मुंबई मोनोरेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई मोनोरेल
स्थान मुंबई
वाहतूक प्रकार जलद परिवहन
मार्ग
मार्ग लांबी २०.२१ कि.मी.
एकुण स्थानके १८
सेवेस आरंभ ४ फेब्रुवारी २०१४ (पहिला टप्पा)
मार्ग नकाशा
चेंबूर
व्हीएनपी व आरसी मार्ग
फर्टिलायझर टाउनशिप
भारत पेट्रोलियम
म्हैसूर कॉलनी
भक्ती पार्क
वडाळा डेपो
स्थानकामध्ये येणारी मोनोरेल
भक्ती पार्क स्थानक

मुंबई मोनोरेल (Mumbai Monorail) ही मुंबई शहरामध्ये कार्यरत असलेली एक मोनोरेल प्रणाली आहे. ४ फेब्रुवारी २०१४ पासून सेवेमध्ये असलेली मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.) ह्या सरकारी संस्थेने हा प्रकल्प विकसित केला आहे. २००९ साली मोनोरेलच्या बांधकामाला सुरुवात झाली व पहिल्या मार्गावरील चेंबूर ते वडाळा डेपो हा ८.९३ किमी लांबीचा पहिला टप्पा ४ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. चेंबूर ते जेकब सर्कल हा २०.२१ किमी लांबीचा संपूर्ण पहिला मार्ग मार्च २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

इतिहास[संपादन]

विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई मध्ये भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली बांधण्याची परवानगी १३ ऑगस्ट, २००८ रोजी दिली.[ संदर्भ हवा ] बॉंबार्डिअर ट्रान्स्पोर्टेशन, रिलायन्स एनर्जी व हिताची मोनोरेल यांच्या आणि लार्सन ऍण्ड टूब्रो व मलेशियातील स्कोमी रेल यांच्या दोन संघांतून ११ नोव्हेंबर, २००८ रोजी लार्सन ऍण्ड टूब्रो व स्कोमी रेल या संघाला २०२९ पर्यंत मोनोरेल बांधण्याचे व चालवण्याचे २४६० कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले. मुंबई मोनोरेलचे बांधकाम तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण ह्यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी २००९ रोजी सुरू झाले. २६ जानेवारी २०१० रोजी १०८ मी.च्या मार्गावर परीक्षा-चलन पार पडले.

मार्ग[संपादन]

मुंबई मोनोरेलचा मार्ग मुंबईच्या पूर्व भागातील चेंबूर उपनगरापासून दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यत आखण्यात आला आहे. चेंबूरमधील मोनोरेलचे टर्मिनस स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चेंबूर रेल्वे स्थानकाच्या जवळ स्थित आहे ज्यामुळे प्रवाशांना मार्ग बदलणे सुलभ होते. २०.२१ किमी लांबीचा हा मार्ग संपूर्णपणे उंचीवर असून प्रवाशांच्या सोईसाठी सरकते जिने व लिफ्टची सोय करण्यात आली आहे.

मार्ग
# स्थानक नाव उद्घाटन जोडमार्ग
1 चेंबूर मोनोरेल स्थानक २ फेब्रुवारी २०१४ चेंबूर रेल्वे स्थानक (हार्बर मार्ग)
2 व्हीएनपी व आरसी मार्ग मोनोरेल स्थानक २ फेब्रुवारी २०१४ नाही
3 फर्टिलायझर टाउनशिप मोनोरेल स्थानक २ फेब्रुवारी २०१४ नाही
4 भारत पेट्रोलियम मोनोरेल स्थानक २ फेब्रुवारी २०१४ नाही
5 म्हैसूर कॉलनी मोनोरेल स्थानक २ फेब्रुवारी २०१४ नाही
6 भक्ती पार्क मोनोरेल स्थानक २ फेब्रुवारी २०१४ नाही
7 वडाळा डेपो मोनोरेल स्थानक २ फेब्रुवारी २०१४ नाही
8 जी.टी.बी. नगर मोनोरेल स्थानक डिसेंबर २०१६ नाही
9 ॲन्टॉप हिल मोनोरेल स्थानक मार्च 2015 नाही
10 आचार्य अत्रे नगर मोनोरेल स्थानक मार्च 2015 नाही
11 वडाळा पूल मोनोरेल स्थानक मार्च 2015 वडाळा रेल्वे स्थानक (हार्बर मार्ग)
12 दादर पूर्व मोनोरेल स्थानक मार्च 2015 नाही
13 नायगाव मोनोरेल स्थानक मार्च 2015 नाही
14 आंबेडकर नगर मोनोरेल स्थानक मार्च 2015 नाही
15 मिंट कॉलनी मोनोरेल स्थानक मार्च 2015 नाही
16 लोअर परेल मोनोरेल स्थानक मार्च 2015 करी रोड(मध्य मार्ग)/ लोअर परळ(पश्चिम मार्ग)
17 चिंचपोकळी मोनोरेल स्थानक मार्च 2015 चिंचपोकळी रेल्वे स्टेशन(मध्य मार्ग)
18 जेकब सर्कल मोनोरेल स्थानक मार्च 2015 नाही

बाह्य दुवे[संपादन]