गोविंद त्र्यंबक दरेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कवी गोविंद या पानावरून पुनर्निर्देशित)

स्वातंत्र्यशाहीर गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर मूळ गाव - कन्हेर पोखरी ता.पारनेर ( ९ फेब्रुवारी, इ.स. १८७४ - २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६) यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.

नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी 'मित्रमेळा' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना 'लघु अभिनव माला'मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच 'मित्रमेळा' 'अभिनव भारत' या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.

'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ','सुंदर मी होणार', 'कारागृहाचे भय काय त्याला? ', 'नमने वाहुनि स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे? ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.

प्रखर देशभक्तिपर कविता लिहिणाऱ्या या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्‍तही करण्यात आल्या होत्या.