वसंत बापट
विश्वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट (२५ जुलै, इ.स. १९२२ - १७ सप्टेंबर, इ.स. २००२) हे मराठी कवी होते.
जीवन
[संपादन]बापटांचा जन्म २५ जुलै, इ.स. १९२२ रोजी महाराष्ट्रातील कऱ्हाड येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. इ.स. १९४२च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते.
तुरुंगातून सुटल्यावर वसंत बापट 'नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि 'रामनारायण रुईया कॉलेज (माटुंगा)' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. इ.स. १९४७ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. दरम्यान, इ.स. १९७४ मध्ये ते मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे प्राध्यापक झाले. ते दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्य होते.
लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्न होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते.
पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली.
इ.स. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. इ.स. १९७७ व इ.स. १९९३ मध्ये अमेरिकेत आणि इ.स. १९९२ मध्ये आखाती देशांत त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले.
महाराष्ट्राचे दौरे
[संपादन]वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या कवींनी सतत चाळीस वर्षे बृहन्महाराष्ट्रात प्रवास करून आपल्या काव्यवाचनाने मुलुख गाजविला. त्या काळात त्यांच्या कवितांनी मराठी रसिकांना वेडे केले होते.
वसंत बापट यांचे प्रकाशित काव्यसंग्रह
[संपादन]- अकरावी दिशा
- अनामिकाचे अभंग आणि इतर कविता
- अबडक तबडक (बालकवितासंग्रह)
- अहा, देश कसा छान
- आजची मराठी कविता (संपादित, सहसंपादन डॉ. चारुशीला गुप्ते)
- आम्हा गरगर गिरकी (बालकवितासंग्रह)
- चंगा मंगा (बालकवितासंग्रह)
- ताणेबाणे
- तेजसी
- परीच्या राज्यात (बालकवितासंग्रह)
- प्रवासाच्या कविता
- फिरकी (बालकवितासंग्रह)
- फुलराणीच्या कविता (बालकवितासंग्रह)
- बिजली
- मानसी
- मेघहृदय
- रसिया
- राजसी
- शततारका
- शतकांच्या सुवर्णमुद्रा
- शिंग फुंकिले रणी
- शूर मर्दाचा पोवाडा
- सकीना
- सेतू
वसंत बापट यांच्या गाजलेल्या कविता
[संपादन]- आभाळाची आम्ही लेकरे
- उत्तुंग आमुची उत्तर सीमा
- केवळ माझा सह्यकडा
- गगन सदय तेजोमय
- देह मंदिर चित्त मंदिर
- फुंकर
- बाभुळझाड
- शतकानंत आज पाहिली
- सदैव सैनिका, पुढेच जायचे
- सैन्य चालले पुढे, वगैरे वगैरे.
बाह्य दुवे
[संपादन]- "कविवर्य".
- "आपला प्रदेश वसंत बापट यांचा लेख". 2018-09-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-17 रोजी पाहिले.
- "वसंत बापट यांची गाणी".
- "Renowned Marathi poet Vasant Bapat dead" (English भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)