गडचिरोली जिल्हा
गडचिरोली गडचिरोली | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
[[Image:|260 px|center|गडचिरोली जिल्हा चे स्थान]]महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | नागपूर |
मुख्यालय | गडचिरोली |
तालुके | अहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज (वडसा), धानोरा, भामरागड , मुलचेरा, सिरोंचा (एकूण १२) |
क्षेत्रफळ | |
- एकूण | १४,४१२ चौरस किमी (५,५६५ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | 1071795 (2011) |
-लोकसंख्या घनता | ६७ प्रति चौरस किमी (१७० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ७०.६ % |
-लिंग गुणोत्तर | ९७६/ १००० ♂/♀ |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ८४०.७ मिलीमीटर (३३.१० इंच) |
गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्त्वात आला. पूर्वीचे गडचिरोली, सिरोंचा हे दोन चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षलसमर्थक लोक आश्रय घेतात.
हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रादेशिक भागात येतो.
इतिहास
[संपादन]फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्कूट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. यानंतर गडचिरोलीवर गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात, खंडक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशामधला स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्त्वात आला. ब्रिटिशांनी १९०५ मध्ये चंद्रपूरमधील व ब्रह्मपुरीमधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्यांत चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा हा भारताच्या ५५६ वा जिल्हा म्हणून अस्तित्त्वात आला. वैनगंगा नदीला सीमारेषा मानून चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते.
भूगोल
[संपादन]जिल्ह्याच्या ईशान्य भागात, धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे तालुके असून ते घनदाट जंगलाने व्यापलेले आहेत. जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, मागासलेला, डोंगरदऱ्यांनी व घनदाट जंगलाने व्याप्त असून अविकसित समजला जातो. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेस भंडारा जिल्हा, पूर्वेस छत्तीसगड राज्य, दक्षिणेस व काहीसा नैऋृत्तेस Telangana राज्य, पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे.
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून तिच्या दक्षिण तीरावर हा जिल्हा वसलेला आहे. प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या नद्यांच्या संगमाने बनलेली नदी) व इंद्रावती ह्या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात.
हवामान
[संपादन]गडचिरोली जिल्ह्याचे हवामान उन्हाळ्यात खूप उष्ण तर हिवाळ्यात खूप थंड असते. जिल्ह्याची सरासरी आर्द्रता ६२ टक्के आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २० मे १९९२ रोजीला सर्वात जास्त ४६.३ अंश.से. एवढे व ५ जानेवारी १९९२ रोजी सर्वात कमी ५.० अंश से. एवढे तापमान नोंदले गेले आहे.
जनता
[संपादन]जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या १,०८,८२४ एवढी असून तिची एकूण टक्केवारी ११.२ होते. आदिवासी जमातींच्या लोकांची संख्या ३,७१,६९६ एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. त्यांची टक्केवारी ३८.३० एवढी आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा समजला जातो. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक आहेत. त्यांच्या बोलीभाषा "गोंडी, माडिया" ह्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये यांशिवाय मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात.
लोकजीवन
[संपादन]जिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे "पेरसा पेन" हे दैवत आहे. ही लोक शुभकार्यप्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर "रेला" नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. " ढोल " हे सुद्धा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात ही मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे.
जिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात. जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध "नाटक, तमाशा" इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे दिवाळी ते होळी या कालावधीत झाडीपट्टीतील भागात आयोजन केल्या जाते या मुळे झाडीपट्टी नाटकासाठी वडसा हे तालुका ठिकाण प्रसिद्ध आहे गणपती, दसरा, होळी या सणाचे वेळी तसेच शंकरपटाच्या निमित्ताने आयोजन होते.
झाडीपट्टी रंगभूमी
[संपादन]झाडीपट्टी रंगभूमी ही आपले वेगळेपण जपत कार्यशील आहे. या रंगभूमीने हजारो कलावंत घडवले आहेत. या झाडीपट्टी प्रदेशात जवळपास पन्नास नाट्यमंडळे असून, येथे दोनशेहून अधिक नाटकांचे लिखाण झाले आहे. शंभराहून अधिक नाट्यलेखक आपल्या लेखणीद्वारे नाटयलेखन करीत आहेत.
सुगीच्या हंगामात दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की, देसाईगंज (वडसा) येथील नाटकांना प्रारंभ होतो. झाडीपट्टी रंगभूमीवर लोककथा, लोकगीते, दशावतार, लळीत, खडीगंमत, दंडार, दंडीगान, गोंधळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तनेे, भारुड, वासुदेव, तमाशे, वग, विविध नृत्यप्रकार असून, चित्र-शिल्प यासारख्या अनेक लोककलांच्या माध्यमातून लोकरंजनाचे कार्य सुरू असते. लोककलांच्या माध्यमातून झाडीपट्टी रंगभूमीवर सतत विविध प्रकारचे महोत्सव होत असतात. नाटकाचे मूळ भगीसोंग, दंडार, राधा, दंडीगान, खडीगंमत, डाहाका, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे यांतूनच आढळून येते. लोककलांमधूनच नाटकाची उत्क्रांती झाली आहे.असे म्हणता येईल.झाडीपट्टीत पूर्वीपासून दंडार आणि विविध लोककला सादर व्हायच्या असा उल्लेख आढळतो.
इसवी सन १८८६मध्ये नागपूरला सांगलीकर नाटक मंडळी आली होती. नाटकाच्या प्रेमापोटी पुण्या-मुंबईतील नाटके पाहण्यासाठी झाडीपट्टीचे कलावंत नागपुरात जात असत. तेथील प्रयोग बघत असत. त्यांना त्यांच्या नाटकांमध्ये वेगळेपणा जाणवत होता. हा वेगळेपणा त्यांना अधिक प्रमाणात प्रेरित करीत होता. त्यामुळे येथील दंडारकर्मींनी तिथून धडे घेणे सुरू केले आणि दंडारीचे रूपांतर नाटकात होऊ लागले. झाडीपट्टी रंगभूमीवर नवरगाव येथील बालाजी पाटील बोरकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी १९०९ मध्ये चिलिया बाळाची भूमिका केली होती.असे अनेक कलावंत येथे घडले. झाडीपट्टी रंगभूमीवर म्हणावे तेवढे संशोधन झालेले दिसत नाही, झाडीपट्टी रंगभूमीचे योगदान एकूणच मराठी रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी फार मोलाचे आहे .झाडीपट्टी रंगभूमीवरील संशोधन भावी काळातील संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो.झाडीपट्टी रंगभूमीवर लेखन व सादरीकरण यातील वैविध्यपूर्ण आहे. झाडीपट्टी रंगभूमीला अनेक कलावंतांनी उभे केले आहे.झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यकला रुजविण्यात कोहळी समाजाचे लक्षणीय योगदान आहे. हा कोहळी समाज जमीनदारी आणि मालगुजारी करायचा.या कलारसिकांना दंडारी पाहण्याचा छंद होता. त्यांनी स्वतःचे दंडारमंडळ आणि त्यानंतर नाट्यमंडळ गावोगावी सुरू केले.यातून झाडीपट्टी रंगभूमी बहरली.सण-उत्सवात निमित्ताने आगळ्यावेगळ्या पण वैभवशाली, गौरवसंपन्न आणि समृद्ध अशा लोक उत्सवांची रेलचेल या भागात असते. यामध्ये मंडई, शंकरपट, गळ, यात्रा यांचा समावेश आहे. विविध कला प्रकार येथे सादर केले जातात. विविध सण उत्सवांच्या आयोजनातून सामूहिकरीत्या साकार होणारी दंडार, नाटके, गोंधळ, तमाशा, राधा यांचा विशेषत्वाने मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये समावेश होतो. सर्व लोककला प्रकार झाडीपट्टी रंगभूमीवर सादर केले जातात.नाट्यसादरीकरणासाठी नेपथ्यात पडदे, सिनसिनेरी वापरतात. संगीताचे साहित्य वाद्य तयार केले. झाडीपट्टी रंगभूमीवर तीन-तीन महिने तालीम करून नाटक बसवतात. नाटय निर्माते पेटीमास्टर, दिग्दर्शकाकडून गाणी बसवून घेत असतात. झाडीपट्टी रंगभूमी ही मराठी रंगभूमीवरील एक समृद्ध रंगभूमी म्हणून ओळखली जाते झाडीपट्टी रंगभूमी ने आपले लेखन सादरीकरण यातील वैविध्य यामुळे आपले स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केले आहे.या उत्सवांच्या आयोजनातून सामूहिकरिीत्या साकार होणारी दंडार, नाटकं, गोंधळ, तमाशा, राधा यांचा विशेषत्वाने मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये समावेश होतो. अस्सल झाडीबोली भाषेतील संगीतमयी सांस्कृतिक नाट्यपरंपरेच्या या भूमीला झाडीपट्टी रंगभूमी म्हणून अनेक दशकांपासून ओळख मिळाली आहे.माहिती-तंत्रज्ञानाच्या आजच्या इंटरनेट युगात मानवी मनाला हवे ते अगदी सेकंदात ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळत असूनही झाडीतला प्रेक्षक मात्र झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांचा दिलदारपणे आस्वाद घेतो, ही झाडीपट्टी रंगभूमीची ही एक खासियत म्हणावी लागेल. रात्री १० वाजेपासून पहाटेपर्यंत चालणारी नाटके हेही एक वैशिष्ट्य! येथील रंगभूमीची मनोभावे सेवा करून आपली कला अर्पण करणारे सारे कलावंत आणि त्यावर जीव ओवाळत प्रेम करणारे रसिक यांच्यामुळे झाडीच्या प्रत्येक नाटकाला आजही तोबा गर्दी उसळते. आजपासून तब्बल ९० वर्षांपूर्वी ब्रिटिशकालीन भारताच्या इंग्रज सत्ताधाऱ्यांनासुद्धा झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांनी पार वेड लावले होते. इंग्रजांना मराठी भाषा समजत नसल्यामुळे भाषांतरकाराची मदत घेऊन मराठीचे हिंदी, इंग्लिश भाषेत रूपांतर केले जात होते. ब्रिटिश सरकारने झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांचा आस्वाद घेतला होता. झाडीपट्टी रंगभूमीचे सामाजिक योगदान*:-
कला आणि समाज या दृष्टीने झाडीपट्टी रंगभूमीचे सामाजिक महत्त्व फार आहे. नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रबोधन साधण्याचे काम होत आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले जात आहे. अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेल्या लोकांना नाटकांच्या निमित्ताने गावाची ओढ लागते. त्यांची मातीशी नाळ कायम जुळवून ठेवण्याचे काम झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून होत आहे. गावात पाहुणे येत असल्याने अनेक उपवर मुला-मुलींचे विवाह जुळवून आणण्याचा योग या निमित्ताने साधला जातो.सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग झाल्यावर नवेगावबांधच्या नाट्यमंडळाने प्रस्तुत केलेल्या नाटक प्रयोगांनी प्रभावित होऊन तत्कालीन कलेक्टर स्मिथ यांनी श्री बालाजी प्रासादिक नाट्य मंडळाचे कर्तेधर्ते सीताराम पाटील डोंगरवार यांचा पदक देऊन त्यांचा गुणगौरव केला. आजही ते मेडल सीताराम पाटलांचे नातू नारायण माधवराव डोंगरवार, रा.धाबेपवनी (जि.गोंदिया) यांच्या घरी जपून ठेवले आहे. झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असून झाडीच्या रंगभूमीचा प्रभाव आणि लोकप्रियता यातून स्पष्ट होते. सीताराम पाटील डोंगरवार यांच्या नेतृत्वात नवेगावबांध येथील कलाकार मंडळींनी सिंहाचा छावा हे संगीत नाटक सादर केले. या नाटकात अरण्यपुत्र माधवराव डोंगरवार, रामकृष्ण डोंगरवार, लटारू पोतदार, गणा गायकवाड, सीताराम पवार, काशिनाथ डोंगरवार, आत्माराम बाळबुद्धे, पंढरी डोंगरवार, हरी खुणे, पांडुरंग बोरकर, रामा डोंगरवार यांनी अभिनय केला होता, अशी माहिती उपलब्ध आहे. कलेला कसलेही बंधन नसतात.केवळ अंगभूत असलेल्या कलेच्या जोरावर येथील कलावंत रंगभूमीवर आपली कला सादर करीत आहे. परंतु झाडीपट्टीमध्ये अभिनय, संगीत यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण झाल्यास झाडीपट्टी रंगभूमीचे भविष्य आणखी उज्ज्वल होऊ शकते.झाडीपट्टी रंगभूमीने आपले वेगळे पण जपत प्रादेशिक भान ठेवून जागतिकीकरणातही आपले स्थान अबाधित ठेवले आहे. झाडीपट्टी रंगभूमी ही महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रंगभूमी आहे या रंगभूमीने समग्र भारतीय रंगभूमीला सशक्त कलावंत दिलेले आहेत .भारतीय रंगभूमी समृद्ध करण्यात झाडीबोलीत पट्टी रंगभूमीचे योगदान हे अनमोल आहे . झाडीपट्टी रंगभूमी या देशातील एक अतिशय समृद्ध अशी रंगभूमी आहे .झाडीपट्टी रंगभूमीवर संशोधन होणे ही काळाची गरज आहे.
व्यवसाय
[संपादन]हा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
उद्योग
[संपादन]जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे. भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहेत पण मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे.
प्रशासन
[संपादन]गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहा प्रशासकीय उपविभाग (गडचिरोली, वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा) आहेत. प्रत्येक उपविभागात दोन, असे एकूण १२ तालुके आहेत. जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती असून १६८८ राजस्व गावे अस्तित्त्वात आहेत. जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा व एक लोकसभा क्षेत्र (चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून) असून १२ पंचायत समित्या आहेत. जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज ही दोन शहरे असून येथे नगरपालिका आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनानंतर गडचिरोली तालुक्यातील ०५ आणि सिरोंचा विभागातील ०३ तालुके असे मिळून ०८ तालुक्यांसह गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली होती. पुढे इ.स. १९९२ला प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणखी ०४ तालुक्यांची निर्मिती केली.[१]
जिल्ह्यातील तालुके
[संपादन]- अहेरी
- आरमोरी
- एटापल्ली
- कुरखेडा
- कोरची
- गडचिरोली
- चामोर्शी
- देसाईगंज (वडसा)
- धानोरा
- भामरागड
- मुलचेरा
- सिरोंचा
आकडेवारी
[संपादन]जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र :१४,४१२ किमी२
जिल्ह्याचे पृथ्वीवरील स्थान : १८.४३ ते २१.५० उत्तर अक्षांश आणि ७९.४५ ते ८०.५३ पूर्व रेखांश
समुद्रसपाटीपासून सरासरी उंची - २१७ मीटर (७१५ फूट )
जिल्ह्याचे तापमान (इ.स. १९९८) : सर्वात कमी ११.३ अंश सेल्शियस. सर्वात जास्त ४७.७ अंश सेल्शियस.
सरासरी पर्जन्यमान (२०११) : ८४०.७ मिलिमीटर
जिल्ह्यातील एकूण उपविभाग (६) १.गडचिरोली २. देसाईगंज (वडसा) ३. अहेरी
४. कुरखेडा ५. चामोर्शी ६. एटापल्ली
जिल्ह्यातील एकूण तालुके १२
जिल्ह्यातील एकूण गावे १,६७९
जिल्ह्यातील एकूण शहरे २ ( गडचिरोली, देसाईगंज)
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती ४६७
एकूण नगरपालिका (3) १. गडचिरोली २. देसाईगंज ३.आरमोरी
लोकसभा निर्वाचन क्षेत्र (१) चिमूर-गडचिरोली
विधानसभा निर्वांचन क्षेत्रे (३) गडचिरोली, आरमोरी, अहेरी
एकूण पोलीस स्टेशन्स २९
पोलिस आऊट पोस्ट ३१
लोकसंख्या (२००१)
एकूण ९,७०,२९४
पैकी पुरुष ४,९१,१०१
आणि स्त्रिया ४,७९,१९३
लोकसंख्या घनता ६७ प्रति चौरस किलोमीटर
स्त्रिया / पुरुष प्रमाण ९७६/ १०००
साक्षरता (इ.स. २००१ च्या खानेसुमारीप्रमाणे)
एकूण ६०.१ %
पुरुष ७१.९ %
स्त्रिया ४८.१ %
अर्थकारण
[संपादन]बाजारपेठ
[संपादन]जिल्हाला एकाच मोठी बाजार पेठ आहे, ती वडसा(देसाईगंज) येथे भरते. वडसा हे शहर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले असून, जिल्ह्यातील एकमेव रेल्वे लाईन (गोंदिया-नागभीड-चंद्रपूर) येथून जाते. त्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे.
नागरी प्रशासन
[संपादन]जिल्ह्यात तीन नगरपालिका असून त्या गडचिरोली , वडसा व आरमोरी येथे आहेत.
जिल्हा प्रशासन
[संपादन]वाहतूक व्यवस्था
[संपादन]प्रसारमाध्यमे
[संपादन]लोकमत देशोन्नती पुण्यनगरी सकाळ दैनिक भास्कर लोकशाही वार्ता
शिक्षण
[संपादन]प्राथमिक व विशेष शिक्षण
[संपादन]महत्त्वाची महाविद्यालये
[संपादन]येथील महाविद्यालये ही गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत येतात.
१) शासकीय विज्ञान महाविद्यालय , गडचिरोली
२) गव्हर्नर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज गडचिरोली
संशोधन संस्था
[संपादन]लष्कर शिक्षण व संशोधन संस्था
[संपादन]गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना सैनिकी विद्यालय नावाचे एक सैनिकी विद्यालय आहे..
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]मार्कंडा, चपराळा, आलापल्ली, वैरागड. हेमलकसा, कामलापूर
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासिक शिवमंदिर व चप्राळा येथील हनुमान मंदिर ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथून १० किलोमीटर अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान असून तेथे खूप मोठी मारुतीची मूर्ती आहे.
चामोर्शी तालुक्यात माडेमुधोली परिसरातील 'कोठ्री' या गावालगत असलेल्या घनदाट व्यापलेल्या जंगलामध्ये "महामानव तथागत गौतम बुद्ध" यांचे [बौद्ध विहार] आहे. त्यास 'अरण्यवास बुद्ध विहार, नाला संगम कोठ्री, परिसर माडेमुधोली' या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी दरवर्षी हिवाळ्यात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी 'वर्षावास समारोपन सोहळा, म्हणून कार्यक्रम घेतला जातो. तेथे सलग 10 दिवस लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर संख्येने लोक त्या ठिकाणी बुद्धाच्या दर्शनास येत असतात. गडचिरोली सोबतच चंद्रपूर, गोंदिया ,भंडारा, नागपूर इत्यादी जिल्ह्यातील लोक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.[(22/08/2022)]
आरोग्यसेवा
[संपादन]या जिल्ह्यात खालील प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध आहे-
- जिल्हा रुग्णालय - १
- जिल्हा उपरुग्णालय - महिला व बाल रुग्णालय गडचिरोली
- एकूण ग्रामीण रुग्णालये - १३
- एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे - ४५
- प्राथमिक आरोग्य पथके - ३६
या समवेतच डॉ. अभय बंग व त्यांची पत्नी राणी बंग यांची सर्च (शोधग्राम, गडचिरोली) ही संस्था तेथील आदिवासींना आरोग्यसेवा पुरवते. डॉ. प्रकाश आमटे यांची लोक-बिरादरी (हेमलकसा, भामरागड) ही संस्थादेखील आदिवासींना सामाजिक व आरोग्यविषयक मदत करते.
संदर्भ
[संपादन]- ^ महाराष्ट्र शासन (मार्च २०११). गडचिराली जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन. मुंबई: अर्थ व सांख्यिकी संचालनालय. pp. पृ. २.