विज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने (systematic study) केलेल्या अभ्यासास विज्ञान असे म्हणतात. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय.

विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. तथापि, सर्वच प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हटले जात नाही - उदा. अध्यात्म.

व्युत्पत्ती[संपादन]

लॅटिन भाषेतील Scientia (सायन्शिया) या शब्दावरून इंग्रजीतील ‘सायन्स’ हा शब्द तयार झालेला आहे.[१]

वैशिष्ट्ये[संपादन]

विज्ञानाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत –

वस्तुनिष्ठ सत्याचा शोध[संपादन]

विज्ञानाचा उगम मानवी जिज्ञानेतून झाला आहे. ज्ञानासंबंधीचे विशुद्ध प्रेम ही विज्ञानाची प्रेरणा आहे. वस्तुनिष्ठ सत्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. विज्ञान हे सत्यसंशोधनासाठी प्रयत्नशील असते; परंतु वैज्ञानिक सत्य हे विशेष स्वरूपाचे असते. विज्ञानाला अभिप्रेत असलेले सत्य हे व्यक्तिगत स्वरूपाचे नसते, तर ते वैचारिक स्वरूपाचे असते. वैज्ञानिक सत्य हे वास्तवतेवर आधारित असते. एखादी व्यक्ती कितीही महान असली आणि धर्म, राजकारण, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांतील तिचा अधिकार कितीही मोठा असला तरी त्या व्यक्तीला प्रत्ययाला आलेल्या सत्यावर, स्वतःच्या अनुभूतीवर किंवा साक्षात्कारावर विज्ञान विश्वास ठेवू शकत नाही. विज्ञान हे प्रयोगातून सिद्ध करून दाखविते. विज्ञान हा प्रगतीचा स्रोत आहे.

व्यवस्थीकरण[संपादन]

सामान्यीकरण[संपादन]

साधने[संपादन]

वस्तुनिष्ठ निरीक्षणे, प्रयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विश्वासार्ह माहितीची देवाण-घेवाण.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या साहाय्याने मानवाने काॅम्प्यूटर सिस्टम, रोबोटिक सिस्टम तयार केल्या आहेत. मोटर कार्स, एरोप्लेन, बुलेट ट्रेनमध्ये त्यांचा वापर होतो. त्यामुळे प्रवास अधिक जलद झाला आहे. विज्षानाधरित रेडिओ, टीव्ही, व्हीडिओ गेम्स, मोबाईल, इंटरनेट यांचा उपयोग मनोरंजनासाठी केला जातो.

कार्ये[संपादन]

वस्तुस्थितीच्या घटकांचे वर्गीकरण व विश्लेषण करणे, त्यांतील परस्परसंबंधांचे सार्वत्रिक नियम शोधणे, अशा नियमांच्या साहाय्याने अमुक घटना निश्चित अमुक वेळी होणारच असे वर्तविणे, या अज्ञानापासून मानवी जीवनाच्या साफल्यासाठी उपयोगी ठरेल अशी तंत्रविद्या निर्माण करणे इत्यादी विज्ञानाची कार्ये समजण्यात येतात.[१]


विज्ञानाचे सर्वात प्रमुख कार्य म्हणजे सृष्टीतील संगती जानणे, तिचे रहस्य उलगडणे हे होय. वस्तुस्थितीतील सुटयासुटया घटकांची माहिती होणे याला फारसे महत्त्व नाही; महत्त्व आहे ते या घटकांतील परस्परसंबंधांविषयीचे नियम सापडण्याला. असे नियम सापडणे म्हणजे सृष्टीतील घटकांचा व घटनांचा अर्थ लावणे होय. कोणतीही घटना समजणे म्हणजे ती कोणत्या सृष्टिनियमानुसार होते हे कळणे. काय केले असता काय होईल हे कळले म्हणजे विज्ञानाचे कार्य संपले असे नाही. विज्ञानाचा रोख जे घडते ते कोणत्या सृष्टिनियमानुसार घडते व कसे घडते हे शोधून काढण्यावर असतो. सृष्टीचे रहस्य जाणणे हे विज्ञानाचे ध्येय असते. [१]

विज्ञानाला स्वतःची अशी परंपरा असते. कोणताही वैज्ञानिक अशा परंपरेतच कार्य करतो. आधीच्या वैज्ञानिकांनी शोधून जतन केलेले सृष्टीचे ज्ञान त्याला पूर्वसंचित म्हणून मिळते व त्यात तो आपल्या शोधाची भर टाकत असतो. अशी एखादी घटना त्याच्या अवलोकनात येते की, जिचा अर्थ उपलब्ध ज्ञानाच्या जोरावर लावता येत नाही. असे झाले की, वैज्ञानिकसमस्या निर्माण होते आणि तिच्या दडपणामुळे विज्ञानाची प्रगती होते. समस्या सोडविण्यासाठी नवे सृष्टिनियम शोधावे लागतात, जुन्या नियमांत बदल करावे लागतात, आणि काही काही वेळा जुना संकल्पनाव्यूह पूर्ण बाजूला सारावा लागतो.

विज्ञानात वापरण्यात येणाऱ्या पद्धतीला अनुमानीत परिकल्पना पद्धती (अभ्युपगमनिगामी पद्धती/hypothetico-deductive method) असे म्हणतात. या पद्धतीचे पुढील पायऱ्यांमध्ये विश्लेषण करता येईल (1) समस्येचे पुथक्करण करून तिचे घटक वेगळे करणे; (2) संबंधित अशा सर्व घटकांना एकत्रित करून कोणत्या तरी सामान्य गुणधर्माच्या साहाय्याने त्यांचे वर्गीकरण करणे; (3) या घटकांत सुसूत्रता आणण्यासाठी, घटनांचा अर्थ लावण्यासाठी, अनुमानीत परिकल्पना (अभ्युपगम) सुचविणे; (4) हा अभ्युपगम बरोबर असेल तर काय काय घडायला पाहिजे ते तार्किक नियमांच्या साहाय्याने ठरविणे, किंवा त्यांचे निगमन करणे; (5) हे जे जे घडायला हवे होते ते ते तसे घडते का याचा शोध घेणे आणि अशा रितीने अभ्युपगम वस्तुस्थितीच्या कसोटीला लावून पाहणे.

एकदोन उदाहरणांनी या पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करता येईल. समजा, आपण घरी आल्यावर ध्यानात येते की, आपल्या घराला कुलूप नाही. आपल्या घरी इतर कोणी नसल्याने या गोष्टीचे आपल्याला आश्चर्य वाटते. आपण कुलूप लावायला विसरलो नाही याची खात्री असल्यास आपले आश्चर्य दुणावते. आपण साहजिकच अशी कल्पना करतो की, चोराने कुलूप तोडले असणार. आपण याचा पडताळा पाहण्यासाठी घरातील मौल्यवान वस्तु जागच्याजागी आहेत की नाहीत हे बघू लागतो. जर त्या गेलेल्या असतील तर चोर आला होता हे सिद्ध झाले असे आपण मानतो. घराला कुलूप नसणे या वस्तुस्थितीमुळे समस्या निर्माण झाली; ती सोडविण्यासाठी आपण चोर आला असावा हा अभ्युपगम मनात बाळगला आणि वस्तुस्थितीची कसोटी लावून तो बरोबर आहे की नाही हे तपासले. हे उदाहरण एका घटनेचे झाले.

दुसरे उदाहरण एखाद्या नियमाचे घेऊ. उंच डोंगरमाथ्यावर असलेल्या गावी बटाटे उकडताना त्रास पडतो हा सर्वांचा अनुभव आहे. तेच बटाटे मुंबईसारख्या शहरात चटदिशी उकडतात. मग डोंगरमाथ्यावर असे का व्हावे? संशोधनाला उद्युक्त करणारी समस्या अशा रितीने निर्माण होते. असे का होते याबद्दल आपल्याला दोनतीन कल्पना सुचू शकतील. उदाहरणार्थ, दोन्ही ठिकाणचे पाणी सारखे नसावे, दोन्ही ठिकाणांच्या उंची सारख्या नसल्याने असे होत असावे इत्यादी. समजा, आपण या दुसऱ्या कल्पनेचा पाठपुरावा करायचे ठरविले व त्याप्रमाणे इतर घटक प्रयोगासाठी समान केले. उपलब्ध ज्ञानाच्या जोरावर आपल्याला ही समस्या अशी सोडविता येते ः उंचीचा व वातावरणाच्या दाबाचा अन्योन्यसंबंध आहे. जितकी उंची जास्त तितका दाब कमी. तसेच, वातावरणाच्या दाबाचा व उत्कलनबिंदूचा अन्योन्यसंबंध आहे. जितका दाब कमी तितका उत्कलनबिंदू कमी. म्हणजे जितकी उंची जास्त तितका उत्कलनबिंदू कमी. म्हणजे उंच जागी कमी उष्णता असतानाच पाणी उकळू लागते, पण पाणी उकळले तरी बटाटे उकडत नाहीत, कारण तेवढी उष्णता बटाटे उकडायला पुरेशी पडत नाही. उंच ठिकाणी बटाटे उकडत नाहीत या घटनेचा अर्थ नित्य सृष्टिनियमांच्या साहाय्याने लागला. हे सृष्टिनियम प्रथम अभ्युपगमच होते. पण अवलोकनाने व प्रयोगांनी ते सृष्टिनियम आहेत हे सिद्ध झाले. आपल्या उदाहरणातील उत्तराचा खरेपणा पडताळून पहायचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे उंच ठिकाणी प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवायचे. या रितीने बटाटे चटदिशी उकडतील, कारण कृत्रिमरीत्या कुकरमध्ये दाब वाढविलेला असतो.

तिसरे उदाहरण मानसव्यवहाराबद्दलचे आहे. माणूस आजारी पडला म्हणजे त्याला शारीरिक कारणे असतात असे आपण धरून चालतो. पण काही वेळा शरीर सुस्थितीत असतानादेखील माणसांना आजार होतो. या आजाराचे कारण मानसिक असले पाहिजे असा फ्राॅइडने कयास केला. पण या कारणांची रोग्याला जाणीव नसल्याने ही कारणे जाणिवेच्या पलीकडे असलेल्या मनोव्यापारांत शोधली पाहिजेत असाही त्याने कयास केला. या मनोव्यापारांचा संपूर्ण आराखडा फ्राॅईडने तयार केला, आणि अनेक रोग्यांवर उपचार करताना त्याला आपल्या कल्पनेच्या खरेपणाचा पडताळा आला. तसेच आपण बोलताना, लिहिताना ज्या चमत्कारिक व एरव्ही अनाकलनीय ठरतील अशा चुका करतो त्यांच्यावर, आणि आपली स्वप्ने, दिवास्वप्ने, मनोविकृती, आपल्या सांस्कृतिक जीवनाची काही वेशिष्टये, चमत्कृतिजन्य विनोद इत्यादिकांवरही या सिद्धान्तामुळे नवा प्रकाश पडला. वस्तुस्थितीच्या अवलोकनामुळे फ्राॅईडच्या अभ्युपगमाला भक्कम पाया मिळाल्याने तो मनोविज्ञानात वैद्यकशास्त्रात महत्त्वाचा सिद्धान्त म्हणून प्रस्थापित झाला. परंतु आजच्या कलियुगात गैरवापरामुळे विज्ञान वरदानाकडून शापाकडे जात आहे.

विज्ञानकथा[संपादन]

विज्ञानाधारित असून काल्पनिक अश्या अनेक कथा-कादंबऱ्या आहेत. भा.रा. भागवत, दा.चि. सोमण, द.पां. खांबेटे, गजानन क्षीरसागर, यशवंत रांजणकर, डाॅ. बाळ फोंडके, चिंतामण श्रीधर कर्वे, अशोक पाध्ये, सुनील जोगळेकर[२], निरंजन घाटे, जयंत नारळीकर आदींनी त्या रंजकतेने लोकप्रिय केल्या.

विज्ञान या विषयावरील पुस्तके[संपादन]

  • विज्ञानवाटा (लेखसंग्रह, लेखक - जोसेफ तुस्कानो)
  • वेध अनंताचा (विज्ञानलेख संग्रह, लेखक - सुनील जोगळेकर)
  • दुर्बिणींचे विश्व (दुर्बिणींचा समग्र इतिहास, लेखक - सुनील जोगळेकर)
  • जगाचा भार (विज्ञान कथा संग्रह)
  • कृष्णमेघ (विज्ञान कादंबरी, मूळ लेखक सर फ्रेड हॉईल; अनुवाद उल्हास देवधर)
  • गुणवत्ता आणि निसर्गमैत्री (लेखक - जोसेफ तुस्कानो)
  • विज्ञानातील किस्से (लेखक - सुनील जोगळेकर)
  • कौल (विज्ञानकथा संग्रह, लेखक - मुकुंद जोगळेकर)

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "सौंदर्य".
  2. ^ https://sites.google.com/site/sunilprakashan1992/home/suniljoglekar--alpaparichay. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य)

हेसुद्धा पहा[संपादन]