Jump to content

पवई तलाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पवई तलाव

पवई तलाव मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी हा सर्वात प्रसिद्ध तलाव आणि मुंबईतील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तलावाच्या बाजूलाच जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. हा राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग असल्यामुळे याच्या एका बाजूला हिरवीगार झाडे व एक टेकडी आहे ज्याचे रूपांतर आता आंबेडकर उद्यान असे करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या बाजूला सरकारने बसण्यासाठी लांबलचक कट्टा व चालण्यासाठी पदपथाची सोय केली आहे.

इतिहास आणि सद्यस्थिती

[संपादन]

पवई नावाच्या गावातल्या झोपडय़ा हलवल्यानंतर तिथे पवई तलाव नावाचा कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आणि बघता बघता आसपासच्या परिसराला त्याच तलावाचं नाव मिळालं. पवई तलाव हा मिठी नदी आणि विहार सरोवराला लागूनच आहे. या तलावाचं क्षेत्रफळ २.१ चौरस किमी आणि त्याची खोली तीन मीटर(परिघापासून) ते १२ मीटर खोल आहे. सध्या ज्या जागेवर तलाव आहे ती जागा १७९९ मध्ये म्हणजे पवई तलाव बांधण्यापूर्वी डॉ. स्कॉट यांना वार्षिक भाडेपट्टीसाठी दिली होती. स्कॉट यांच्या मृत्यूनंतर ती जागा १८१६ मध्ये गव्हर्नमेंटने आपल्या अखत्यारीत घेतली आणि १८२६ मध्ये ती पुन्हा एकदा अ‍ॅग्रीकल्चर अँड हॉल्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाचे व्हाइस प्रेसिडंट फ्रामजी कावसजी यांना भाडेपट्टीवर दिली.

त्यानंतर १८९१ मध्ये तिथे तलाव बांधण्यात आला तेव्हा त्या तलावाला फ्रामजी कावसजी यांचं नाव दिलं गेलं. पवई गावाला पाणीपुरवठा करण्याची गरज भासू लागली तेव्हा मिठी नदीच्या प्रवाहात १० मीटर उंचीची दोन धरणं बांधण्यात आली. पूर्व-उत्तर-पश्चिमेला असलेल्या डोंगरावरून वाहत येणारे पवासाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी आणि दुष्काळी काळात मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी या धरणाची निर्मिती करावी असा प्रस्ताव १८८९ मध्ये मांडण्यात आला. सुरुवातीला दोन मिलिअन गॅल्टॉन पाणीपुरवठा करण्यासाठी ६,५०,००० खर्च येत होता. या योजनेवर अंदाजे पाच लाख रुपये खर्च होत होता. मात्र कालांतराने तलावात सांडपाणी, झाडं, फुलं, कचरा, कंद, तण आणि मोठय़ा प्रमाणात वाहून आणलेला गाळ साचला गेल्याने १८९० मध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यावर बंदी घातली गेली. त्यानंतर वेस्टर्न इंडिया फिशिंग असोसिएशन मासेमारीसाठी या तलावाचा वापर करत असत. त्यानंतर ही संस्था द बॉम्बे प्रेसिडन्सी ॲंगलिंग असोसिएन या नावाने आणि नंतर द महाराष्ट्र स्टेट ॲंगलिंग असोसिएशन या नावाने ओळखली जाऊ लागली.

महानगरपालिकेच्या अख्यत्यारित असलेल्या या तलावाची स्वच्छता, देखभाल आणि आसपासच्या परिसराचं सौंदर्य टिकवण्याचं काम सध्या द महाराष्ट्र स्टेट ॲंगलिंग असोसिएशन(एमएसएए) ही संस्था करते आहे. एल अँड टी(लार्सन अँड टुबरे)कंपनीवरून गाडी वळली की पवई परिसराला सुरुवात होते. थोडंसं पुढे गेलं की?मध्येच तलाव दिसतो. हाच तो पवईचा तलाव. या तलावाच्या नावाची मात्र कुठेही पाटी नाही. तलावाला एका बाजूने संपूर्ण तटबंदी घालण्यात आली असून तिथे बसण्याची आणि फिरण्यासाठी चौपाटीप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तिथे वॉक करणारी कित्येक मंडळी दिसतात. आजूबाजूला गवताचे छोटे छोटे उंचवटे असून तिथे लहान-मोठी शिल्प बांधली आहेत. मात्र ती शिल्प कोणी बांधली आहेत याची काहीच माहिती नाही. तिथूनच शांत तलाव आणि दूरवर पसरलेला आसपासचा परिसर नजरेत भरतो. तलावाच्या सुरुवातीलाच काही भाग बाजूला काढून तिथे बांध टाकला असून त्याच ठिकाणी बोटिंगची व्यवस्था केलेली दिसते.? मात्र तिथे जाण्यासाठी एकच मार्ग असून तो पटकन दिसत नाही. तिथेच मुलांना खेळण्यासाठी छोटंसं उद्यानदेखील आहे. आणि इतर कोणत्याही ठिकाणांप्रमाणे या ठिकाणीही प्रेमी युगुलांचा अड्डा जमलेला दिसतो.

या तलावात जाण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्या असल्या तरी तलावाच्या पाण्यात मगरी असल्याने खाली उतरण्यास मनाई आहे. महानगरपालिकेचा एक कर्मचारी त्यासाठी तिथे सदैव तत्पर असतो. मात्र निर्माल्य टाकण्यासाठी कित्येक जण येतात. अधून मधून तिथे पाणीपुरवठय़ासाठी लावण्यात आलेल्या फिरक्याही दिसतात. सभोवताली नजर टाकली की इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग (निटी) आणि हिरानंदानीच्या वैशिष्टय़पूर्ण इमारती सहज दिसतात. बाजूला ‘पवई निसर्ग उद्यान’ नावाचं उद्यान आहे. त्या उद्यानातून तलावात संगीत कारंज्याची सोय केली आहे. संध्याकाळी ७.३० ते ८.०० आणि ८.३० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत या कालावधीतच हे कारंज पाहायला मिळतं.