Jump to content

द एशियाटिक सोसायटी (मुंबई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एशियाटिक सोसायटी या पानावरून पुनर्निर्देशित)



एशियाटिक सोसायटी ही संस्था कला, विज्ञान आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी १८०४ साली सर जेम्स मॅकिन्टॉश यांनी स्थापन केली. या संस्थेचे मूळ नाव बॉम्बे लिटररी सोसायटी होते. १८३० साली बांधण्यात आलेल्या टाऊन हॉलच्या बिल्डिंगमध्ये या सोसायटीचा कारभार हलवण्यात आला. तेव्हापासून येथूनच सोसायटीचा कारभार चालतो आहे. ग्रंथालय स्थापनेच्या दृष्टीने हा महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न होता. दुर्मिळ पुस्तकांबरोबरच संस्कृत, प्राकृत, पशिर्यन, अरेबियन, मराठी, गुजराती, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इटालियन आणि इंग्रजी या भाषांतील हस्तलिखिते सोसायटीकडे आहेत. या संग्रहालयात एक लाखाहून अधिक ग्रंथ (म्हणजे किमान २ कोटी पाने), अडीच हजार पोथ्या व हस्तलिखिते आणि १२००हून अधिक नकाशे आहेत. दान्ते या मध्ययुगीन इटालियन कवीच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ची १४व्या शतकातील हस्तलिखित प्रत माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी या संग्रहाला दिली होती, ती आजही सोसायटीच्या वैभवाची एक खूण आहे. पु.ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत यांच्या कुटुंबीयांकडून या थोर मराठी लेखकांच्या साऱ्या हस्तलिखितांचे बाडदेखील ‘एशियाटिक सोसायटी’च्या सुपूर्द झाले आहे. हस्तलिखितांमध्ये अर्थातच, जुन्या संस्कृत व प्राकृत पोथ्यांचा समावेश प्रामुख्याने आहे. हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा ठेवा आता संगणकीय स्वरूपात चिरंतन होण्याच्या मार्गावर आहे.

सुरुवातीच्या काळातील छायाचित्र

मुंबईतीतील एशियाटिक सोसायटीची वास्तू

[संपादन]

या इमारतीला सुरुवातीलाच ३० पायऱ्या अ्सून त्यावर आठ डोरिक पद्धतीचे स्तंभ आहेत. इथल्या ‘दरबार हॉल’मध्ये आज विद्वानांची भाषणे होतात, तिथेच कधीकाळी न्यायदानाचे कामही चाले. ‘सत्ता आणि ज्ञानाची मत्ता हे दोन्ही इथे नांदे’ असा टाउन हॉलबद्दलचा सार्थ उल्लेख ‘झीरो पॉइंट बॉम्बे’ या केवळ हॉर्निमन सर्कलच्या इतिहासाबद्दल आणि वर्तमानाबद्दल १७ तज्ज्ञांनी लिहिलेल्या १७६ पानी पुस्तकात आहे. हे पुस्तक ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ने २००८ मध्ये प्रकाशित केले आहे. एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयातील पाचपैकी एका ग्रंथदालनाला ‘जनरल रीडिंग रूम’ असे नाव असून ‘रिसर्च रूम’ निराळी आहे. मुंबईचे शिल्पकार मानल्या गेलेल्या जगन्‍नाथ शंकरशेट मुरकुटे यांचा एकमेव पूर्णाकृती पुतळा याच इमारतीत आहे. या संस्थेच्या कार्यामध्ये नाना शंकरशेट मुर्कुटे यांनी आपले भरीव योगदान दिले. या संस्थेच्या माध्यमातून प्राचीन परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न केला गेला.

संस्था

[संपादन]

मुळात ही संस्था परळला गव्हर्नरच्या बंगल्यात स्थापन झाली. त्या बंगल्यात आता ‘हाफकिन इन्स्टिटय़ूट’ आहे. या बंगल्यात एकटेच राहणारे तेव्हाचे गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या उदार आश्रयाखाली, सर जेम्स मॅकिन्टॉश यांनी २६ नोव्हेंबर १८०४ रोजी स्वतचा (लवाजम्यासोबत, विलायतेहून आणलेला) ग्रंथसंग्रह खुला करून या संस्थेला दिला. या संस्थेने १८४० सालापासून भारतीय विद्वान आणि कर्तृत्त्ववान माणसे जोडली. तोवर मात्र संस्थेचे सर्व सदस्य ब्रिटिश अथवा युरोपीय होते. सर माणेकजी करसेटजी हे या सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होत. जगन्नाथ शंकरशेट, जमशेटजी जीजीभाई हे नगरपितेही या संस्थेचे सदस्य होते (या दोघांचे मूळ पूर्णाकृती संगमरवरी पुतळेही संस्थेतच आहेत). विल्सन कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. जॉन विल्सन हे सोसायटीचे अध्यक्ष होते आणि डॉ. भाऊ दाजी लाड, न्यायमूर्ती के. टी. तेलंग, सर जीवनजी मोदी, प्राच्यविद्यापंडित रामकृष्ण भांडारकर, डॉ. शंकर पांडुरंग पंडित, हे विद्वज्जन संस्थेशी संबंधित होते. याच संस्थेत महामहोपाध्याय आणि भारतरत्‍न पां.वा. काणे यांनी ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ हा ग्रंथ सिद्ध केला. दुर्गा भागवतांनीही अनेक ग्रंथ इथे अभ्यासले. आजही २५ ‘रिसर्च डेस्क’ आहेत, तिथे संशोधकांचे काम सुरू असतेच, यापैकी दोघा संशोधकांना सोसायटीतर्फे अल्प (२५ हजार रु.) शिष्यवृत्तीही प्रदान केली जाते. शिवाय अन्य सदस्यही आपापल्या हौसेसाठी, आवडीच्या विषयांचा सखोल अभ्यास करायला अगदी वयाच्या सत्तरीनंतरही येथे येतात. उदाहरणार्थ, चित्रपट-इतिहासाचे अभ्यासक धरमशी किंवा मराठीइतकाच बंगाली साहित्याचा अभ्यास असलेले अशोक शहाणे यांसारख्या अनेकांची ज्ञानतृष्णा ‘एशियाटिक’मधल्या ग्रंथांनी, जुन्या दैनिकांसारख्या अन्य संदर्भसाहित्याने भागते. १९९४ मध्ये एशियाटिक सोसायटी व सेंट्रल लायब्ररीचे विभाजन झाले, तेव्हा केंद सरकारने एशियाटिकला दोन कोटी रुपयांची देणगी दिली. ही रक्कम युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (युटीआय)च्या बॉंड्समध्ये गुंतवण्यात आली. युटीआय आर्थिक संकटात आल्यावर व्याजापोटी मिळणारी रक्कम आटली आणि एशियाटिक धोक्यात आली.[]

ग्रंथ आणि वस्तू

[संपादन]

‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ ही पुस्तकांसाठी ओळखली जात असली, तरी सोपारा (शूर्पारक) येथील उत्खननात मिळालेल्या वस्तूदेखील येथे आहेत. सोसायटीचा जुन्या नाण्यांचा संग्रह अव्वल म्हणावा असा आहे. पाचव्या शतकातील समुद्रगुप्तकालीन नाण्यापासून, १५२६ सालचे अकबरकालीन नाणे आणि छत्रपती शिवाजीच्या राजवटीत वापरली जाणारी नाणी येथे असून विविध नाण्यांची एकंदर संख्या १२००० आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ 'एशियाटिक'चे अश्रू[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती 19 Oct 2009 07:23:44 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे मुंबई सेंट्रलला नाव द्या". १४ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित.