वसंतराव नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसंतराव फुलसिंग नाईक
Statue of Vasantrao Naik at Vidhan Bhavan, Nagpur - panoramio.jpg

कार्यकाळ
५ डिसेंबर, इ.स. १९६३ – २० फेब्रुवारी, इ.स. १९७५
राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित, पी.व्ही. चेरियन , अली यावर जंग
मागील मारोतराव कन्नमवार
पुढील शंकरराव चव्हाण

जन्म १ जुलै, इ.स. १९१३
पुसद, यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू १८ ऑगस्ट १९७९
सिंगापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय काँग्रेस
पत्नी वत्सला
व्यवसाय राजकारणी, शेती
धर्म हिंदू ,

(राजघराणे- गोरराजवंशी)

वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते. नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.[१] माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणून संबोधतात. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे.[२][३][४][५][६] महानायक वसंतराव नाईक हे एक केवळ नाव नसून शाश्वत विकासाची एक लोकाभिमुख विचारधारा (वसंतवाद) आहे.

नाईक घराणे[संपादन]

नाईक घराणे हे भारतीय समाजकारण व राजकारणातील एक प्रचलित घराणे आहे. 'स्वराज्याची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर इ. स. १९५२ पासून नाईक घराण्यानी निर्विवाद विजय संपादन केले आहे. ते गोरराजवंशी कुळातील असून त्यांचे गोत्र रणसोत क्षत्रिय होते. गहुली हे खेडे गोरराजवंशी चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. अखिल बंजारा समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले व त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंग नाईकांचा मुलगा फुलसिंग नाईक हा पुढे या समाजाचा 'नाईक' झाला. त्यांची पत्नी हुनकीबाई यांना दोन मुले झाली. राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले. नाईक घराण्यानी महाराष्ट्राला दोन यशस्वी मुख्यमंत्री दिलेत.अविनाश नाईक व मनोहरराव नाईक यांच्यारूपाने मंत्री तर विद्यमान आमदार निलय नाईक व इंद्रनील नाईक आहे. नाईक यांच्या विकास कामावरून व प्रेरणादायी कर्तृत्वामुळे जनमानसात 'महानायक वसंतराव नाईक' म्हणून आदराने संबोधतात.[७][८][९]

शिक्षण[संपादन]

वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थीदशेत त्यांच्यावर जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील प्रख्यात घाटे या ब्राह्मण कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. त्यांनी आपली वकिली गोरगरीब, शेतकरी, आदिवासी घटकांच्या हितासाठी व त्यांना सामाजिक बांधिलकी ठेवणारे वकील म्हणून ओळखले गेले. वत्सलाताई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. वत्सलाताई नाईक ह्या महिला सक्षमीकरणासाठी महिला संवाद , महिला मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करीत.‌ त्यांची दोन्ही मुले निरंजन व अविनाश आहेत.

कारकीर्द[संपादन]

वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. गोरगरिबांचा वकिल म्हणून ते वर्ऱ्हाडात ओळखले जायचे. सर्वसामान्यांशी जनसंपर्क वाढत गेला. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. देशात पहिल्यांदाच चार कृषी विद्यपिठाची स्थापना केली. राज्यात औदयोगिकरणाचे जाळे विणले. विदयुत व औष्णिक केंद्राची उभारणी केली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. नवी मुंबईची निर्मिती ही वसंंतराव नाईकांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण मानले जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.

नाईक जयंती-कृषीदिन[संपादन]

वसंतराव नाईक यांनी कृषीऔदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. अनेक क्रांतीकारी शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतले. तेंव्हा पासून शासकीय कार्यालयात सर्वत्र साजरा होतो. तर नाईक जयंती-कृृृषीदिन 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' साजरा करण्याची अभिनव प्रथा 'थेेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहीमेचे प्रणेते एकनाथ पवार यांनी पहिल्यांदा सुरू केली.[१०]आज गाव, तांडा, शहर कार्यालयाबरोबरच थेेेट बांधावर कृृृषीदिन साजरा केला जातो.[११] गाव,तांडा,पाल, शहरासह थेट शेत बांधावरही जयंती साजरी होत असलेल्या वसंतराव नाईकांकडे आधुनिक कृषीसंत, शेतकऱ्यांचे भाग्यविधाते म्हणूनच पाहिल्या जाते. कार्यालयाबरोबरच थेट शेतशिवारात जयंती साजरी होत असलेले वसंतराव नाईक हे देशातील एकमेव उदाहरण म्हणता येईल. नाईक यांनी भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ते भारतीय कृषी संशोधन परिषदांचे अर्थस्थायी समितीचे सदस्यही होते. त्यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाद्वारे 'कृषी संजिवन सप्ताह' म्हणून केला जातो. थेट शेत बांधावर शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केल्या जाते. तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था द्वारा थेट बांधावर 'शेतकरी कृतज्ञता सप्ताह' म्हणून सुद्धा साजरा करीत वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली जाते.

नाईकांवरील चित्रपट निर्मिती व साहित्यकृती[संपादन]

'महानायक वसंत तू' हे मराठी चित्रपट वसंतराव नाईक यांच्यावर आधारित असून यामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी वसंतराव नाईक यांची भूमिका साकारली आहे. भारत गणेशपुरे व अभिनेत्री निशा परूळेकर यांनी देखील भूमिका साकारली आहे. तसेच दिग्दर्शक प्रा.जब्बार पटेल यांनी सुद्धा वसंतराव नाईक यांच्यावर डॉक्यूमेंटरी फिल्म तयार केली. शिवाय नाईकांच्या प्रेरणादायी कार्याविषयी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी 'महानायक' आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी 'दूत पर्जन्याचा' , रासबिहारी सिंग बैस यांनी 'वसंतराव नाईक यांचे जीवनचरित्र' लिहिले असून दिनेश देसाई यांनी 'वसंतराव नाईक यांची निवडक भाषणे' या संपादित ग्रंथाचे लेखन केले आहे. तसेच "तुला वसंत म्हणू की महासंत म्हणू मी" हे लोकप्रिय वसंतगीत साहित्यिक एकनाथराव पवार यांनी रचले आहे. याशिवाय वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित विविध भाषेत ग्रंथलेखन, गाणी, पोवाडे , कविता , पथनाट्ये देखील रचल्याचे दिसून येते.

दूरगामी प्रकल्प,संस्था,योजना निर्मितीचे कार्य[संपादन]

वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय कार्य: •कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, अकोला (१९६९), परभणी (१९७२), राहुरी (१९६८), • औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती (कोराडी, पारस, खापरखेडा, परळी)

•मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, सन १९६४ •महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) सन १९६७. बालकासाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती. •राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विदया प्राधिकरण), सन १९६८ •शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती (१९६५) • नवी मुंबई व नवे औरंगाबाद निर्मिती • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), सन १९७१ • औदयोगिक वसाहत (एम आय डी सी) बुटीबोरी (नागपूर), वाळुंज (औरंगाबाद) , सातपूर अंबड (नाशिक),इस्लामपूर (सांगली), लातूर • कापूस एकाधिकार योजना (१९७१) • विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा • हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना [१२]

मृत्यू[संपादन]

वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या नाईकांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात.

जागतिक कृषीसंशोधन-अभ्यास दौरा[संपादन]

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय अभ्यास टीममध्ये तत्कालीन कृषीमंत्री वसंतराव नाईक यांची आंतरराष्ट्रीय राईस कमीशनच्या शिष्टमंडळात निवड करण्यात आली. • जपान दौरा (१९५८) • युगोस्लाव्हिया देशाचा दौरा (१९६४) जपान, चिन ,अमेरिका (१९७०), सिंगापूर (१९७८) देशाचा अभ्यास करून प्रख्यात कृषी तज्ज्ञ वसंतराव नाईक यांनी कृषी कृषी औदयोगिकरणाचा प्रसार केला.आधुनिक शाश्वत शेतीला चालना देत विविध संकरीत वाणांची निर्मिती केली.

उद्गार (वसंतविचार)[संपादन]

महानायक वसंंतराव नाईक हे एक चिंतनशील विचारवंत आणि भविष्यवेधी दूरदृष्टीचे राजनितीज्ञ होते. ते एक वसंतविचार म्हणून ओळखल्या जाते.

• शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे, तर शेतकऱ्यांची लेकरं सुद्धा कलेक्टर झाले पाहिजेत. (वसंतराव नाईकांचे शेतीवरील भाषणे) • शेती ही उद्योगाची जननी आहे. शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. (७जून १९७१ कॉंंग्रेस शिबीर) • शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. वंचित घटकाला अन्नाबरोबरच आता उद्यमशील शिक्षणाची सुद्धा तितकीच गरज आहे. (वरोली, नवाटी भूमीपूजन सोहळा, १९६३) • शिक्षणाने आपल्यात माणुसकी यायला पाहिजे. समाजाप्रती कृतज्ञतेची भावना सतत मनात रहावी, ही बीजे शिक्षणातून रुजायला हवीत. (आंध्र दीक्षांत समारोह, १५ मार्च १९७०) • माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे यासारखा दूसरा कोणताही असंस्कृतपणा नाही.(अस्पृश्यता निवारण शिबीर, नागपूर) • शिक्षणाचा दर्जा वाढवून नव्या युगातील क्षमता बरोबर वैज्ञानिक दृष्टी जागृत करणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मूल्ये शिक्षणातून रुजायला हवीत.( पुणे, १९६७) [१३]

पदे[संपादन]

 • इ.स.१९४६ - पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद.
 • इ.स. १९५१- विदर्भ प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारिणी सदस्य
 • इ.स. १९५२ - पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार.
 • इ.स. १९५६ - मध्यप्रदेश राज्याचे सहकार , कृषी व दुग्धव्यवसाय मंत्री.
 • इ.स. १९५७ - द्विभाषिक मुंबई राज्याचे कृषीमंत्री. इंडिया कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर सोसायटीचे सदस्य
 • इ.स.१९५८ - आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात निवड.जपान ,टोकियो येथे भेट
 • इ.स. १९६० - लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष.
 • इ.स. १९६०-६३ - महाराष्ट्राचे महसूलमंत्री.(कमाल जमीनधारणा कायदा आणला.)
 • इ.स. १९६३ - ५ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
 • इ.स.१९६७ - मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान
 • इ.स. १९७२ - तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री.
 • इ.स. १९७७ - वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार. १,५२,०५७ मतांनी विजयी.
मागील:
मारोतराव कन्नमवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
डिसेंबर ५, इ.स. १९६३फेब्रुवारी २०, इ.स. १९७५
पुढील:
शंकरराव चव्हाण

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "हरितक्रांती आणि पंचायत राज वसंतराव नाईकांची स्मारके". मुंबई: प्रहार.
 2. ^ "हरितक्रांती के जनक थे वसंतराव नाईक". मुंबई: युनिवार्ता. २०२०.
 3. ^ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: वसंतराव नाईक. मुंबई: महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ. २००४.
 4. ^ "वसंतराव नाईक संपूर्ण भारताचे सुपूत्र". मुंबई: प्रहार. २०१३. Archived from the original on 2021-10-28. 2021-10-28 रोजी पाहिले.
 5. ^ पवार, एकनाथ (२०१७). हरितयोद्धा : वसंतराव नाईक. महाराष्ट्र: मृदगंध.
 6. ^ पवार, एकनाथराव. "आधुनिक भारताचे कृषीसंत : वसंतराव नाईक". POKJ ISSN Journal -2320-4494. Volume I.
 7. ^ "महाराष्ट्र घडविणारा महानायक वसंतराव नाईक". महाराष्ट्र: डेलीहंट न्यूज. २०१८.
 8. ^ भावे, मधुकर (२०१३). महानायक वसंतराव नाईक. मुंबई.
 9. ^ "१९६२ पासून नाईक घराण्याचे पुसद मतदारसंघावर वर्चस्व". मुंबई: लोकसत्ता.
 10. ^ "'शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक'". marathi.hindusthansamachar.in (इंग्रजी भाषेत). 2022-07-07 रोजी पाहिले.
 11. ^ "देशात पहिल्यांदाच कृषीदिन थेट बांधावर". महाराष्ट्र: लोकमत. २०१७.
 12. ^ "हरितक्रांतीचे प्रणेते". लोकराज्य मासिक. २०१२.
 13. ^ पवार, एकनाथराव. वसंतराव नाईक यांचे राष्ट्रयुगीन विचार. पुणे: इगल लीप. pp. 102–105.