Jump to content

पुरुषोत्तम शिवराम रेगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पु.शि. रेगे या पानावरून पुनर्निर्देशित)
पुरुषोत्तम शिवराम रेगे

पुरुषोत्तम शिवराम रेगे (जन्म : मिठबाव-रत्‍नागिरी जिल्हा, २ ऑगस्ट १९१०; - १७ फेब्रुवारी १९७८]), पु.शि. रेगे किंवा पुरु.शिव.रेगे हे मराठी लेखक, कवी व नाटककार होते.

रेग्यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील मिठगाव या गावात झाला होता. मुंबई व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील व गोव्यातील विविध महाविद्यालयांत अध्यापन केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेज मधून ते १९७० साली प्राचार्य असतांना निवृत्त झाले.

साहित्य

[संपादन]

रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्‍न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणाऱ्या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कविमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर शब्दांची मधुर पखरण असे. “जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रद्धा व धारणा होती.

“फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबऱ्या दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह आहे.

अन्य

[संपादन]

या साहित्याखेरीज त्यांनी काही शैक्षणिक पुस्तकेही लिहिली आहेत. छंद या द्वैमासिकाचे संपादन ही रेगे यांची आणखी एक क्षणीय कामगिरी होय. हे भाषा, कला व साहित्य या विषयांना वाहिलेले हे एक वाङ्मयीन नियतकालिक होते. १९५४ मध्ये काही समानधर्मीयांच्या सहकार्याने त्यांनी ते सुरू केले. १९६० साली ते त्यांनी बंद केले. रेगे यांनी छंदमध्ये विपुल लेखन तर केलेच; पण त्याची संपादकीय व्यावहारिक व आर्थिक बाजूही आस्थेने संभाळली. ते सरकारी नोकरीत असल्याने छंदवर संपादिका म्हणून त्यांच्या पत्‍नीचे, सरिता रेगे यांचे नाव छापलेले असे.


प्रकाशित साहित्य

[संपादन]

कादंबऱ्या

[संपादन]
  • अवलोकिता
  • मातृका
  • रेणू
  • सावित्री (कादंबरी आणि नाटक)

नाटक

[संपादन]
  • कालयवन
  • चित्रकामारव्यम् (नाटिका)
  • पालक (नाटिका)
  • मध्यतंर (नाटिका)
  • माधवी : एक देणे
  • रंगपांचालिक
  • सावित्री

काव्यसंग्रह

[संपादन]
  • अनीह (प्रकाशन रेग्यांच्या निधनानंतर, १९८४)
  • गंधरेखा
  • दुसरा पक्षी (१९६६)
  • दोला (१९६२)
  • पु.शि. रेगे यांची निवडक कविता (संपादन : प्रकाश देशपांडे)
  • पुष्कळा
  • प्रियाळ (१९७२)
  • फुलोरा
  • साधना आणि इतर कविता (१९३१)
  • सुह्रदगाथा (१९६६)
  • हिमसेक (१९४३)

अन्य

[संपादन]
  • एका पिढीचे आत्मकथन (आत्मचरित्र)
  • छांदसी(समीक्षा)
  • मर्मभेद (समीक्षा)

पु.शि. रेगे यांच्यावरील पुस्तके

[संपादन]
  • पुरुषोत्तम शिवराम रेगे (चरित्र, लेखिका - डॉ. सुलभा हेर्लेकर)
  • पु.शि. रेगे - एक पृथगात्म मानदंड (डाॅ. संगीता भिसे-खुरद)
  • पु० शि० रेगे : व्यक्ती आणि वाङ्मय : मोनोग्राफ (केदार प्रकाशन, पणजी गोवा, २००८, संपादक - प्रोफेसर (डॉ०) सु० म० तडकोडकर, विभाग प्रमुख, मराठी पदव्युत्तर अध्यापन व संशोधन विभाग, गोवा विद्यापीठ)

गौरव

[संपादन]
  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, वर्धा, १९६९
  • १९६५ मध्ये रशियात मॉस्को येथे लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात पु.शि. रेगे भारताचे प्रतिनिधी होते.
  • १९६५ मध्ये केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे ते उद्‌घाटक होते.

बाह्य दुवे

[संपादन]