Jump to content

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिजामाता उद्यान, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)
जिजामाता उद्यान येथील जिजामाता व बाल शिवाजींचा पुतळा.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्‌घाटन १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली. २०१२ साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली.

राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. मुंबईतील इतर कुठल्याही उद्यानात इतके विस्मयकारक वनस्पती-वैविध्य सापडत नाही. येथील कित्येक वृक्षांनी शंभरी पार केलेली आहेत. तर काही इतके दुर्मीळ आहेत की मुंबईत अन्यत्र ते क्वचितच आढळतात. मुंबईतील महाविद्यालयांतील तसेच मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी येथे अभ्यासासाठी आणि भेटीसाठी येतात. भारतातील सर्वात मोठय़ा वनस्पतिसंग्रहालयांपकी एक असलेल्या मुंबईतील ‘ब्लाटर हर्बेरिअम’मध्ये राणीच्या बागेतील वनस्पतींचे ४६५ नमुने जतन केलेले आहेत. या उद्यानाचा आणखी एक मानिबदू आहे तो म्हणजे हिरव्या रंगाच्या लाकडी पट्ट्यांच्या जाळीने बनलेली, पुरस्कारपात्र ठरलेली वनस्पती संरक्षिका (कॉन्झर्वेटरी) जी लंडनमध्ये ‘क्यू’ येथे असलेल्या ‘पाम हाऊस’च्या धर्तीवर उभारलेली आहे.

तपशीलवार आणि निसंदिग्ध अभिलेख आणि दस्तऐवज यांवरून हे लक्षात येते की तत्कालीन हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाने १८४० मध्ये शिवडी येथे स्थापन केलेले बोटॅनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बे ही नंतर आकाराला आलेल्या राणीच्या बागेतील वनस्पती उद्यानाची नांदी होती. १८६० च्या दशकाच्या पूर्वार्धात, सोसायटीने आजच्या भायखळा येथील जागेवर शिवडीमधील वनस्पती उद्यानाचे स्थलांतर केले. त्यानंतर १८७३ मध्ये सोसायटी दिवाळखोरीत गेल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेली. सरकारने तत्कालीन मुंबई महापालिकेकडे या उद्यानाचे हस्तांतरण केले आणि तेव्हापासून महापालिकाच या सार्वजनिक उद्यानाची देखभाल करते आहे. दरम्यान १८९० मध्ये उद्यानालगतची १५ एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत 'प्राणिसंग्रहालया'चा जन्म झाला. प्राणिसंग्रहालय जरी नंतर अस्तित्वात आले असले तरी आजपावेतो राणीच्या बागेमध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एकत्रच नांदत आहेत. इथल्या दोनतृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणिसंग्रहालय आहे. साहजिकच राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालयापेक्षा वनस्पती उद्यानाचा वरचष्मा आहे.

अतुलनीय वनस्पतिवैविध्याबरोबरच त्या काळी युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पुनरुज्जीवन’ या शैलीत उभारलेल्या या अनोख्या वनस्पती उद्यानातील तिहेरी कमान व लेडी फ्रेअर टेम्पल, तसेच ससून क्लॉक टॉवर ही वारसाशिल्पे राणीच्या बागेची शोभा द्विगुणित करतात.

राणीच्या बागेवरील पुस्तके

[संपादन]
  • 'राणी बाग - १५० वर्षे' या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन २९ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईत होत आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी रूपांतराचे संपादन शुभदा निखार्गे व हुतोक्षी रुस्तमफ्राम यांनी केले असून मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त द.म. सुकथनकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.