नवा काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नवा काळ
प्रकारदैनिक
आकारमान७४९ बाय ५९७ सेंटिमीटर

मुख्य संपादककृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
स्थापना७ मार्च १९२३ इ.स. १९२३
भाषामराठी
किंमत१ आणा
मुख्यालयभारत मुंबई,गिरगाव, महाराष्ट्र, भारत
खप१००० हजार


नवा काळ हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे दैनिक वृत्तपत्र आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या दैनिक वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक होते. मुंबईतील गिरगावातून हे वृत्तपत्र प्रकाशित होते.

इतिहास[संपादन]

कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर ह्यांनी 'लोकमान्य' दैनिकाशी असलेला आपला संबंध एक सपाट्यासरशी तोडला आणि ते बाहेर पडले. हा निर्णय त्यांनी तडकाफडकी घेतला हे खरे असले तरी, कधीतरी असा प्रसंग येणार असल्याचा विचार त्यांच्या मनात रेंगाळत असला पाहिजे. त्यांच्या मानवी स्वभावाला दुसऱ्यांच्या ताबेदारीत फार काळ राहणे पटणारे नव्हते. यापूर्वी स्वाभिमान दुखावला जाताच, 'केसरी'तून ते दोनदा बाहेर पडले होते; यामुळे 'लोकमान्या'तून तेवढ्याच तडफेने ते बाहेर पडू शकले.

पूर्वीचा अनुभव पदरी असल्यामुळे यावेळी दुसऱ्यांची तांबेदारी कायमची तोडून, खो-खोच्या खेळातला भिडू यापुढे व्हायचे नाही असे त्यांनी म्हणून निश्चित केले होते असे दिसते. नव्या परिस्थितीत, राजकारणाबद्दलही त्यांनी विचार करून आपला निर्णय पक्का केला होता. 'राजकारणात महात्मा गांधी ही नवीन शक्ती प्रविष्ट होत आहे, तिचे स्वागत आपण केलेच पाहिजे', हे खुद्द लोकमान्यांनी त्यांच्यापाशी काढलेले उद्गार राजकीय भूमिकेबाबतच्या त्यांच्या निर्णयाला पोषक ठरले. लोकमान्य टिळकांवर त्यांची अनन्य भक्ती होती. लोकमान्यांच्या विचारसरणीचे ते एकनिष्ठ पाईक होते.[१]

लोकमान्यांच्या पश्चात नव्या परिस्थितीत महात्मा गांधीजीचे राजकारण हे आपल्या गुरूच्या विचारांची पुढली पायरी आहे. त्याबाबत नसत्या शंकाकुशंका काढीत बसणे अप्रस्तुत होय, असा त्यांचा बुद्धीचा पक्का निर्णय झालेला होता. हा निर्णय अंमलात आणावयाचा तर जुन्या सहकाऱ्यांपासून स्वतंत्र असे व्यासपीठ आपल्यासाठी उभे करणे हाच निर्वेध मार्ग होता. 'लोकमान्य' दैनिकात आपल्या बुद्धीच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी लेखन केले. पण ती भूमिका निर्वेधपणे चालू होणे अशक्य होणार असल्याचे दिसताच त्यांनी पत्र सोडले, आणि त्याबरोबर यापुढे कोणाच्याही ही ताबेदारी पत्करायचा नाही, हा निर्णय त्यांनी घेतला. 'लोकमान्या'चा संबंध तोडल्यावर, यामुळेच आपण काय करावयाचे याबाबत चटकन निर्णय करू शकले. एक प्रकारे त्यासाठी त्यांच्या मनाची तयारी अगोदर पासूनच होऊ लागली होती. वेळ येताच त्यांनी आपली दिशा सहज धरली. टिळक गेले, आणि गांधी आले. त्यांनी आपले असे एक युगच सुरू केले.[२]

त्या क्रांतीची पावले काकासाहेबांनी ओळखली. तिची पायरव त्यांच्या कानी पडली. आणि ते समजून चुकले की. जुना काळ संपला आहे, 'नवा काळ' येत आहे, त्याला आपण पाठमोरे न होता सामोरे गेले पाहिजे. म्हणूनच 'नवा काळ' हे पत्रनाम घेऊनच काकासाहेब पुढे सरसावले. शिवरामपंत परांजपे यांचा 'काळ' कधीच मागे पडला, आता 'नवा काळ' पुढे आला आहे, त्याच मार्गाने पुढे गेले पाहिजे. अगदी निश्चिंत मनाने व मनात कोणतेही सम न राहता, काकासाहेबांनी नव्या मार्गावर भराभर पावले टाकली.
[३]

काकासाहेबांनी गांधीजीचा मार्ग पत्करला, पण आपल्या मूळ पीठाचे गुणधर्म जसेच्या तसे कायम राखूनच ते मार्गक्रमण करू लागले, महाराष्ट्रात शंकरराव देव, काकासाहेब कालेलकर आदी मंडळी गांधीच्या विचारांशी जेवढी समरस झाली, तेवढे काकासाहेब समरस झाले असे म्हणता येणार नाही. गांधीचे नेतृत्व त्यांनी मानले, तरी गांधीवादाशी ते कधीच तद्र्प झाले नाहीत. गांधीवादाचे कर्मकांड त्यांनी स्वीकारले नाही. टिळकांचे तत्त्वज्ञान आणि गांधीचे तत्त्वज्ञान ह्यात काही मूलभूत फरक आहे; पण म्हणून हे दोन्ही विचार पूर्ण विरोधी होते, असे नव्हे. काकासाहेबांना संपूर्ण गांधीवादी म्हणता येणार नाही, पण ते गांधी संवादी मात्र खास होते.[४]

पहिला अंक[संपादन]

पहिला अंक ७ मार्च १९२३ रोजी रंगपंचमीच्या दिवशी बाहेर पडला.
'इंदुप्रकाश' या जागेतच एका बाजूस २३ जानेवारी १९२४ रोजी स्वतःचा 'दत्तात्रय छापखाना' उभा करण्यात येऊन, गुरुवार, तारीख २४ जानेवारी १९२४ 'नवाकाळ'चा अंक स्वतःच्या छापखान्यातून बाहेर पडला.[५]

पहिले संपादक मंडळ[संपादन]

रचना[संपादन]

पत्राच्या नावाखाली 'सोमवारखेरीज करून दररोज प्रसिद्ध होतो' या टिपेखेरीज महाभारतातील पुढील शोल्क होता.--

कालो वा कारण राज्ञो राजा वा कालकारणम ।
इति ते संशयो माभ्रूद्राजा कालस्य कारणम ।।
पहिला पानावर सर्व जाहिराती होत्या. पान दोन वर जिल्हा परिषद पहिले अधिवेशन, काँग्रेस वर्किंग कमिटीची दौरा, महाराष्ट्रातील चळवळ, पुण्यातील गांधी आठवडा,मुंबईच्या बातम्या इ.मजकूर होता.पान तीन सर्व जाहिराती होत्या.[६]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. 
  2. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. 
  3. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. 
  4. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. 
  5. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. 
  6. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. 


  1. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, तृतीयावृत्ती २००९ किमंत ७५०/-
  2. पत्रकारितेची मूलतत्त्वे - प्रा. डॉ. सुधाकर पवार : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक १३४०, तृतीयावृत्ती २०१२ किमंत १७५/-


हेही पहा[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]