मुंबई
मुंबई
बॉम्बे | ||
---|---|---|
मेगासिटी | ||
| ||
| ||
Nickname(s): भारताचे न्यूयॉर्क ,[१] स्वप्नांचे शहर, मुंबईची सात बेटे,[२] द बिग कोकोनट,[३]भारताचे हॉलिवूड,[४] गेटवे ऑफ इंडिया, मॅक्झिमम सिटी[५] | ||
Country | India | |
State | महाराष्ट्र | |
Division | कोकण विभाग | |
District |
मुंबई शहर मुंबई उपनगर | |
First settled | १५०७[६] | |
Named for | मुंबादेवी | |
सरकार | ||
• प्रकार | महानगरपालिका | |
• Body | बृहन्मुंबई महानगरपालिका | |
• महापौर | रिक्त | |
क्षेत्रफळ | ||
• मेगासिटी | २३३ km२ (९० sq mi) | |
• Metro | १,६८१ km२ (१,६८१ sq mi) | |
Elevation | १४ m (४६ ft) | |
लोकसंख्या (२०११) | ||
• मेगासिटी | १,२४,७८,४४७ | |
• Rank | १ ला | |
• Metro |
१,८४,१४,२८८ २,०७,४८,३९५ (Extended UA) | |
Demonyms | मुंबईकर | |
वेळ क्षेत्र | UTC+५:३० (भारतीय प्रमाणवेळ) | |
पिन कोड |
४०० ००१ ते ४००१०७ | |
क्षेत्र कोड | +91-22 | |
वाहन नोंदणी |
| |
Official language | मराठी[११][१२] | |
संकेतस्थळ |
mumbaicity |
मुंबई (पूर्वीचे नाव: बॉम्बे) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे. अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखली जाणारी [१] मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे शहराची अंदाजे लोकसंख्या १.२५ कोटी आहे. [१३]मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे केंद्र हे शहर आहे आणि मुंबई महानगर प्रदेशाची २.३ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. हे जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे . [१४]मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहे. २००८ मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले. [१५] [१६]
मुंबई बनवणारी सात बेटे पूर्वी मराठी भाषा बोलणाऱ्या कोळी लोकांची निवासस्थाने होती. [१७] [१८] [१९]शतकानुशतके बॉम्बेची सात बेटे स्वदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यात होती. नंतर ती पोर्तुगीज साम्राज्याच्या स्वाधीन झाली. पुढे १६६१ मध्ये कॅथरीन ब्रागांझाचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स II सोबत झाला तेव्हा हुंड्याच्या रुपात ईस्ट इंडिया कंपनीला ही सात बेटे मिळाली. १७८२ च्या सुरूवातीस, हॉर्नबी वेलार्ड प्रकल्पाने मुंबईचा आकार बदलला, [२०] ज्याने अरबी समुद्रातील सात बेटांमधील क्षेत्राचे पुनर्वसन हाती घेतले. [२१]प्रमुख रस्ते आणि रेल्वेच्या बांधकामाबरोबरच, १८४५ मध्ये पूर्ण झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाने मुंबईचे अरबी समुद्रावरील प्रमुख बंदरात रूपांतर केले. १९ व्या शतकात मुंबई आर्थिक आणि शैक्षणिक विकासाने वैशिष्ट्यीकृत होती. २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हे शहर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक मजबूत आधार बनले. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे शहर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने, मुंबई या राजधानीसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. [२२]
मुंबई ही दक्षिण आशियाची आर्थिक, व्यावसायिक, [२३] आणि मनोरंजन राजधानी आहे. मुंबईचे वॉल स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलाल स्ट्रीटवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वसलेले आहे. [२४]जागतिक आर्थिक प्रवाहाच्या दृष्टीने हे शहर जगातील शीर्ष दहा वाणिज्य केंद्रांपैकी एक आहे, [२५] भारताच्या GDP च्या ६.१६% उत्पन्न, [२६] देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या २५%, भारतातील सागरी व्यापारापैकी ७०% ( मुंबई पोर्ट ट्रस्ट, धरमतर पोर्ट आणि जेएनपीटी ), [२७] आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील ७०% भांडवली व्यवहार मुंबईचे आहेत. [२८] [२९]या शहरात महत्त्वाच्या वित्तीय संस्था आणि असंख्य भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालये आहेत. भारतातील काही प्रमुख वैज्ञानिक आणि आण्विक संस्थांचे घर देखील हे शहर आहे. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी चित्रपट उद्योगांचे घर आहे. मुंबईतील व्यवसायाच्या संधी संपूर्ण भारतातून स्थलांतरितांना आकर्षित करतात.
नाव
[संपादन]मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. [ संदर्भ हवा ] पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.
इतिहास
[संपादन]मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीने ही बेटे भारतीय उपखंडातील आपले पहिले मोठे बंदर स्थापन करण्यास योग्य वाटले आणि आपली एक प्रेसिडेन्सी येथे हलवली.[ संदर्भ हवा ]
मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे एक बेट होण्या आधीपासून समुद्रकिनाऱ्यावर राहत आले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला "कोळीवाडा" असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.[ संदर्भ हवा ]
मुंबई मध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच भंडारी समाज देखील इथला मूळ रहिवासी समजला जातो. यांचे वास्तव्य पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यंत होते. कालांतराने हे लोक इतरत्र स्थलांतरित झाले. दादर, माहीम, प्रभादेवी येथे भंडारी अधिक असत भागोजीशेठ कीर हे त्यांतील एक होत.
आगरी समाज हे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.[३०] माहीम, शीव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ या भागांतही मुंबईचे मूळ रहिवासी अनेक शतके राहत होते..
मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००).१६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.[ संदर्भ हवा ]
१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.[ संदर्भ हवा ]
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.
स्वातंत्र्य
[संपादन]१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले.[ संदर्भ हवा ]
१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बम्बई (हिंदी भाषा) व बॉम्बे) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.[ संदर्भ हवा ] दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना १९३३ मध्ये वलमजी रतनजी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅंटरोड, गिरगाव व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत.
भूगोल
[संपादन]मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साळशेत बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे.
मुंबईचे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा असे दोन वेगवेगळे भाग आहेत. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात तर मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेस वाहणारी उल्हास नदी कर्जतजवळच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]फोर्ट परिसर -
गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, एशियाटीक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी अॉफ मॉडर्न आर्ट्स, फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक), वेलिंग्टन फाऊंटन, ओव्हल मैदान, आझाद मैदान, बलार्ड ईस्टेट, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, St. थॉमस कॅथेड्रल, कॅथेड्रल अॉफ होली नेम, Knesset Eliymoo सिनेगॉग, हॉर्निमन सर्कल गार्डन
नरिमन पॉइंट परिसर -
हॉटेल ट्रायडेंट, TIP OF NARIMAN POINT
वरळी - नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी
गिरगाव - तारापोरवाला मत्स्यालय
दादर - शिवाजी पार्क
प्रभादेवी - सिद्धीविनायक मंदिर
महालक्ष्मी - महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा
भुलेश्वर - मुंबादेवी मंदिर, चोरबाजार
भायखळा - जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड संग्रहालय
ताडदेव - अॉगस्ट क्रांती मैदान, मणीभवन
मलबार हिल - वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव, कमला नेहरू गार्डन (हँगिंग गार्डन)
पवई तलाव - पवई अंधेरी पूर्व
जुहू - जुहू, विले पार्ले पूर्व
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरिवली
मिठी नदी
[संपादन]मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्वाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पूरानंतर मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी १४ वर्षांत २,००० कोटी रुपये खर्च झाले तरी २०१९ साली मिठीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. मिठी नदीला फक्त अर्धा डझन नाले मिळतात, पण पुरेश्या नालेसफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतोच येतो.[ संदर्भ हवा ]
मुंबईतील ११७ नाले
[संपादन]या नद्यांना मिळणारे जिजामाता नाला, मालपा डोंगरी नाला, आंबेवाडी नाला असे तीन नाले असून हे तिन्ही नाले अंधेरी पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या मोगरा नाल्यात विलीन होतात. तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणीही पदपथालगतच्या गटाराच्या माध्यमातून मोगरा नाल्यालाच येऊन मिळते. अंधेरी पूर्व भागाचे क्षेत्रफळ सुमारे ३०० हेक्टरच्या आसपास आहे. अंधेरी पूर्व भागातील ३०० हेक्टर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर तीन नाले, तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी मोगरा नाल्याला येऊन मिळते. परिणामी, मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागतो.[ संदर्भ हवा ]
याशिवाय धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील नाला,जोगेश्वरी रेल्वे स्टाफ कॉलनी जवळून वाहणारा नाला, माहीम आणि किंग्ज सर्कल रेल्वेमार्गालगत असलेल्या आझाद नगर मधील नाला वगैरे नाले आहेत. शहरातून वाहणाऱ्या मिठी, दहिसर या नद्यांचे नालेच झाले आहेत.
एफ/उत्तर- आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिक रोड नाला, जे.के.केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला
जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला
जी/उत्तर- कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रॅंच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला
एल- अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्थानक नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला
एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला
एम/पश्चिम- अयोध्यानगर नाला, चरई नाला, फर्टिलायझर नाला, वाशीनाका नाला
एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट
एस- अलॉंग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला, दातार कॉलनी नाला, टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला
एच/पूर्व- ओएनजीसी, गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी
एच /पश्चिम- गझदरबंध नाला, बोरान नाला, हरिजन नाला.
के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला (हा नाला सेव्हन हिल्स हाॅस्पिटलपाशी उगम पावतो आणि विमानतळाच्या टी-2 टर्मिनलजवळ मिठी नदीला मिळतो), कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला
के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला
पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला
पी/उत्तर- पुष्पापा पार्क आणि मालवणी नाला
आर/दक्षिण- पोयसर नदी प्रणाली
आर/मध्य- चंदावरकर नाला प्रणाली
आर/उत्तर- अवधूतनगर नाला, काजूपाडा नाला, केतकीपाडा नाला, कोकणी पाडा नाला, तेरे कंपाऊंड नाला, दहिसर नदी प्रणाली, धारखाडी नाला, यादवनगर नाला
हवामान
[संपादन]मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता.
नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ४०° से. ते किमान १०° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७°से असे नोंदवले गेले आहे.
अर्थव्यवस्था
[संपादन]मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारताच्या १० % कारखाना-रोजगार (Factory employment), ४० % प्राप्तिकर, २० % केंद्रीय कर (Central excise), ६० % आयात कर, ४० % परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न ९,१९,६०० कोटी इतके होते व प्रति व्यक्ती आय १,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ]
१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.
मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारताच्या प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.[ संदर्भ हवा ]
प्रशासन
[संपादन]महानगर प्रशासन
[संपादन]मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहराचे १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो.
मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात.
जिल्हा प्रशासन
[संपादन]मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा(जमीनजुमल्याच्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.
लोकसभा, विधानसभा प्रतिनिधित्व
[संपादन]मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात.
महानगर पोलीस यंत्रणा
[संपादन]मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो; हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलीस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलीस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे.
न्याय यंत्रणा
[संपादन]मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय (Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत.
वाहतूक व्यवस्था
[संपादन]मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा व भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या.
वाहतुकीच नवीन सादन म्हणून कॅब हा ही पर्याय आहे.
रस्तेमार्ग
[संपादन]मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारताच्या पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरू आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी महामार्ग सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत: १) पूर्व द्रुतगती मार्ग (भायखळा ते ठाणे). २) पूर्व मुक्त मार्ग (चिंचपोकळी ते चेंबूर). ३) सायन-पनवेल द्रुतगती मार्ग. ४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते भाईंदर).
मुंबईच्या बेस्ट बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसह नवी मुंबई, मीरा-भाईंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नवी मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे व बोरीवलीपर्यंत चालवते.[ संदर्भ हवा ]
मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८ % लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूककोंडी ही वारंवार घडते.[ संदर्भ हवा ]
रेल्वेमार्ग
[संपादन]मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरी रेल्वे तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर.
२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५००हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग कार्यरत असून तो वर्सोवा ते घाटकोपर असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गाची चाचपणी केली गेली असून त्यांचे काम भविष्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मोनोरेल ह्या जलद परिवहन पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो चेंबूर ते वडाळा डेपो दरम्यान धावतो. वडाळा ते दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यंत नंतर चालू झाले.
भारतीय रेल्वे मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारताच्या इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस ह्या पाच प्रमुख टर्मिनसहून सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटतात.[ संदर्भ हवा ]
विमानवाहतूक
[संपादन]छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. जुहू विमानतळ हा भारताच्या पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.[ संदर्भ हवा ]
जलमार्ग
[संपादन]मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारताच्या सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५ % ते ६० % मालवाहतूक मुंबई येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे.[ संदर्भ हवा ]
नागरी सुविधा
[संपादन]बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते, पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते. या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्याची गळती अथवा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो मुलुंड व गोराईतील डम्पिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते.
बेस्ट, महावितरण व रिलायन्स एजन्सी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्ती मार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक व घटत चालला आहे, पण काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल., टाटा उद्योगसमूह, रिलायन्स मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात.[ संदर्भ हवा ]
लोकजीवन
[संपादन]मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरिता इतर गावांहून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.[ संदर्भ हवा ]
मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून कोकणी, हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे.
विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरिबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८ % लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.[ संदर्भ हवा ]
असामाजिक तत्त्वे
[संपादन]१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बॉंबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकवादी हल्ला होता. [ संदर्भ हवा ]
धर्म
[संपादन]२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची धार्मिक लोकसंख्येत हिंदू (६६ %), मुस्लिम (२०.६५ %), बौद्ध (४.८५ %), जैन (४.१० %), ख्रिश्चन (३.२७ %),[३१][३२][३३] शीख (०.५८ %) आणि बाकी पारशी, यहूदी व निधर्मी (तिन्ही मिळून ०.५७ %) आहेत.[३१][३४] भाषावार जनसंख्येत मराठी लोक ४२ %, हिंदी व गुजराती लोक १९ % आणि उर्वरित अन्यभाषी लोक आहेत.
मूळ ख्रिश्चनांमध्ये ईस्ट इंडियन कॅथलिकांचा समावेश आहे. मूळ हिंदू धर्मीय असलेल्या लोकांना १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बाटवले. गोवन आणि मंगलोरियन कॅथलिक हे शहराच्या ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा भाग देखील बनवतात. १८ व्या शतकात ज्यू मुंबईत स्थायिक झाले. जगभरातील पारसी झोरॅस्ट्रिअन्सची सर्वात मोठी लोकसंख्या मुंबईत देखील आहे, परंतु इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीनंतर ही संख्या कमी होत चालली असून ती ६०,००० इतकी आहे. ७ व्या शतकात पारसी मुसलमानांच्या विजयामुळे पारस (पारसी / इराण) पासून भारतात आले. मुंबईतील सर्वात जुने मुस्लिम समुदायांमध्ये दाऊदी बोहरा, इस्माईल खोजा आणि कोकणी मुसलमानांचा समावेश आहे.[ संदर्भ हवा ]
मुंबईकर आणि मुंबईची संस्कृती
[संपादन]मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे करतात. तसेच मुंबईला स्वप्ननगरी, मायानगरी असेपण म्हणतात. मुंबईचे डबेवाले देखील प्रसिद्ध आहेत.
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळ, दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराती, चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत. तसेच झणझणीत कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, कांदा भजी, जिलेबी आणि फाफडा हे सुद्धा आवडीने खाल्ले जातात.[ संदर्भ हवा ]
मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहेत. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ]
मुंबई एक स्वतः एक संस्कृती आहे, भारतात तसेच भारताबाहेर राहणारे अनेक मुंबई कडे एक स्वप्नपूर्तीचे शहर म्हणून बघतात, सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई ही केवळ ऐकून किंवा वाचून बोलण्याचा विषय नाही तर केवळ येथे थोडें दिवस का होईना अनुभवण्याचा विषय आहे. येथील संस्कृतीची झळ येथील प्रत्येक समाजात राहून बघायला मिळते, आणि 'विविधतेत एकता' सामावून घेणार शहर एक आगळी शैली देऊन भारताचं प्रतिनिधित्व मोठ्या दिमाखात करताना दिसते. न्यू यॉर्कमधील रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार, या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.[३५]
भाषा
[संपादन]मुंबईमध्ये मराठी ही मुख्य भाषा असली तरीही हिंदी, इंग्लिश आणि गुजराती भाषांचा मोठा प्रभाव आहे. याशिवाय शहराच्या विशिष्ट भागांमध्ये भारतातील काही भाषा वापरल्या जातात. मुंबईमध्ये दुकानांवर मराठीतून फलक असण्याची सक्ती आहे. मुंबईत एक खास मराठी बोली बोलली जाते. मूळ मराठी कोळी आगरी, भंडारी यांची वेगवेगळी बोलीभाषा आहे. काही काळाने इतर राज्यांतील अमराठी लोकं येऊन त्यांची हिंदी भाषा लादली जाऊ लागली, ती मराठी माणसाला बोलता येत नाही. तसेच मराठी न येणारे हिंदी भाषिक टपोरी मिश्र भाषा बोलू लागले. तिला बम्बय्या हिंदी म्हणतात.
प्रसारमाध्यमे
[संपादन]मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए., हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृत्तपत्रे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारताच्या इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात.
दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच् सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार इंडिया, झी नेटवर्क, व्हायाकॉम १८ व सोनी नेटवर्क यांच्या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत.
शिक्षण
[संपादन]मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर उर्वरित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस्ई / आयसीएस्ई) बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात. पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.[ संदर्भ हवा ] भारताच्या १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) प्रवेश घेतात. १२वीनंतर साधी पदव्युत्तर पदविका (पदवी) किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठांशी संलग्न आहेत. आय. आय. टी मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI ) व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे.
खेळ
[संपादन]क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. प्रत्येक गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. यांशिवाय नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदान आयपीएल स्पर्धांसाठी वापरले जाते. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुंबईने आजवर अनेक क्रिकेट खेळाडू भारतास दिले आहेत. अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, रवी शास्त्री, झहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे भारताचे आघाडीचे क्रिकेट खेळाडू मुंबईचे आहेत.
फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषतः पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, बिलियर्ड्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. विशेषतः हे खेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खेळण्यात येतात.
उपनगरे
[संपादन]वांद्रे, सांताक्रूझ, नाहूर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, शीव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड,विक्रोळी, दहिसर, खार रोड, विद्याविहार, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर.
मुंबईविषयी लिहिली गेलेली पुस्तके
[संपादन]ललित
[संपादन]- ब्रेथलेस इन बॉम्बे (मर्झबान एफ. श्रॉफ- २००९)
- फॅमिली मॅटर्स (रोहिन्टन मिस्त्री- २००२)
- मॅक्झिमम सिटी: बॉम्बे लॉस्ट अँड फाउंड (सुकेतू मेहता-२००४)
- मिडनाइट्स चिल्ड्रन (सलमान रश्दी- १९८१)
- मुंबई फेबल्स (ग्यान प्रकाश)
- रावण अँड एडी (किरण नगरकर- १९९४)
- शांताराम (ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स- २००३)
- अधांतर (गिरणगावावरचं नाटक) लेखक - जयंत पवार
- आठवणीतील मुंबई (प्रसाद मोकाशी)
- जिंकून हरलेली लढाई (सचिन वाझे)
- प्रिय मुंबई (मधुवंती सप्रे)
- मुंबई...बंबई... बॉंबे (कवितासंग्रह - बाळासाहेब लबडे)
- राडा (कादंबरी) लेखक - भाऊ पाध्ये
- लालबाग परळ (मराठी चित्रपट)
- मी शिवाजी पार्क(मराठी चित्रपट)
ललितेतर
[संपादन]- Alice in Bhuleshwar: Navigating a Mumbai Neighbourhood (कैवान मेहता)
- Love and Longing in Bombay (विक्रम चंद्र- १९९७)
- Beautiful Thing: Inside the Secret World of Bombay's Dance Bars (सोनिया फालेरो)
- Behind the Beautiful Forevers : Life, Death and Hope in a Mumbai Undercity (कॅथरीन बू-२०१२)
- Black Friday: The True Story Of The Bombay Bomb Blasts (एस. हुसेन झैदी)
- Bombay (सॅम्युअल शेपर्ड-१९३२)
- Bombay and Western India (खंड १ला, जेम्स डग्लस-१८९३)
- Bombay Cinema: An Archive of the City (रंजनी मजुमदार)
- Bombay-Gateway of India, (प्रकाशक : द रोटरी क्लब ऑफ इंडिया-१९३६)
- Bombay, Meri Jaan (संपादक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस- २००३)
- Bombay A Photorama 1661–1931 (मुंबई महापालिका प्रकाशन)
- Bombay Place Names and Street names (एस.टी. शेपर्ड-१९१७)
- Bombay-Poona Souvenir (खंड २१वा, इंडियन सायन्स काँग्रेस-१९३४)
- Bombay: The Cities Within (शारदा द्विवेद्वी)
- Bombay Then and Mumbai Now (नरेश फर्नांडिस आणि जिम मॅसेलॉस)
- Censorship and Sexuality in Bombay Cinema (मोनिका मेहता)
- City Of Gold : The Biography Of Bombay (गिलियन टिंडॉल)
- The Gazetteer of Bombay City and Island (सरकारी प्रकाशन, ३ खंड-१९०९)
- Glimpses of India (जे.एच. फरनॉक्स-१८९५)
- Govind Narayan's Mumbai: An Urban Biography from 1863 (संपादक : मुरली रंगनाथन)
- Guide to Bombay (जे.एम. मॅक्लीन-१८९९)
- History of Bombay 1661–1708 (एम.डी. डेव्हिड-१९७३)
- In the Mission Field (प्रकाशक : दमणची बिशपरी-१९२५)
- Jamsetji Jejeebhoy (जे.आर.पी. मोदी-१९५९)
- Mafia Queens Of Mumbai: Stories Of Women From The Ganglands (एस. हुसेन झैदी)
- Old and New Bombay-A historical and descriptive account of Bombay and its environs (प्रकाशक : जी. क्लॅरिज-१९१७)
- Once Was Bombay (पिंकी विराणी)
- One Hundred Years One Hundred Voices: The Millworkers Of Girangaon (एम.मेनन)
- Opium City: The Making Of Early Victorian Bombay (अमर फरूकी)
- Peoples of Bombay (पर्सिवल स्ट्रिप आणि ऑलिव्हिया स्ट्रिप, प्रकाशक : ठाकर अँड कंपनी लिमिटेड-१९४४)
- Port of Bombay (प्रकाशक : मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष डब्ल्यू.एच. नील्सन)
- Riots and After in Mumbai: Chronicles of Truth and Reconciliation (मीना मेनन)
- Sentries of Mumbai (मुंबई विद्यापीठ)
- Shells from Island of Bombay (डी.ई. वाच्छा-१९२०)
- शिवाजी पार्क, दादर २८ : हिस्ट्री, प्लेसेस, पीपल' (शांता गोखलॆ)
- Views of Bombay -Old and New (टाइम्स ऑफ इंडिया प्रेस)
- Why Loiter?: Women and Risk on Mumbai Streets शिल्पा फडके, समीरा खान आणि शिल्पा रानडे)
- Zero Point Bombay: In and Around Horniman Circle (कमला गणेश, उषा ठक्कर आणि गीता चढ्ढा-२००८)
- अर्धी मुंबई (सुहास कुलकर्णी)
- उत्तर कोकणचा प्राचीन इतिहास (रावबहाद्दुर पु.बा. जोशी-१९२६)
- एक्सप्रेस टॉवरवरून (अप्पा पेंडसे)
- प्रिय मुंबई (मधुवंती सप्रे - राजहंस प्रकाशन, २०१६)
- माझी मुंबई (वा.वा. गोखले)
- मुंबई आणि मुंबईकर (गंगाधर गाडगीळ)
- मुंबई ON Sale (प्रकाश अकोलकर-२०१३)
- मुंबईचे वर्णन (गोविंद नारायण माडगावकर- १८६३)
- मुंबई छायाचित्र दर्शन १६६१-१९३१ (मुंबई महापालिका प्रकाशन)
- मुंबई नगरी (न.र. फाटक)
- वृक्षराजी मुंबईची (डॉ. कमलाकर हिप्पळगावकर); प्रकाशक : मुग्धा कर्णिक
- शिवाजी पार्क : दादर २८ : हिस्ट्री, प्लेसेस, पीपल' (शांता गोखले)
- सफर... मुंबईच्या वृक्षतीर्थांची (प्रकाश काळे)
- सहली एक दिवसाच्या - आसपास मुंबईच्या (सुरेश परांजपे)
- २६/११, मुंबईवरील हल्ला (संपादक : हरिंदर बावेजा. अनुवाद - प्रा. मुकुंद नातू)
- "आमची मुंबई चांगली मुंबई" हे महागुरू श्री सचिन पिळगावकर ह्यांचे "मुंबई आन्थम" ह्या नावाने सुप्रसिद्ध गीत.
हे सुद्धा पहा
[संपादन]- काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई
- मुंबई जिल्हा
- मुंबई उपनगर जिल्हा
- मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे
- मुंबई विद्यापीठ, मुंबई शेअर बाजार, भारतीय लोहमार्ग संस्था- मध्य विभाग, मुंबई विभाग
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Mumbai Is India's New York". NPR. 26 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "The Seven Islands". The Mumbai Pages. 16 July 1995. 26 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 October 2012 रोजी पाहिले.
- ^ Rooney, John F. (2007). The Daemon in Our Dreams (इंग्रजी भाषेत). John F. Rooney. ISBN 978-0-9752756-7-2.
- ^ "Indian Cities and Their Nicknames – Complete List". 22 July 2015.
- ^ "Mumbai is truly maximum city". The Economic Times. 15 April 2023 रोजी पाहिले.
- ^ "Mumbai Settlement". Britannia.
- ^ "Maharashtra Government-Know Your RTO" (PDF). 21 October 2019 रोजी पाहिले.
- ^
- "Mumbai 17th in global GDP list, says survey". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 3 June 2017. 16 September 2021 रोजी पाहिले.
- "Global Wealth PPP Distribution: Who Are The Leaders Of The Global Economy? - Full Size". visualcapitalist.com. 13 October 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 November 2022 रोजी पाहिले.
- "Mumbai is the 12th wealthiest city in the world, leaving Paris and Toronto behind". GQ India (इंग्रजी भाषेत). 14 October 2019. 16 September 2021 रोजी पाहिले.
- ^ Lewis, Clara (28 November 2016). "Delhi, not Mumbai, India's economic capital". The Times of India. 11 September 2023 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;gdp
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ National Commissioner Linguistic Minorities 50th report, page 131 Archived 8 July 2016 at the Wayback Machine.. Government of India. Retrieved 15 July 2015.
- ^ "Evolution of the Corporation, Historical Milestones". Mumbai: Municipal Corporation of Greater Mumbai. 15 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Provisional Population Totals, Census of India 2011; Cities having population 1 lakh and above" (PDF). Office of the Registrar General & Census Commissioner, India. 7 May 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 26 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "World Urban Areas" (PDF). Demographia. 2018. 21 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "The World According to GaWC 2008". Globalization and World Cities Study Group and Network (GaWC). Loughborough University. 23 February 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 May 2009 रोजी पाहिले.
- ^ "Mumbai | ISAC". Indiastudyabroad.org. 12 May 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 May 2015 रोजी पाहिले.
- ^ James, V. (1977). "Marriage Customs of Christian Son Kolis". Asian Folklore Studies. 36 (2): 131–148. doi:10.2307/1177821. JSTOR 1177821. 2 December 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
- ^ Munshi, Kanaiyalal M. (1954). Gujarāt and its literature, from early times to 1852. Bharatiya Vidya Bhavan. p. xix.
The next immigrants into the islands of Bombay were the Kolis, who on all authorities continued to be their original inhabitants till Aungier founded the city of Bombay. Kathiawad and Central Gujarāt was the home of the Kolis in pre-historic times.
- ^ Mehta, R. N. (1983). "Bombay – An analysis of the toponym". Journal of the Oriental Institute: 138–140.
The kolis who succeeded the stone-age men on the island brought with them from Gujarat their patron goddess Mummai whom their descendants still worship in Kathiawar. The name of Bombay is derived from this koli goddess.
- ^ Dwivedi & Mehrotra 2001
- ^ "Once Upon a Time in Bombay". Foreign Policy. 24 June 2011. 9 January 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 February 2012 रोजी पाहिले.
- ^ "Bombay: History of a City". British Library. 13 February 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 November 2008 रोजी पाहिले.
- ^ Lakshmi, Rama (14 April 2011). "New millionaires hope to serve as role models for India's lower castes". The Washington Post. Mumbai. 23 June 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 June 2015 रोजी पाहिले.
- ^ James Chen. "What Is Dalal Street?". Dotdash Meredith. 26 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Mumbai, a land of opportunities". The Times of India. 20 July 2011. 4 August 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 July 2011 रोजी पाहिले.
- ^ "Mumbai Urban Infrastructure Project". Mumbai Metropolitan Region Development Authority. 26 February 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 July 2008 रोजी पाहिले.
- ^ "10 worst oil spills that cost trillions in losses : Rediff.com Business". Rediff.com. 14 August 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Development of Mumbai International Airport (NMIA)" (PDF). CIDCO. 2013. p. 7. 8 August 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 8 July 2015 रोजी पाहिले.
- ^ Mahajan, Poonam (26 July 2014). "Poonam Mahajan explains why Mumbai is at the very heart of India story". DNA India. Mumbai. 21 June 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 June 2015 रोजी पाहिले.
- ^ "Krishikosh: Home". krishikosh.egranth.ac.in. १८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
- ^ a b c "C-1 Population By Religious Community". Government of India, Ministry of Home Affairs. 11 May 2016 रोजी पाहिले. On this page, select "Maharashtra" from the download menu. "Greater Mumbai (M.Corp.)" is at line 11 of the excel file, Mumbai Suburban District at line 1065 and "Mumbai District" at line 1072.
- ^ "Mumbai (Greater Mumbai) City Census 2011 data". Census2011. 3 June 2016 रोजी पाहिले.
- ^ "Muslims of Mumbai (Bombay), major city of India". The 30-Days Prayer Network. 23 August 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 September 2010 रोजी पाहिले.
- ^ "Census GIS Household". Census of India. Office of the Registrar General. 3 January 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 December 2008 रोजी पाहिले.
- ^ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर- दि.२७/०९/२०१३ पान क्र.१
बाह्य दुवे
[संपादन]- महाराष्ट्र राज्याचे अधिकृत संकेतस्थळ
- बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळ
- मुंबईचा अधिकृत अहवाल Archived 2009-03-10 at the Wayback Machine.
- संदर्भ चुका असणारी पाने
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from September 2023
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- २००६ मधील मुखपृष्ठ सदर लेख
- मुखपृष्ठ सदर लेख
- लेख with short description
- Pages using infobox settlement with bad settlement type
- Pages using multiple image with auto scaled images
- Pages using infobox settlement with no coordinates
- महाराष्ट्रातील शहरे
- भारतातील शहरे
- मुंबई
- महाराष्ट्र
- भारतातील महानगर क्षेत्र
- भारतीय राजधानी शहरे