महाराष्ट्र टाइम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्र टाईम्स
प्रकार दैनिक

मालक बेनेट कोलमन आणि कंपनी
प्रकाशक द टाइम्स वृत्तसमूह
मुख्य संपादक अशोक पानवलकर
स्थापना १८ जून १९६२
भाषा मराठी
किंमत ४ रू.मुंबई,पुणे,जळगांव,३ रू.इतर ठिकाणी
मुख्यालय भारत मुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वृत्तपत्रे टाईम्स प्रॉपर्टी शनिवारी, संवाद रविवारी, मैफल शनिवारी

संकेतस्थळ: महाराष्ट्रटाईम्स.कॉम


महाराष्ट्र टाइम्स हे मुंबईतून प्रसिद्ध होणारे मराठी दैनिक आहे. ते 'टाइम्स ऑफ इंडिया' (बेनेट, कोलमन अँड कंपनी लिमिटेड) गटाच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. श्री. द्वा.भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, मा. पं. शिखरे, दि. वि. गोखले, कुमार केतकर, भरतकुमार राऊत असे नामवंत पत्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक पदी होते. श्री. अशोक पानवलकर हे विद्यमान संपादक आहेत. प्रत्येक आवृत्तीस संपादक आणि प्रकाशक वेगवेगळे आहेत.

स्थापना[संपादन]

'महाराष्ट्र टाइम्स'ची स्थापना महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार झाली.'महाराष्ट्र टाइम्स' सुरु करण्यामागील प्रेरणा श्री. यशवंतराव चव्हाण यांचीच असल्याचे बेनेट, कोलमन अँड कंपनी लिमिटेड कंपनीचे तत्कालिन अध्यक्ष शांतीप्रसाद जैन यांनी जाहीरपणे सांगितले होते.[१]पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभात श्री.शांतीप्रसाद जैन यांनी ही माहिती दिली. यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.[२]यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,"टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल.मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर पत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे." ही माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'च्या १९ जून १९६२ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली.[३]

पहिला अंक[संपादन]

'महाराष्ट्र टाइम्स'चा पहिला अंक १८ जून १९६२ रोजी प्रसिद्ध झाला.त्यावेळी मोठा समारंभ करण्यात आला. योजनेनुसार जानेवारीपासून वृत्तपत्र सुरु होणार होते. तथापि कागदाचा पुरवठा होण्यात आणि अन्य काही बाबतीत अनेक अडथळे आल्याने ते जूनमध्ये सुरु झाले. जानेवारीत नेमलेल्या अनेक पत्रकारांना सहा महिने बेकार राहावे लागले होते. या पहिल्या अंकाच्या संपादक पदाची सूत्रे ज्येष्ठ पत्रकार द्वा.भ.कर्णिक यांच्याकडे देण्यात आली होती.

पहिले संपादक मंडळ[संपादन]

संपादक म्हणून द्वा.भ.कर्णिक यांची, पहिले सहसंपादक म्हणून गोविंद तळवलकर, दुसरे सहसंपादक म्हणून मा. पं. शिखरे यांची नियुक्ती झाली. वृत्तसंपादक पदावर दि. वि. गोखले यांची नियुक्ती झाली. पंढरीनाथ रेगे, रामचंद्र माधव पै, चंद्रकांत ताम्हणे, अनंत मराठे, मनोहर साखळकर, माधव गडकरी, दिनू रणदिवे, शंकर सारडा असे अनुभवी पत्रकार पहिल्या संपादक मंडळात होते.[४][५]

विविध आवृत्त्या[संपादन]

 1. मुंबई मुंबई टाइम्स
 2. पुणे पुणे प्लस
 3. अहमदनगर अहमदनगर टाइम्स
 4. औरंगाबाद औरंगाबाद टाइम्स
 5. जळगांव
 6. कोल्हापूर कोल्हापूर टाइम्स
 7. नागपूर नागपूर प्लस
 8. नाशिक नाशिक प्लस
 9. नवी मुंबई नवी मुंबई प्लस
 10. पालघर पालघर पुरवणी
 11. ठाणे ठाणे प्लस

संदर्भ[संपादन]

 1. रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२५,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-
 2. रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२६,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-
 3. रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२५,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-
 4. रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२६,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-
 5. रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२७,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-