Jump to content

बाबुराव बागुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाबुराव बागुल
जन्म नाव बाबुराव रामजी बागुल
टोपणनाव आबा
जन्म जुलै १७, १९३०
विहितगाव, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू मार्च २६, २००८
नाशिक, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
चळवळ मराठी आंबेडकरवादी साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती मी जात चोरली होती
मरण स्वस्त होत आहे
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कार्ल मार्क्स
अण्णा भाऊ साठे
वडील रामजी/रामचंद्र

बाबुराव बागुल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारुण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. दलित साहित्य मध्ये मोठे योगदान देणारे एक प्रतिभावंत लेखक साहित्यिक म्हणून बाबूराव बागूल यांना एक नवी ओळख मिळालेले आहेत त्यांनी लिहिलेल्या कथा व कादंबऱ्या या गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांचं व वेदनांचं वर्णन करणारे आहेत स्त्रीप्रधान कथालेखन हा देखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे सूड कथेमध्ये बाबुराव बागुल यांनी वाडी वस्तीवरील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचं चित्रण केलेला आहे या कथेतील स्त्री पात्र हे समाजातील स्त्रियांच्या शोषित पीडित स्त्रीच्या सामाजिक स्थितीचं चित्रण करणार आहे

जीवन

[संपादन]

बाबुराव बागुल जुलै १७, १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात जन्मले. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कॅंपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कॅंपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.

१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली.

१९५७ मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ‘नवयुग’ व ‘युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा १९६३ साली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. मार्च २६, २००८ रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.

सन्मान व पुरस्कार

[संपादन]

प्रकाशित साहित्य

[संपादन]

कादंबरी

[संपादन]
  • अघोरी (1983)
  • अपूर्वा
  • कोंडी (2002)
  • पावशा (1971)
  • भूमिहीन
  • मूकनायक
  • सरदार
  • सूड

कथासंग्रह

[संपादन]
  • जेव्हा मी जात चोरली होती (१९६३)
  • मरण स्वस्त होत आहे (१९६९)

कवितासंग्रह

[संपादन]
  • वेदाआधी तू होता

वैचारिक

[संपादन]
  • आंबेडकर भारत
  • दलित साहित्यः आजचे क्रांतिविज्ञान