Jump to content

हैदराबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?हैदराबाद
तेलुगू : హైదరాబాదు
तेलंगणा • भारत
—  राजधानी  —
उजवीकडून : चारमिनार, सिकंदराबाद क्लॉक टॉवर, हायटेक सिटी, रामोजी फिल्मसिटी आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
उजवीकडून : चारमिनार, सिकंदराबाद क्लॉक टॉवर, हायटेक सिटी, रामोजी फिल्मसिटी आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
उजवीकडून : चारमिनार, सिकंदराबाद क्लॉक टॉवर, हायटेक सिटी, रामोजी फिल्मसिटी आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Map

१७° २१′ ४२″ N, ७८° २८′ २९″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
६५० चौ. किमी
• ५४२ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
समशीतोष्ण (Köppen)
• ८०३ मिमी (३१.६ इंच)
२६.० °C (७९ °F)
• २३.५ °C (७४ °F)
• ३०.३ °C (८७ °F)
प्रांत तेलंगणा
जिल्हा हैदराबाद, मेडक, रंगारेड्डी
लोकसंख्या
घनता
७७,४९,३३४
• ११,९२२/किमी
भाषा तेलुगू
नगराध्यक्ष बोंथु राममोहन
आयुक्त डॉ. बी. जनार्दन रेड्डी
स्थापित इ.स. १६००
संसदीय मतदारसंघ हैदराबाद
कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• +०४०
• IN-HYD
• TS07 ते TS14
संकेतस्थळ: हैदराबाद महानगरपालिकेचे संकेतस्थळ

हैद्राबाद हे भारतातील तेलंगणा राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हैद्राबादची इ. स. २००१ सालची लोकसंख्या ७७ लाख ४० हजार ३३४ आहे[१] मोत्यांचे शहर अशी या शहराची एकेकाळी ओळख होती. या शहराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यकला वारसा असल्याने पर्यटनस्थळ म्हणून हे शहर नावारूपास आले आहे. हे शहर दख्खन पठारावरील उर्दू साहित्यिक शहर आहे. शहरात १९९० नंतर शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ झाली दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटनिर्मितीचे हैद्राबाद अग्रगण्य केंद्र आहे.

२०१५ सालापर्यंत हैद्राबाद अखंड आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर होते. येथे चारमिनार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.रामोजी फिल्म सिटी हे आकर्षण स्थळ आहे. तसेच शहरामध्ये बिरला मंदिर, गोलकोंडा किल्ला इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत.

पाकिस्तानमध्येही सिंध प्रांतात एक हैद्राबादआहे. त्याच्याशी घोटाळा होऊ नये म्हणून तेलंगणातील हैदराबादला, हैदराबाद दख्खन म्हणायचा प्रघात आहे, तर पकिस्तानातील हैदाराबादला सिंध हैदराबाद.

इतिहास

[संपादन]
गोवळकोंडा किल्ला
चारमिनार

प्राचीन इतिहास

[संपादन]

इ. स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गोवळकोंडा येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून मुसी नदीच्या किनारी असलेल्या हैदराबाद केले. त्यानेच शहरात चारमिनार या वास्तूची उभारणी केली. गोवळकोंड्याहून राज्यकारभार हैद्राबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.

मोगल सम्राट औरंगजेबने इ. स. १६८७ मध्ये हैद्राबाद ताब्यात घेतले, औरंगजेबाचा मृत्यू इ. स. १७०७ मध्ये झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा निजाम उल मुल्क असलेल्या मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत हैद्राबादचे निजाम म्हणून राज्य केले. निजाम मुघलांच्या विपरीत असे मुस्लिम कट्टरवादी होते. शेवटचा (निजाम) मीर उस्मान अली खान होता.

आधुनिक इतिहास

[संपादन]

भारत इ. स. १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैद्राबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर इ. स. १९४८ला भारतीय संघराज्यात हैद्राबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेच्या धोरणानुसार मद्रास स्टेटमधून तेलुगूबहुल भाषकांचा भाग अलग काढून आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. हैद्राबाद शहर आणि त्याभोवतलाचा तेलंगण हा विभाग आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला आंध्र प्रदेशाची स्थापना झाली. हैद्राबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले.

तेलंगण भागाचे वेगळे राज्य व्हावे, यासाठी आंध्रप्रदेशच्या स्थापनेपासून चळवळ सुरू राहिली. अखेर जुलै इ. स. २०१३ मध्ये केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या मान्यतेनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीने तेलंगण या नव्या राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला आणि हैद्राबाद ही आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांची १० वर्षांसाठी राजधानी राहील हेही ठरवण्यात आले.[२]

भूगोल

[संपादन]
हुसेनसागर तलाव

हैदराबाद दक्षिण भारतात दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील भागात वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६५० चौरस किलोमीटर आहे. करड्या आणि गुलाबी ग्रॅनाईटपासून बनलेली खडकाळ चढउताराची जमीन हे हैदराबादच्या भूपृष्ठाचे वैशिष्ट्य. हैदराबाद समुद्रसपाटीपासून सरासरी ५४२ मीटर उंचीवर आहे. बंजारा हिल्स हा शहरातील सर्वात उंच भाग आहे. शहरात आणि सभोवताली इ. स. १९९६ पर्यंत १४०हून अधिक लहानमोठी तळी होती. इ. स. १५६२ मध्ये बांधलेला हुसेनसागर तलाव शहराच्या मध्यभागी आहे. चारमिनार आणि मक्का मस्जिद असलेले जुने शहर मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे. हा शहराचा जुना मध्यवर्ती भाग आहे. शहराचा नवा विस्तार चारही दिशांनी झाला आहे.

हैदराबाद दमट आणि कोरड्या कटिबंधीय वातावरणाचा संमिश्र अनुभव देणारे शहर आहे. शहराचे वार्षिक सरासरी तापमान २६ अंश सेल्शियस आहे. एप्रिल आणि जून दरम्यान शहराचे कमाल तापमान अनेकदा ४० अंश सेल्शियसवर जाते. जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात शहरात पाऊस पडतो.

प्रशासन

[संपादन]

शहराची देखभाल बृहद् हैदराबाद महानगरपालिका करते. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेची स्थापना एप्रिल २००७ मध्ये हैदराबाद महानगरपालिका आणि जवळच्या दोन जिल्ह्यांतील १२ नगरपालिकांचे विलीनीकरण करून झाली. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. हैदराबाद, रंगारेड्डी आणि मेदक या तीन जिल्ह्यांत तिचा विस्तार आहे. महानगरपालिकेचे १५० आहेत. हे वॉर्ड १८ मंडले आणि पाच विभाग (झोन्स) यात वाटले गेले आहेत. महापालिकेचे महापौर लोकांनी निवडलेले प्रमुख असतात,तर आयुक्त हे भारतीय प्रशासकीय सेवा दर्जाचे अधिकारी प्रशासकीय प्रमुख असतात.

याशिवाय आंध्र प्रदेश विधानसभा, आंध्र प्रदेश सचिवालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हैदराबादलाच आहेत. हैदराबाद महानगरपालिका क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे २४ विधानसभा मतदारसंघ आहेत. शहरात लोकसभेचे पाच मतदारसंघ आहेत

समाजरचना

[संपादन]
हैदराबादी बिर्याणी (डावीकडे) आणि इतर खाद्यपदार्थ

हैदराबादमध्ये हिंदूंची आणि मुस्लिमांची लोकसंख्या आहे. शहरात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीनंतर भारताच्या सर्व भागांतून मोठ्या प्रमाणात लोक हैदराबादला येऊन वसत आहेत, त्यामुळे शहराचे स्वरूप बहुभाषिक झाले. तेलुगू भाषेमध्ये "डेक्कनी उर्दू" नंतर सर्वात जास्त भाषिक आहेत.

याशिवाय तामिळ, कन्नड, गुजराती, राजस्थानी यासह अनेक भारतीय भाषा बोलणारे येथे राहतात. तेलुगू आणि उर्दूचा येथील हिंदीवर परिणाम होऊन हैदराबादी हिंदी ही नवी शैली पुढे आली. व्यापारउदीम, सरकारी कामकाजात इंग्रजीचाही वापर केला जातो. आपल्या खास पद्धतीच्या पक्वान्नांसाठीही, विशेषतः मांसाहारी पक्वान्नांसाठी, हैदराबाद प्रसिद्ध आहे. हैदराबादी बिर्याणी हा पदार्थ जगभरात नावाजलेला आहे.

उद्योगधंदे

[संपादन]

हैदराबाद ही पारंपरिकरीत्या, लसूण आणि मसाल्याचे पदार्थ, नारळ, सुपारी, केळी आदी फळांची मोठी बाजारपेठ होती. आजचे हैदराबाद मात्र माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शिक्षण, मनोरंजन या क्षेत्रात देशातील केंद्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांनी आपली कार्यालये येथे थाटली आहेत. औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे प्रकल्प हैदराबाद शहर आणि परिसरात आहेत. तेलुगू चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मिती उद्योगाचे हैदराबाद हे केंद्र आहे.

वाहतूक

[संपादन]

बसस्थानके

[संपादन]

हैदराबादेतील महात्मा गांधी बसस्थानक हे आशियातील पहिल्या पाच सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे. देशाच्या अनेक भागातून बसगाड्या येथे येतात. हैदराबाद शहर आणि परिसरात आंध्रप्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (एएसआरटीसी) या सरकारी महामंडळाच्या बसगाड्या धावतात.

रेल्वेस्थानके

[संपादन]

हैदराबाद डेक्कन (नामपल्ली), काचीगुडा आणि सिकंदराबाद ही तीन प्रमुख रेल्वे स्थानके शहरात आहेत. शहरात उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने या सेवेची इतर लहान स्थानकेही आहेत. हैदराबादच्या जुळ्या सिकंदराबाद शहरातच दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. रेल निलयम या संकुलात ते वसलेले आहे. हैदराबादहून देशाच्या सर्व भागांत जाण्यायेण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

मेट्रो

[संपादन]

हैदराबादेत २ मेट्रो मार्ग कार्यरत आहेत जे अमीरपेट स्थानकात एकत्र येतात. १. एलबीनगर ते मियापूर आणि २. अमीरपेट ते नागोल.

विमानतळ

[संपादन]

हैदराबादेत मार्च २००८ मध्ये शमशाबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नवा अत्याधुनिक विमानतळ चालू झाला. यापूर्वीचा बेगमपेट विमानतळ वाढत्या हवाई वाहतूक गरजांसाठी अपुरा पडू लागल्यानंतर हा नवा विमानतळ बांधून सुरू करण्यात आला. देशाच्या सर्व भागांत तसेच पश्चिम आशिया, आग्नेय आशियासह जगाच्या अनेक भागांत हैदराबादहून थेट विमानसेवा आहेत.

शहरांतर्गत वाहतुकीसाठी उपनगरीय रेल्वेसेवा, बससेवा व त्याशिवाय मीटरप्रमाणे पैसे घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी ऑटोरिक्षाही येथे आहेत.

क्रीडा

[संपादन]

क्रिकेट आणि फुटबॉल हे शहरातील लोकप्रिय खेळ आहेत. लाल बहादूर शास्त्री मैदान व उप्पलचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान या दोन मैदानांवर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतात. उप्पलचे मैदान हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे घरचे मैदान आहे. स्वर्णधारा प्रदेश क्रीडा संकुल हे मैदानी हॉकीचे केंद्र आहे तर गचीबावलीचे जी.एम.सी. बालयोगी मैदान अ‍ॅथलेटिक्स आणि पादकंदुकाचे केंद्र आहे.

रणजी करंडक या देशातील प्रथमश्रेणी क्रिकेटस्पर्धेत हैदराबाद क्रिकेट संघ भाग घेतो. इंडिअन प्रिमिअर लीगमधील २०१२ पर्यंत डेक्कन चार्जर्स या संघाचे मुख्यालय हैदराबाद शहरात होते, यानंतर हा संघ आयपीएलमधून बाद कराण्यात आला. डेक्कन चार्जर्स बाद झाल्यानंतर २०१३मध्ये हैदराबादचाच नवीन संघ आयपीएल मध्ये समाविष्ट करण्यात आला तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. हा संघ आयपीएलमध्ये हैदराबाद शहराचे प्रतिनिधित्व करतो. सिकंदराबाद क्लब, निजाम क्लब, हैदराबाद रेस क्लब, आंध्र प्रदेश मोटर स्पोर्ट्स क्लब, हैदराबाद गोल्फ क्लब हे शहरातील प्रसिद्ध क्लब आहेत.

प्रसिद्ध खेळाडू

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

साहित्य

निझामाच्या काळात राजाश्रय मिळाल्याने हैदराबादमध्ये उर्दू साहित्य भरभराटीला आले. या काळात उर्दू साहित्यिकांचे मुशायरे (संमेलने) होत. उर्दू त्याचप्रमाणे तेलुगू साहित्य प्रसिद्धीचे महत्त्वाचे केंद्र अशी हैदराबादची ओळख झाली. इ. स. २०१० पासून शहरात दरवर्षी हैदराबाद लिटररी फेस्टिव्हल भरवला जातो. त्यात देशपरदेशातले साहित्यिक सहभागी होतात.

कला आणि चित्रपट

१६ व्या शतकापासून हैदराबादेत कथ्थक नृत्याला आश्रय मिळाला आहे. तेलुगू चित्रपट उद्योगाचे हैदराबाद हे केंद्र आहे. त्यामुळे तेलुगू चित्रपटनिर्मिती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडच्या काळात दूरचित्रवाणी उद्योगही हैदराबादेत विस्तारला आहे. हैदराबादजवळच्या रामोजी फिल्म सिटीने मनोरंजन उद्योगात देशात अनेक सन्मान मिळवले आहेत

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ population Government of India. Retrieved 8 December.
  2. ^ "Telangana will be India's 29th State". The Hindu. 30 जुलै, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)