सम्राट अशोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


चक्रवर्ती महान सम्राट अशोक
धम्माराखित, धर्माराजिका, धम्माराजिका, धम्मारज्ञ, चक्रवर्तीं, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, देवानाम प्रिय:, प्रियदर्शी, भूपतिं, मौर्यराजा, आर्य अशोक, धर्माशोक, धम्मशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धम्मानायक, धर्मनायक
Indian relief from Amaravati, Guntur. Preserved in Guimet Museum.jpg
चक्रवर्ती महान सम्राट अशोक
अधिकारकाळ २७२ इ.स.पू- २३२ इ.स्.पू.
राज्याभिषेक २५८ इ.स्.पू.
जन्म ३०४ इ.स्.पू.
पाटलीपुत्र, बिहार
मृत्यू २३२ इ.स्.पू.
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारी बिंदुसार
उत्तराधिकारी दशरथ मौर्य
वडील बिंदुसार
आई धर्मा
पत्नी महाराणी देवी, पद्मावती, तिश्यरक्षा
संतती संघमित्रा, महेंद्र, राहूल
राजघराणे मौर्य


चक्रवर्ती सम्राट अशोक (जन्म: इ.स.पू. ३०४ -मृत्यू इ.स.पू. २३२) हा मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होता. त्याने भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ च्या दरम्यान राज्य केले. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपला राज्य विस्तार केला. चक्रवर्ती सम्राट अशोक हा जगातील महान सम्राटांमधील एक होते. सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासात सर्वात महान सम्राटांचे स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकाला चक्रवर्ती सम्राट असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे सम्राटांचा सम्राट. भारताच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये (रामायण, महाभारत इत्यादी) आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. अशोकने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. पाकिस्तान ,अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व पाटणा म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्याची राजधानी होती. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्याने हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात व आजच्या प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्‍यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.

बालपण व सुरुवातीची कारकीर्द[संपादन]

अशोक हा बिंदुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिंदुसार यांना अनेक पत्‍नी होत्यातील त्यातील धर्मा ही अशोकची आई होती. अशोक हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरा होता. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुःस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला, त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकाने आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते, हे काम त्याने सहज पार पाडले.

राज्यरोहण[संपादन]

सम्राट अशोकच्या काळातील मौर्य साम्राज्याचा विस्तार

अशोक जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुस्वासही वाढत गेला. अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर कीर्ती दुमदुमत लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिंदुसार अशोकला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम हा अशोकचा दुस्वास करण्यात आघाडीवर होता. सुसीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी जेथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे, तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकची कीर्ती अजून वाढत गेली. (त्या भागात पुन्हा उठाव झाला परंतु तो क्रूरतेने चिरडला गेला.)

अशोकच्या यशाने त्याच्या भावांचा दुस्वास अजून वाढला, घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुसीमने बिंदुसारला अशोकाविरुद्ध भडकावले, या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला, तो त्याने पाळला. या काळात अशोकने कलिंगमध्ये जाउन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली. ती नंतर अशोकची दुसरी अथवा तिसरी पत्‍नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत.

मध्यंतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिंदुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेला व एका लढाईत घायाळ झाला. त्या काळात असे मानतात की सुसीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले, जे परतावून लावण्यात आले. अशोकची शुश्रूषा करण्यासाठी बौद्धधर्मी परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारिका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी ही विदिशा येथील एका व्यापा‍र्‍याची मुलगी होती. ती बौद्धधर्मी असल्याने बिंदुसाराला हा विवाह पसंत पडला नाही. त्याने अशोकला पाटलीपुत्रमध्ये रहाण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले.

पुढील काही वर्षे अशोकची शांततामय गेली. बिंदुसारचे इसवी सनपूर्व २७३ मध्ये निधन झाले व सुसीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्‍नांत देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेल्या अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाटलीपुत्रचा पाडाव केला. आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली. मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड-अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मा अशी त्याची ओळख तयार होऊ लागली.

राज्यरोहण झाल्यानंतर आठ वर्षांच्या काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान-इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळ पर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली.

कलिंगचे युद्ध[संपादन]

मुख्य पान: कलिंगचे युद्ध

कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. अशोक वर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाला होता. सर्वत्र त्याची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगडझारखंड मधील काही भाग येतात.

कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यवसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनार्‍यावर सत्ता हवी होती, ती कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हा खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६५ सुमारास सुरू झाले. सुशीमच्या एक भावाने कलिंगच्या राजाची मदत घेतली होती. अशोकने हे कारण मानले व कलिंगच्या राजाला शरण येण्यास सांगितले.

सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाउन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावपेचापुढे काही चालले नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंगमध्ये दहशत माजवली. मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले.

बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार[संपादन]

अशोकाच्या चार मुखी सिहाचे थायलंड येथे आढळलेले शिल्प

अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धर्मीयांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रुपांतर झाले अशीकलिंगाचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात.

वैशाली (बिहार) येथील अशोक स्तंभ

अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली. अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाउन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्ध धर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकिदीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणार्‍या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकर्‍यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.

अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधार्‍या माणसांना मान देणे, संत ब्राह्मण, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचार तत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही.

अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्य याच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते.

सांची येथील जगप्रसिद्ध स्तूप

अशोकाचे स्तंभ व शिलालेख[संपादन]

अशोकाने शिलालेख स्तंभ अस्तित्वात असलेल्या जागा.

अशोकाने भारतीय इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा दिला म्हणजे त्याने त्याच्या राज्यात सर्वत्र लिहिलेले शिलालेख. अशोकाअगोदरच्या व नंतरच्या भारतीय राजांच्या फारश्या नोंदी आढळत नाहीत त्यामुळे तत्कालीन ऐतिहासिक मिळवणे जिकरीचे होते. अशोकाने आपल्या राज्याच्या सीमेवर महत्त्वाच्या शहरांमध्ये शिलालेखांद्वारे आपले विचार प्रकट केले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनुसार आजवर सापडलेल्या शिलालेखांपेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने शिलालेख बांधले असावेत व ते काळाच्या ओघात लुप्त झाले, अजूनही उत्खननांमध्ये स्तंभ व शिलालेख सापडण्याची शक्यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणे अशोका संदर्भात बरीचशी माहिति शिलालेखांवरुन व स्तंभांवरुन आलेली आहे. अशोकाला मुख्यत्वे "देवानांपिय पियदसी" ( पालीमध्ये) अथवा संस्कृतमध्ये प्रियदर्शी असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ "देवांचा प्रिय व चांगले दाखविणारा" असा होतो. त्याच्या सर्व लेखांमध्ये त्याची महानता जाणवते, अशोकाने हे सर्व शिलालेख आपल्या साम्राज्यातील मार्गांवर मुख्य चौकांमध्ये स्‍थापित केले होते, जेणेकरून प्रजेला तसेच बाहेरच्या देशातून येणार्‍याला अशोकाच्या राज्यातील आचारविचार कळावेत. अशोक आपल्या प्रजेला आपली मुले असेबसंबोधत असे व अहिंसेबद्द्ल व बौद्ध धर्माच्या तत्त्वांवर (धम्म व योग्य आचरणावर) त्याचा भर असे. अशोकाच्या लेखांमध्ये त्याच्या स्तुतीपर अनेक सुमने आहेत. ्ते अशोकाने मिळवलेल्या प्रदेशाची माहिती देतात. तसेच त्यांत शेजारच्या राज्याबद्दलची माहितीही आहे. एका स्तंभामध्ये कलिंग युद्धाचे वर्णन आहे त्यात अशोकाची साहाय्यक राज्ये व नागरी व्यवस्थापनेवरही माहिती कोरली आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वांत प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वालुकाश्माचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे. इतिहासकारांसाठी व शास्त्रज्ञांसाठी अशोक कालीन चिन्हे, लेख, स्तंभांचा हा खूप महत्त्वपूर्ण ठेवा आहे. तो मौर्य साम्राज्याबद्दल अनेक गोष्टी उद्धृत करतो. अशोकाच्या चिन्हांवरुन त्याला भावी पिढ्यांनी त्याच्याबद्दल काय विचार करावा, त्याला कोणत्या गुंणांसाठी त्याला लक्षात ठेवावे यामागची त्याची तळमळ लक्षात येते. अशोक खर्‍या आयुष्यात असाच होता का? यावर दुजोरा देणारी माहिती अजून उपलब्ध नाही.

[१]).

चित्रपटात व साहित्यात[संपादन]

 • अशोक हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला. यात शाहरुख खानने सम्राट अशोकाची भूमिका केली होती. हा चित्रपट मुख्यत्वे अशोकच्या तारुण्यातील दिवसांवर आधारित आहे. इतिहासकारांनी हा चित्रपट वास्तवापेक्षा बर्‍याच बदलांसाठी टीकेचे लक्ष्य बनवला. परंतु भारताच्या सर्वांत महान सम्राटावर चित्रपट काढल्याने चित्रपट सृष्टीने समाधान मानले होते. तसेच कलर्स या दूरचित्रवाणी वाहिनीवर चक्रवर्ती अशोक सम्राट या नावाने अशोकाच्या जीवनावर आधारित एक मालिका झाली आहे.

अशोकावरील प्रकाशित साहित्य[संपादन]

अशोकावरील बहुतेक साहित्य इंग्रजीमध्ये आहे.

 • Asoka (१९२३) लेखक भांडारकर
 • Asoka लेखक राधाकुमुद मुखर्जी.
 • Asoka and His Inscriptions लेखक मधाब बरुआ
 • Asoka and the Decline of the Maurya लेखिका रोमिला थापर
 • Asoka Maurya (१९६६) लेखक बी. जी. गोखले.
 • Asokan Sites and Artefacts : a Source-book with Bibliography. लेखक हॅरी फॉल्क, ISBN 978-3-8053-3712-0.
 • Asoka: The Buddhist Emperor of India by Vincent A. Smith
 • Ashoka text and glossary (१९२४) लेखक अल्फ्रेड वूल्नर
 • Ashoka the Great (१९९५) लेखक डी.सी. अहीर
 • Ashoka, The Great लेखक बी.के. चतुर्वेदी
 • Asoka the Great लेखिका मोनिषा मुकुंदन
 • Discovery of the Exact Site of Asoka's Classic Capital of Pataliputra (१८९२) लेखक एल.ए. वॅडेल.
 • Early India and Pakistan: to Ashoka (1970) by Brigadier Sir Robert Eric Mortimer Wheeler
 • King Aśoka and Buddhism Historical And Literaray Studies लेखिका अनुराधा सेनैवितरना.
 • The Legend of King Asoka (१९४८) लेखक जॉन स्ट्राँग
 • To Uphold the World: The Message of Ashoka and Kautilya for the 21st Century (२००८) लेखक ब्रुस रिच.
 • अशोक की चिंता ही हिंदीमध्ये प्रसिद्ध कविता आहे. कवी जयशंकर प्रसाद
 • अशोकाज एडिक्टस (१९५६) लेखक ए.सी.सेन
 • अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र (१८९९) (मराठी) लेखक वा.गो. आपटे

बाह्य दुवे[संपादन]

साचा:S-houसाचा:End

संदर्भ व टिपा[संपादन]

 1. Full text of the Mahavamsa Click chapter XII
मागील
Bindusara
Mauryan Emperor
272 BC–232 BC
पुढील
Dasaratha