Jump to content

बहिणाबाई चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहिणाबाई चौधरी
बहिणाबाई नथुजी चौधरी
जन्म नाव बहिणाबाई नथुजी चौधरी
जन्म २४ ऑगस्ट १८८०- नागपंचमी
गाव-असोदा, जिल्हा-जळगाव (महाराष्ट्र)
मृत्यू ३ डिसेंबर १९५१
जळगाव
राष्ट्रीयत्व भारतीय
साहित्य प्रकार कविता
वडील उखाजी महाजन
आई भिमाई उखाजी महाजन
पती नथुजी खंडेराव चौधरी
अपत्ये ओंकार चौधरी, कवि सोपानदेव चौधरी, काशी (कन्या)

बहिणाबाई नथुजी चौधरी (२४ ऑगस्ट, इ.स. १८८० - ३ डिसेंबर, इ.स. १९५१) []या -मराठी कवयित्री होत्या.[]

चरित्र आणि जीवन

[संपादन]

बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा) या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म :२४ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.[] तीन भाऊ- घमा, गना आणि घना, तीन बहिणी- अहिल्या, सीता आणि तुळसा. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.[] नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे "लेवा गणबोली" तील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.[] बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा मुलगा (ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई श्रीमती पद्‌माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबाईंच्या नातसून) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे.

आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारे, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य ह्यांची जपणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचे दर्शन घेतात. बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाईशी नाते जोडतात. त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने पहावे असं हे बहिणाबाईंचे संग्रहालय आहे. आचार्य प्र. के. अत्रे यांच्यामुळे बहिणाबाईंचे विचारधन लोंकांच्या समोर आले.  १९५० सालच्या जुलै आगस्ट मध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते .  बहिणाबाईंच्या कविता सोपान देव  आणि त्यांच्या एका भावाने लिहिल्या. कारण बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. बहिणाबाईंच्या मृत्यू नंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली होती. कविता चाळलया बरोबर अत्रे उद्गारले 'हे तर शंभर नंबरी सोन आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल!' [] बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादा पेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही, कि कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानचे वेगळेपण आहे. त्यांचे तवज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्त्वज्ञान आहे. []

बहिणाबाई चौधरींच्या नावारूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे[]हे...

कविता संग्रह

[संपादन]

महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी[] हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे",आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली []आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे.

बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.

कवितांचे विषय

[संपादन]

बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.[१०] [११]त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग;[१२] अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.[]

निसर्ग चित्रण

[संपादन]

बहिणा बाईंच्या रचनांच्यात जागोजागी जीव जातींचा उल्लेख आलेला आहे. उदाहरणार्थ, खीरा, भीमफूल,गोंडंबा, सागरगोटे, ढोर, इचू, साप, कपाशी, गाय, बोरी, बाभई, पळस, सुगरण.

काव्य रचनेची वैशिष्ट्ये

[संपादन]

लेवा गणबोली (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. [१३]खानदेशातील आसोदे हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दुःखे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.[१४]

उदा० ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.
तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.[]

अभिप्राय आणि समीक्षा

[संपादन]

‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.

काव्य रचनांचा अभ्यास

[संपादन]

बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो. [१५] [१६]

काव्य रचनांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम

[संपादन]

बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित "खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा" हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. या कार्यक्रमाचे निर्माते ..... संगीत दिग्दर्शक व गायक दत्ता चौगुले व माधुरी आशिरगडे या असून निर्मिती वर्ष ......आहे.

सन्मान

[संपादन]

शैक्षणिक संस्था

[संपादन]

बहिणाबाई चौधरी यांच्या नावे जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

लघुपट

[संपादन]

दूरदर्शनने ?? साली बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित 'बहिणाई' नावाच्या लघुपटाची निर्मिती ....साली केली.[१७]

भाषांतरे

[संपादन]

बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. [१८]अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांची समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे.

यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता.

बहिणाबाई आणि त्यांच्या कवितांवरील पुस्तके

[संपादन]
  • बहिणाबाईंची गाणी (संपादित; संपादक - लक्ष्मीनारायण बोल्ली)
  • बहिणाईची कहाणी आणि गाणी संपादक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी अथर्व पब्लिकेशन्स जळगाव
  • बहिणाबाई चौधरी व्यक्तित्व आणि कवित्व डॉ.काशिनाथ विनायक बर्हाटे अथर्व पब्लिकेशन्स जळगाव
  • बहिणाबाईंची गाणी - मोडी आणि मराठी डॉ. उज्वला भिरूड (नेहते) अथर्व पब्लिकेशन्स जळगाव
  • लेवा गणबोली : एक वास्तव ( बहिणाबाईंची काव्यबोली ) डॉ. अरविंद कृष्णा नारखेडे अथर्व पब्लिकेशन्स जळगाव

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sarang, Vilas (2007). Another life: poems (इंग्रजी भाषेत). Poetrywala.
  2. ^ Journal of South Asian Literature (इंग्रजी भाषेत). Asian Studies Center, Michigan State University. 1982.
  3. ^ a b c d SARVEKAR, KAILAS (2017-07-01). MARATHI GRAMIN KAVITECHA ITIHAS. Mehta Publishing House. ISBN 9789386745910.
  4. ^ Administrator. "बहिणाबाई चौधरी". Marathi World (इंग्रजी भाषेत). 2018-07-05 रोजी पाहिले.
  5. ^ "बहिणाबाई चौधरी". uniquefeatures.in (इंग्रजी भाषेत). 2015-03-10. 2018-06-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-05 रोजी पाहिले.
  6. ^ patil, prakash (2012). karmyogini. kolhapur: mukta publishing house private limited. pp. 12–13. ISBN 978-93-81249-09-3.
  7. ^ patil, prakash (2012). karmyogini. kolahpur: mukta publishing house. p. 01. ISBN 978-93-81249-09-3.
  8. ^ परदेशी, जळगाव, युवराज (२४ मार्च २०१८). "उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र विधानसभेत घोषणा". लोकसत्ता न्यूजपेपर, जळगाव. २४ मार्च ‌‌‌२१०८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०८ डिसेंबर २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ Deshpande, Bhimrao Gopal (1963). Marāṭhī kā ādhunika sāhitya: Itihāsa, 1905 se 1960 (हिंदी भाषेत). Navayuga Bukasṭôla.
  10. ^ तिवारी, सियाराम (2015). Bhartiya Sahitya Ki Pahchan (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789350729922.
  11. ^ Parishada, Bhāratī (1964). Mahādevī Varmā abhinandana grantha (हिंदी भाषेत). Śrīdhara Śāstrī.
  12. ^ प्रा.पाटील ए. बी. ( १८. ६. २०१८). "बहिणाबाई निसर्गकन्या नव्हे भूमिकन्याच".
  13. ^ Iqbal, Dr Jaquir (2009-10-01). Islamic Financial Management (इंग्रजी भाषेत). Global Vision Publishing House. ISBN 9788182202214.
  14. ^ प्रा. पाटील ए. बी. (१८. ६. २०१८). "बहिणाबाई निसर्गकन्या नव्हे भूमिकन्याच".
  15. ^ "'बालभारती' मध्ये कविता राऊत ( २२. ५. २०१५ )".
  16. ^ "'सावरपाडा एक्सप्रेस' कविता राऊतचा खडतर प्रवास यंदापासून पाचवीच्या अभ्यासक्रमात (२२. ५. २०१५)".
  17. ^ "बहिणाईच्या कवितांचा गहिरा अनुभव -Maharashtra Times". Maharashtra Times. 2011-01-02. 2018-07-05 रोजी पाहिले.[permanent dead link]
  18. ^ "बहिणाबाईंचे काव्यधन आता साहेबाच्या भाषेत! (२९. १०. २०१४)".