Jump to content

बाळ ठाकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाळासाहेब ठाकरे या पानावरून पुनर्निर्देशित)
बाळ ठाकरे
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी बाळ ठाकरे (इ.स. २०१२)
जन्म जानेवारी २३, इ.स. १९२६
पूना, बॉम्बे, ब्रिटिश राज
मृत्यू १७ नोव्हेंबर, २०१२ (वय ८६)
मातोश्री, कलानगर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका
चिरविश्रांतिस्थान शिवाजी पार्क, दादर, मुंबई, महाराष्ट्र
निवासस्थान मातोश्री, कलानगर, वांद्रे, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतभारतीय
टोपणनावे बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट
नागरिकत्व भारतीय
पेशा व्यंगचित्रकार, राजकारणी
कारकिर्दीचा काळ इ.स. १९५०-इ.स. २०१२
प्रसिद्ध कामे शिवसेना पक्षाची स्थापना
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू
जोडीदार मीना ठाकरे
अपत्ये उद्धव, बिंदूमाधव, जयदेव
वडील केशव सीताराम ठाकरे
आई रमाबाई केशव ठाकरे
नातेवाईक राज ठाकरे (पुतण्या)
संकेतस्थळ
shivsena.org

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. ते हिंदुत्ववादी, दक्षिणपंथी नेता, व मराठी लोकांचे समर्थक होते. 'सामना' या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. त्यांचे कार्य प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात होते.[]

व्यंगचित्रकार

[संपादन]

ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.[]

'मार्मिक’ साप्ताहिक

[संपादन]

बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. इ.स. १९६० पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍याम" या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.[ संदर्भ हवा ]

शिवसेना पक्ष

[संपादन]
मुख्य लेख: शिवसेना

ठाकरेंनी जून १९, इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, 'समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.' शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता.[ संदर्भ हवा ] या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.

सामना वृत्तपत्र

[संपादन]

वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. प्रबोधनकार ठाकरेप्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात संपादक म्हणून बाळ ठाकरे यांचे अग्रलेख असे.[ संदर्भ हवा ]

राजकीय कार्य

[संपादन]

झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती.[ संदर्भ हवा ] व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.[ संदर्भ हवा ]

हिंदुत्ववाद

[संपादन]

ठाकरे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हणले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणाही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.[ संदर्भ हवा ]

निधन

[संपादन]

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.[].

ठाकरेंवरील प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • 'जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे (लेखक: प्रकाश अकोलकर)
  • पहिला हिंदुहृदयसम्राट (लेखक: अनंत ओगले)
  • बाळासाहेब : एक अंगार (लेखक: नागेश शेवाळकर)
  • बाळासाहेब ठाकरे (लेखक: यशराज पारखी)
  • हृदयसम्राटाची जीवनगाथा (भारत भांड यांनी लिहिलेला पोवाडा आणि गीतांची सीडी)

चित्रपट

[संपादन]

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला. याची निर्मिती संजय राऊत यांनी केली होती, तर नवाजुद्दीन सिद्दिकी हे ठाकरेंची भूमिकेत होते.

संस्था

[संपादन]
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर) वैद्यकीय महाविद्यालय (विले पार्ले)[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Bal Thackeray and his controversial legacy". India Today (इंग्रजी भाषेत). 2012-11-15. 2024-11-21 रोजी पाहिले.
  2. ^ बाल ठाकरे की पसंदीदा कार्टून कैरेक्टर थी इंदिरा गांधी. BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 16-03-2018 रोजी पाहिले. काँग्रेस के ख़िलाफ राजनीति करने वाले बाल ठाकरे ने अपनी कूची से इंदिरा गांधी पर कई बार निशाना साधा. लेकिन उसी बाल ठाकरे ने उनकी हत्या पर उन्हें श्रद्धांजलि भी कार्टून बनाकर दी. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "बाळासाहेब ठाकरे यांचे निधन". 2013-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत