Jump to content

शिलाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिलॉँग या पानावरून पुनर्निर्देशित)
शिलाँग
मेघालय राज्याची राजधानी
शिलाँग is located in मेघालय
शिलाँग
शिलाँग
शिलाँगचे मेघालयमधील स्थान

गुणक: 25°34′56″N 91°53′40″E / 25.58222°N 91.89444°E / 25.58222; 91.89444

देश भारत ध्वज भारत
राज्य मेघालय
जिल्हा पूर्व खासी हिल्स जिल्हा
क्षेत्रफळ ६४.३ चौ. किमी (२४.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६,४४९ फूट (१,९६६ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,४३,२२९
  - महानगर ३,५४,७५९
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
शिलाँग महापालिका


शिलॉँग ही भारताच्या मेघालय राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. त्याचबरोबर शिलाँग पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. १९७४ ते १९७२ दरम्यान संयुक्त आसाम प्रांताच्या राजधानीचे शहर राहिलेले शिलाँग १९७२ साली मेघालय]] राज्याच्या निर्मितीनंतर मेघालयच्या राजधानीचे शहर बनले व आसामची राजधानी गुवाहाटीमधील दिसपूर येथे हलवण्यात आली. आजच्या घडीला मेघालयची आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य राजधानी असलेल्या शिलाँगची लोकसंख्या २०११ साली सुमारे १.४३ लाख इतकी होती. आजच्या घडीला येथील ४७ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय तर ४२ टक्के लोक हिंदू आहेत. इंग्लिश ही येथील अधिकृत भाषा असून खासीगारो ह्या दोन स्थानिक भाषांना राजकीय दर्जा देण्यात आला आहे.

इतिहास

[संपादन]

खासी व जैंतिया हिल्स हा भूभाग पारंपारिक काळापासून चेरापुंजी येथे राजधानी असलेल्या खासी जमातीच्या अखत्यारीखाली होता, परंतु सिल्हेट ते आसाम दरम्यान रस्ता बांधण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला येथील जमिनीची आवश्यकता भासू लागली. ह्यावरून झालेल्या युद्धमध्ये ब्रिटिशांची सरशी झाली व १८३३ साली हा भूभाग ब्रिटिश अधिपत्याखाली आला. परंतु चेरापुंजी हे ठिकाण सोयीचे नसल्यामुळे ब्रिटिशांनी १८६० च्या दशकात शिलाँग शहराची स्थापना केली. येथील डोंगराळ भाग व सौम्य हवामानामुळे शिलाँगची तुलना स्कॉटलंडसोबत केली जाते. १८७४ मध्ये ब्रिटिश राजवटीने नवनिर्वाचित आसाम प्रांताची स्थापना केली व शिलाँग आसामची राजधानीचे शहर बनले.

एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून देखील येथे रस्ते व रेल्वेमार्गांचा विकास होऊ शकला नाही ज्यामुळे शिलाँगचा विकास संथगतीने होत राहिला.

शहर रचना

[संपादन]

१८ व्या शतकामध्ये येथे आलेल्या ख्रिश्चन मिशन-यांनी या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. या भागाला निसर्गाचा संपन्न वारसा लाभलेला आहे. ब्रिटिशांना हे शहर पूर्वेकडील स्कॉटलँड सारखे निसर्गसंपन्न आणि सुंदर वाटले. ब्रिटिश वसाहतवादाचा वारसा असलेली घरांची रचना आणि हॉटेल व कॅफे मधील वाजवले जाणारे संगीत ही या शहराची वेगळी वैशिष्टये आहेत. पर्यटनाच्या दृष्टिने संपन्न असा हा प्रदेश आहे. मेघालयची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणजे शिलाँग हे डोंगर उतारावर वसलेले आहे. शिलाँग मधील शिलाँग व्यू पॉइंट वरून आपण सर्व शिलाँग शहर पाहू शकतो. आकाशात पसरलेले प्रचंड धुके आणि त्या धुक्यात हरवलेले शिलाँग हे शहर वेगळीच अनुभूती देऊन जाते. शिलाँग पासून काही अंतरावर एलिफंटा धबधबा आहे. या धबधब्याला स्थानिक लोक तीन पायऱ्यांचा धबधबा असे म्हणतात. कारण हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये पडतो. ब्रिटिशांनी या धबधब्याला एलिफंटा हे नाव दिले. कारण या धबधब्याच्या डाव्या बाजूस हत्तीच्या आकाराचा खडक होता. मात्र तो 1897 मध्ये भूकंपामुळे नष्ट झाला. पर्यटकांना धबधबा पाहण्यासाठी येथे बांधण्यात आलेल्या पायऱ्या मुळे आणि पुलामुळे आपण हा धबधबा सर्वबाजूंनी पाहू शकतो. खडकावरून खाली येणारे पाणी हिरव्यागार झाडांमुळे सुंदर दिसते. या धबधब्यातून उडणारे पाण्याचे तुषार आनंददायी वाटतात. एकूणच निसर्गरम्य असा हा परिसर पर्यटकांचे आकर्षण बनलेला आहे. []

वाहतूक

[संपादन]

शिलाँग विमानतळ शहराच्या ३० किमी उत्तरेस स्थित असून येथून दिल्ली, कोलकाता तसेच ईशान्येकडील दिमापूर, गुवाहाटी, सिलचर, इम्फाल, आगरताळा इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट प्र्वासी विमानसेवा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ शिलाँगला गुवाहाटी तसेच इतर महत्त्वाच्या शहरांसोबत जोडतो. राष्ट्रीय महामार्ग १०६ हा शिलाँगला नाँगस्टॉइनसोबत जोडणारा महामार्ग देखील येथील एक महत्त्वाचा रस्ता आहे. आजच्या घडीला शिलाँग भारतीय रेल्वेच्या नकाशावर नसून भविष्यात गुवाहाटी ते मेघालय रेल्वेमार्ग बांधला जाईल.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ फडतरे, नवनाथ (२६ जुलै २०१९). "मेघालय - ईशान्य भारतातील स्वर्ग". लोकप्रभा - पर्यटन विशेष: २४.