईचे अभंग आहेत. चांगदेवासारख्या योग्याकडे मातेच्या वात्सल्याने पाहू शकणारी मुक्ताबाई यांची योग्यता कोणत्या पातळीची असेल, त्यांचा अधिकारही यातून सूचित होतो. मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्यातील हृद्य नात्यावर प्रकाश टाकणारे हे अभंग आहेत.

मुक्ताईंवरील पुस्तके[संपादन]

 • मुक्ताई जाहली प्रकाश(संशोधन) - स्वामी प्रा.डॉ तुळशीराम महाराज गुट्टे ( संत साहित्यिक )
 • आदिशक्ती मुक्ताई -प्र. न. पित्रे (धार्मिक)
 • कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‌मय) - ललितेतर संशोधन अभ्यासग्रंथ - लेखिका केतकी मोडक
 • धन्य ती मुक्ताई - सुमति क्षेत्रमाडे (कादंबरी)
 • मी बोलतेय मुक्ताई - नीता पुल्लीवार (ललित)
 • मुक्ताई - मंदा खापरे (कादंबरी)
 • मुक्ताई - मृणालिनी जोशी (ललित)
 • मुक्ताई - शांता परांजपे (ललित)
 • श्री संत मुक्ताबाई चरित्र - प्रा. बाळकृष्ण लळीत
 • मुक्ताबाई क्रांतिदर्शी - नंदन हेर्लेकर
 • मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईंचे व्यक्तिचित्रण, लेखिका - सुहासिनी इर्लेकर)
 • मुक्ताई दर्शन - बाबुराव मेहूणकर (आध्यात्मिक जीवनपट)
 • ऐं मुक्ताईं सोsहम् - बाबुराव मेहूणकर (तत्त्वज्ञानपर)
 • गाथा दासमुक्ताची:प्रथम खंड - दासमुक्ता-बाबुराव मेहूणकर (स्फुट/आत्मकथनपर)
 • एक समालोचन - दासमुक्ता/बाबुराव मेहूणकर (मुक्ताईवरील एका पुसतकाचे समालोचन)[५]

[६]

स्मृतिप्रीत्यर्थ[संपादन]

 • जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून संत मुक्ताईच्या नावावरून मुक्ताईनगर केले आहे.
 • पुण्यातील येरवडा येथे मेंटल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हॉस्पिटलच्या आवारातच मुक्ताई निवास नावाची धर्मशाळा स्थापन करण्यात आली आहे.[७]

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ डॉ.मोडक, केतकी. 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं'.
 2. ^ कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‌मय)
 3. ^ मराठी संत-साहित्यातील नाथ-प्रतिपादित सोहम साधना - एक अभ्यास - (प्रबंध), डॉ.केतकी मोडक
 4. ^ मराठी संत-साहित्यातील नाथ-प्रतिपादित सोहम साधना - एक अभ्यास - (प्रबंध), डॉ.केतकी मोडक
 5. ^ "संत मुक्ताबाई — विकासपीडिया". mr.vikaspedia.in. 2018-07-02 रोजी पाहिले.
 6. ^ मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री
 7. ^ कडकडोनी वीज निमाली ठायीचे ठायी- डॉ. केतकी मोडक