उल्हास नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उल्हास नदी
उल्हास नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र

उल्हास नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो आणि पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती १२२ किलोमीटरचे अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. खोपोली, उल्हासनगर, ठाणे अशा महानगरांतून प्रदूषित होत पुढे अरबी समुद्राला मिळणाऱ्या या नदीच्या मुखात साल्सेट बेटावर मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे व भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर वसलेले आहे.

उल्हास नदीचा उगम लोणावळा येथील राजमाची परिसरातील तुंगार्ली धरणात होतो. धरणापासून ३ कि.मी. अंतरावर नदीवर खंडाळा येथे भारतातील १४व्या क्रमांकाचा प्रसिद्ध कुणे धबधबा आहे. पुढे ही नदी रायगड जिल्ह्यात कोंडिवडे, खांडपे, कर्जत, नेरळ,कोदिवले, दहीवली,बिरदोले,शेळु ही प्रमुख गावे व शहरांतून वहात जाऊन ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. ठाणे जिल्हयात वांगणी, बदलापूर, वसत, शहाड, मोहोने, कल्याण ही प्रमुख शहरे व गावे घेत पुढे शहाड येथे वालधुनी नदीला घेऊन दोन तीन किलोमीटर अंतरावर अटाळी येथे काळू नदीला मिळते व पूढे अरबी समुद्रास मिळते. उल्हास नदीला दिवा गावापासून पुढे वसईची खाडी असे म्हणतात.

कोकणातल्या अन्य नद्यांप्रमाणेच उल्हास नदी पावसाळ्यात अनेकदा दुथडी भरून वाहते. पेज, चिल्हार, पोशीर अशा नद्या उल्हास नदीस येऊन मिळतात. बोरघाट, भीमाशंकर तसेच माथेरानचा डोंगर या परिसरांत पडणारे पावसाचे पाणी अरबी समुद्रात वाहून नेणारी ही मुख्य Drainage System आहे.

पूर[संपादन]

२६ जुलै २००५ च्या ज्या दिवशी मुंबईत मिठी नदीच्या प्रलयात विद्ध्वंस झाला होता, त्याच दिवशी उल्हास नदीलाही पूर आला होता. त्यावेळी बदलापूरजवळ ब्रिटिशकालीन बॅरेजचे (छोट्या धरणाचे) लोखंडी दरवाजेही वाहून गेले होते. बदलापूर ते कल्याण परिसरात त्यावेळी प्रचंड नुकसान झाले होते.

वांगणी-बदलापूर दरम्यान मध्य रेल्वेचा लोहमार्ग उल्हास नदीच्या अगदी जवळून म्हणजे काही फुटांवरून जातो. २६/७/२००५ च्या पुरादरम्यानही या ट्रॅकवर पाणी आले होते आणि त्यामुळं ट्रेन वाहतूक जवळपास आठवडाभर बंद होती.

त्याआधी १९८९ साली उल्हास नदीला महापूर आला होता आणि कर्जतमध्येही मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्यात आली. घरे उंचावर बांधण्यात आल्याने त्यामणतर तिथे मोठे नुकसान झाले नाही.

कल्याण-भिवंडी परिसरात मात्र वाढते शहराचे विस्तार व पूररेषेच्या आतच असलेली बांधकामे यामुळे तेथे उल्हास नदीच्या पुराचा धोका वाढलेला आहे.

उल्हास नदीच्या उपनद्या[संपादन]

१) साल्पे नदी (खांडपे येथे संगम)

२) पायारमल नदी (नेरळ येथे संगम)

३) पोशीर नदी (वांगणी, डोने येथे संगम)

४) तीन ओढे (देवलोली येथे संगम)

५) बारवी- मुरबाडी नदी (वसत येथे संगम)

६) काळू- भातसा नदी (आंबिवली येथे संगम)

७) वालधुनी नदी (शहाड येथे संगम)

८) पेज नदी

९) चिल्हार नदी

या नदीकिनाऱ्यावर शहाड येथे पाचवामैल आणि वसत येथे खूप सुंदर शिव मंदिरे आहेत. शहाडचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे.