जालना जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख जालना जिल्ह्याविषयी आहे. जालना शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


जालना जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
जालना जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय जालना
तालुके जालनाअंबडभोकरदनबदनापूरघनसावंगीपरतूरमंठाजाफ्राबाद
क्षेत्रफळ
 - एकूण ७,६१२ चौरस किमी (२,९३९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १९,५९,०४६ (२०११)
-लोकसंख्या घनता २५७ प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७३.६१
-लिंग गुणोत्तर १०७ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
-लोकसभा मतदारसंघ जालना (लोकसभा मतदारसंघ)
-विधानसभा मतदारसंघ बदनापूर (अनुसूचित जाती), भोकरदन, घनसावंगी,जालना,परतूर
-खासदार रावसाहेब दानवे
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ७६३ मिलीमीटर (३०.० इंच)
प्रमुख_शहरे जालना व सर्व तालुके
संकेतस्थळ


जालना जिल्‍हा हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्‍ह्याचे अक्षवृत्तीयरेखावृत्तीय स्‍थान म्‍हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश.

मराठवाड्यातील कुंडलिका नदीच्या काठी वसलेले जालना हे शहर  व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. धनवान मोहम्मदच्या चपळ व्यावसायिक कौशल्यामुळे शहराचा उदय झाला, ज्याने या स्थानाची अफाट क्षमता ओळखली आणि त्याचा फायदा करून घेतला. त्यांच्या आश्रयानेच जालना नावारूपास आले आणि विणकामाची प्राचीन कलाकुसर (जुलाहा) येथे भरभराटीस आली, ज्यामुळे शहराची प्रतिष्ठा आणि समृद्धी वाढली. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामशाही राज्‍याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर तो छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यामधील एक (जालना) तालुका झाला.

जालना हा औरंगबाद च्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्‍हा’ झाला. औरंगबाद जिल्‍ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे ४ तालुके व परभणी जिल्‍ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्‍ह्यामध्‍ये समाविष्ट झाले. जालना जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस परभणीबुलढाणा जिल्‍हा असून, औरंगाबाद जिल्हा पश्‍चिम दिशेला आहे. उत्तरेला, जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्‍हा आहे.

जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील जालन्याशी राज्‍य महामार्गांनी जोडलेली आहेत. जालना जिल्‍हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

जालना जिल्‍ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्राम महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. जनार्दन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्‍या प्राणांची आहुती दिली आहे.

हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत.

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मि.मी. इतके आहे. तरीसुद्धा अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीवर खरीप पिके निघतात, तर त्यांतली ४०% रब्बी पिकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये, कापूस ही प्रमुख पिके आहेत.

जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते हातमागयंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. बिडीचेही कारखाने आहेत.

स्थान व भौगोलिक परिस्थिती[संपादन]

जालना जिल्हा राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते.

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७७१८ चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत २.५१ % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या १.३२ % म्हणजे १०२ चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले ९८.६८ % म्हणजे ७६१६ चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. प्रशासकीय सोयीसाठी या जिल्ह्यात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण ८ तालुके असून, या आठ तालुक्याच्या आठ तहसिलींकरिता चार उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे आहे.  प्रत्येक तहसीलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली ८ पंचायत समित्या कार्यरत आहेत.

जनगणना २०११ नुसार जिल्ह्यात एकूण ९७१ गावे असून त्यापैकी ९६३ गावे वस्ती असलेली व ८ गावे ओसाड आहेत. जिल्ह्यात ८०६ स्वतंत्र ग्रामपंचायती व १५७ गटग्रामपंचायती आहेत. जिल्हा मुख्यालय जालना येथे असून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध खात्यांची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. जिल्ह्यात जालना, अंबड परतूर व भोकरदन या चार ठिकाणी नागरी क्षेत्र असून त्यासाठी नगरपरिषदा आहेत. जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी या तहसीलच्या ठिकाणी नगरपंचायती आहेत. जालना नगरपरिषद ‘अ’ वर्गीय असून अंबड, परतूर, भोकरदन, या तीन नगरपरिषदा ‘क’ वर्गीय आहेत. जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन परतूर व मंठा या पाचही ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत.

नदी नाले[संपादन]

जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत गोदावरी नदी अंदाजे ६० कि.मी. इतकी जिल्ह्यातून वाहते. त्यामुळे जिल्ह्याचा दक्षिण भाग गोदावरीच्या खोऱ्यात मोडतो. दुधनागल्हाटी या गोदावरीच्या उपनद्या मध्य भागातून तर उत्तर भागातून पूर्णा, खेळणागिरजा या उपनद्या वाहतात. कुंडलिका ही दुधनाची उपनदी जालना शहरातून वाते.

गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते. गोदावरी नदी औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून जिल्ह्यात प्रवेश करते. तिचा जिल्ह्यातील प्रवास अंबड व परतूर तालुक्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून होतो. कुंडलिकाने जिल्ह्याची संपूर्ण दक्षिण सीमा सीमित केली आहे. ती जालना व बीड या दोन जिल्ह्यांमधील प्रमुख उपनदी असून ती औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्यात प्रवेशते व अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमा भागात गोदावरीस मिळते.

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठ्याच्या डोंगररांगांत उगम पावलेली पूर्णा नदी जालना जिल्ह्यात भोकरदन तालक्यात प्रवेशते. ही नदी भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यांमधून प्रवास करीत बुलढाणा जिल्ह्यात जाते व बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा ती जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात प्रवेश करते. खेळणा, गिरजा, जुई, जीवरेखा, धामना या पूर्णेच्या प्रमुख उपनद्या होत. भोकरदन हे खेळणा नदीकाठचे तालुक्याचे ठिकाण प्रसिद्ध आहे.

दुधना ही जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक महत्त्वाची नदी होय. औरंगाबाद जिल्ह्यात उगम पावणारी ही नदी सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या मध्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते व पुढे परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. जिल्ह्यातील तिचा प्रवास जालना व परतूर या तालुक्यांमधून होतो. कुंडलिका व कल्याण या जालना जिल्ह्यातील दुधनेच्या प्रमुख उपनद्या होत.

जमिनीचा प्रकार[संपादन]

जालना जिल्ह्यातील जमीन सुपीक व काळी असून कापसाच्या पिकासाठी योग्य आहे. जालना, बदनापूर, भोकरदन व जाफ्राबाद या तहसीलींमधील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या भागात प्रामुख्याने खरीपाची पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या दक्षिण व आग्नेय भागातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तहसीलींमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. या जमीनीत कापसाचे व रब्बीचे पीके चांगल्या प्रमाणात येते. जिल्ह्याच्या उत्तर भागात विहिरी खोदल्या जाऊ शकत असल्या तरी जमिनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल असून भूगर्भातील पाणी अपुऱ्या प्रमाणात आढळते. ते बारमाही पिकासाठी अपुरे पडते.

वने[संपादन]

जिल्ह्यात वनक्षेत्र फारच कमी व तुरळक असून उत्पादनाच्या दृष्टीने हलक्या दर्जाचे आहे. उपवनसंरक्षक, वनविभाग, औरंगाबाद, यांचेकडील उपलब्ध माहितीनुसार जालना जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र १०१.१८ चौ. कि.मी. आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते १.३१% येते. महाराष्ट्र राज्यात ५२१४ हजार हेक्टर जंगलव्याप्त क्षेत्र असून त्याची भौगोलिक क्षेत्राची टक्केवारी १६.९५ % आहे. राज्यातील बाकी एकूण जंगलव्याप्त क्षेत्राशी जिल्ह्याच्या वनक्षेत्राशी तुलना करता फक्त ०.१२ % येते. यावरून जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र खूपच कमी असल्याचे दिसून येते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत गावातील गायरान जमिनी व रस्त्याच्या कडेने वर्गीकरण केले जात आहे. पर्यावरणाच्या समतोल राखण्याच्या दृष्टीने जंगलव्याप्त क्षेत्र साधारणपणे ३३% असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्र अतिशय कमी आहे.

विद्युत निर्मिती, पुरवठा व वापर[संपादन]

विद्युत निर्मितीचा एकही प्रकल्प या जिल्ह्यात नाही. राज्य विद्युत मंडळामार्फत कोयना, पारस, परळी अशा नजीकच्या प्रकल्पापासून वीज पुरवठा केला जातो. जिल्ह्यात चारही शहरांचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यात १०० % विद्युतीकरणामुळे विजेची मागणी वाढत असून, २,२७,००० कनेक्शने देण्यात आली आहेत.

खाणी व कारखाने[संपादन]

जिल्ह्यात एकूण ११६ नोंदणी झालेले कारखाने असुन या कारखान्यातील कामगार संख्या २६६७ इतकी आहे. त्यापैकी १४ कारखाने बंद आहेत. २००८ मध्ये तर दर लाख लोकसंख्येमागे या कारखान्यातील कामगारांची संख्या १६५ होती. धान्य गिरणी उत्पादनांसंबधी २० चालू कारखाने असून त्यात २२९ कामगार आहेत. मूलभूत लोह व पोलादाचे उत्पादन करणारे ३४ चालू कारखाने असून त्यांत १५१९ कामगार आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांमधून २००८ साली कामगारांनी काम केलेल्या श्रमदानांची संख्या ४.७३ लक्ष आहे, ही मागील वर्षीपेक्षा कमी आहे.

आर्थिक गणना[संपादन]

१९९८ नंतर आर्थिक गणना २००५ मध्ये घेण्यात आली. १९९८ च्या गणनेनुसार जिल्ह्यात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळुन एकूण ४०,४७७ उद्योग आहेत. त्यापैकी २९,८३० स्वयंकार्यरत उद्योग तर १०,६४७ आस्थापना होत्या. २००५ च्या गणनेनुसार जिल्ह्यात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळून एकूण ६०,१८३ उद्योग आहेत. त्यापैकी ३५,८४८ स्वयंकार्यरत उद्योग तर २४,३३५ आस्थापना आहेत. मालकीच्या प्रकारानुसार सर्वात जास्त म्हणजे ५५,३२८ खाजगी, ४,३७७ सार्वजनिक व ४७८ सहकारी उद्योग आहेत. खाजगी उद्योगाची एकूण उद्योगाशी टक्केवारी ९१.९२ % येते. या उद्योगापैकी ४४,३५० (७३.६८%) ग्रामीण तर १५,८३३ (२६.३२%) नागरी भागात आहेत. अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांची उद्योगाचे मालक म्हणून एकूण संस्थेची टक्केवारी अनुक्रमे ७.४४ व ३.९० येते. जागेविरहित कार्यान्वित असलेल्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी ३०.५३ आहे. शक्तीवर चालणाऱ्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी १२.५४ येते. जिल्ह्यात या गणनेनुसार १,६७,९२० कामगार आहेत. त्यापैकी ९४,२९५ (५६.१५ %) वेतनावर काम करणारे आहेत. प्रतिआस्थापना कामगारांची सरासरी संख्या ७ आहे. जिल्ह्यात दर लाख लोकसंख्येमागे आस्थापनांची संख्या १,५१० आहे.

शिक्षणाच्या सोयी[संपादन]

जालना जिल्ह्यात १,५८९ प्राथमिक २१७ माध्यमिक व ३० उच्च माध्यमिक शाळा होत्या त्यापैकी बहुतांश प्राथमिक शाळा ग्रामीण भागात आहेत. दर लाख लोकसंख्येमागे ९९ प्राथमिक तर १५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ष २००९-१० मध्ये जिल्ह्यात ४२ महाविद्यालये असून त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ९,३५४ आहे. एकूण ४,०७,८२९ विद्यार्थ्यांपैकी ५७.६४ % विद्यार्थी प्राथमिक शाळांत, ३९.९१ % विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत तर उर्वरित २.४५ % विद्यार्थी महाविद्यालयांत आहेत. जिल्ह्यासाठी प्राथमिक शाळेतील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे, व माध्यमिक शाळांमधील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे.

वैद्यकीय व आरोग्य सेवा[संपादन]

जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा राज्य शासन, स्थानिक संस्था व खाजगी संस्थामार्फत पुरविण्यात येते. जिल्ह्यात १२ रुग्णालये, १२ दवाखाने व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत होती. या सर्व संस्थांमधून १,१६३ खाटांची सोय होती. त्यात ७२,१०० आंतर रुग्ण व ७,४०,३०० बाह्य रुग्णांनी उपचार घेतले. सामान्य रुग्णालय, जालना यांचे अंतर्गत ८ ग्रामीण रुग्णालये आहेत. ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेमार्फत चालविली जातात. १,४७,००० लोकसंख्येसाठी १ रुग्णालय तर ४०,३२४ ग्रामीण लोकसंख्येमागे १ प्राथमिक आरोग्य केंद्र व दर लाख लोकसंख्येमागे ७२ खाटा असे प्रमाण आढळते.

धर्म[संपादन]

जालना जिल्ह्यातील धर्म (२०११)
धर्म प्रमाण
हिंदू
  
76.80%
इस्लाम
  
14.00%
बौद्ध
  
7.79%
ख्रिश्चन
  
0.64%
इतर
  
0.02%
निधर्मी
  
0.18%

२०११ च्या जनगनणेनुसार जालना जिल्हातील धर्मनिहाय लोकसंख्या

  • एकूण - १९,५९,०४६

धार्मिक स्थळे व पर्यटन[संपादन]

जालना जिल्ह्यात महत्त्वाची / प्रसिद्ध पर्यटन केंद्रे आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत. जालना शहराची मुघल कालीन जवळपास इ.स. 450 वर्षापूर्वीची काली मस्जिद जालना, शरीफ जैनउल्ला शाह साहब रहमतुल्ला आणि बाबुल शाह रहमतुल्ला मियासाहेब दारगाह, राजाबाग सवार दारगाह, मंमादेवी मंदिर, शनिमंदिर, आनंदस्वामी मठ, इंग्रज काळातील ख्रिस्ती धर्मीय क्राईस्त चर्च, दुर्गामाता मंदीर प्रसिद्ध असुन, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास इ.स. ४०० वर्षापूर्वीचा चौघडा व कल्याणस्वामींचा मृदुंग तसेच वेणूबाईचा तानपुरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. अंबड पासून १५ कि.मी. परांडा ता.अंबड जि. जालना येथे हजरत सैय्यद हाफिज अलाउद्दीन जिया चिश्ती रहमतुल्लाह अलाही उर्फ सकलाधी बाबा यांची दर्गा आहे व अंबड तालुक्यातील (पराडा वनारसी भारती बाबा बारा जोतीलिंग पराडा येथे खूप मोठे मंदिर आहे व येथे दिवाळीच्या वेळेस सप्ताह असतो). शिवाय रवना पराडा ता. अंबड येथे प्रसिद्ध दर्गा सकलाधी बाबा असून तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो.गणपती राजूर येथे आहे. (घनसांवगी तालुक्यातील जांमसमर्थ येथील. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदिरही आहे). हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पहेी आहेत. वालसावंगी येथील चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे. तसेच येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रसिद्ध आहे.

रोहिलागड हा जालना जिल्ह्यातील अर्धवट मानला जाणार किल्ला आहे तर मस्तगड हा एक मुघल कालीन किल्ला असून येथे नगरपालिके चे जुने कार्यालय आहे

हवामान[संपादन]

समुद्रकिनाऱ्यापासून अधिक अंतरावर असलेल्या व खंडांतर्गत स्थान लाभलेल्या या जिल्ह्याचे हवामान स्वाभाविकच विषम व कोरडे आहे. येथील उन्हाळा अतिशय कडक असून हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो. एप्रिल- मे महिन्यात तापमान ४१ सेल्सिअसच्या पुढे जाते दैनिक व वार्षिक तापमानकक्षेतील फरक अधिक असतो. तौलनिकदृष्टया जिल्ह्यातील पर्जन्यप्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी अवघा ४५ से. मी. इतका कमी पाऊस पडतो. त्यातही पावसाचे वितरण असमान आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. अंबड, परतूर, व मंठा या तालुक्यांमध्ये तुलनात्मकदृष्टया अधिक पाऊस पडतो. तर जाफ्राबाद, भोकरदन तालुक्यात कमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. जिल्ह्यास अल्प प्रमाणात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचाही लाभ होतो.

२०१७ मध्ये जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली, परंतु जुलैपैसून पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीप हंगाम अडचणीत आला.

अर्थकारण[संपादन]

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे जालना जिल्ह्यातील रोजगाराचे प्रमुख साधन शेती हे आहे. हा जिल्हा देशात मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच या जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने ५०० हेक्टर क्षेत्रावर हे प्रकल्प उभारला जात आहे. मराठवाड्यातील शेतमाल व औद्योगिक उत्पादने थेट मुंबईतील न्हावा शेवा पोर्ट ट्रस्टपर्यंत पोहोचविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या ड्रायपोर्ट जवळून मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग तयार केला जाणार आहे. त्याद्वारे उत्पादने थेट मुंबईपर्यंत पोचविली जातील.

जिल्ह्यातील बाजारपेठा[संपादन]

कुंभार पिंपळगाव, रजनी, जाफराबाद, तीर्थपुरी, नेर, परतूर, मंठा, राजूर, रामनगर, सेवली. पिंपळगाव (रेणूकाई), वालसावंगी, अंबड, घनसावंगी

संदर्भ[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]