Jump to content

श्रीपाद वल्लभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीपाद श्रीवल्लभ या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रीपाद वल्लभ महाराजांची मूर्ती

श्रीपाद वल्लभ हे श्रीदत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात. कुरवपूर (कर्नाटक ) येथे त्यांच्या पादुका असून अनेक भक्त दर्शनासाठी तेथे जातात. श्रीगुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या काही लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा 'वेद' मानला जातो.

इ.स. १३२० मध्ये दत्तात्रेयांनी श्रीपाद वल्लभ म्हणून जन्म घेतला, असे मानले जाते. श्रीपाद वल्लभांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता लाभली होती. आपल्या भावंडांमधील अपंगत्व दूर करून त्यांनी माता-पित्यांची चिंता दूर केली. त्यांनी जगन्नाथपुरी, काशी, बदीकेदार या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. तीन वर्षे ते गुप्तपणे गोकर्ण-महाबळेश्वर येथे राहिले. त्यानंतर ते श्रीशैलावर गेले. त्यांनी संन्यास घेतला नव्हता. ते बहुधा अवधूत वेशाने राहत असावेत.

समाजातील विकृती नाहीशी व्हावी, परकीय आक्रमणाने गांजलेली, विस्कळीत आणि दुर्बल झालेल्या समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुनःस्थापना व्हावी, या उद्देशाने दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला, असे मानले जाते.

श्रीपाद वल्लभांच्या अवतारानंतरच भारतामध्ये दत्त संप्रदायाची जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे.

कुरवपुरातच आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी त्यांनी निजानंदी गमन केले. हा दिवस आजही गुरूद्वादशी म्हणून दत्तसंप्रदायी लोक श्रद्धेने पाळत असतात.