Jump to content

त्र्यं.वि. सरदेशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्र्यं.वि. सरदेशमुख
राष्ट्रीयत्व भारतीय

त्र्यंबक विनायक सरदेशमुख (२२ नोव्हेंबर, [[इ.स. १९१९]:अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत - १२ डिसेंबर, इ.स. २००५:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी कादंबरीकार, समीक्षक आणि कवी होते.

शिक्षण

[संपादन]

त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोट येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण सोलापूर व नंतर पुणे येथे झाले.

ललित लेखन

[संपादन]

त्र्यं.वि. सरदेशमुखांनी सुरुवातीला ज्योत्स्ना, वाङ्मयशोभा, धर्नुधारी इत्यादी मासिकांतून लेखन केले. त्यानंतर ससेमिरा ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. आपले काव्यलेखन त्यांनी वैशाख या टोपणनावाने केले. उत्तररात्र हा त्यांचा कवितासंग्रह १९५५ साली प्रसिद्ध झाला.

समीक्षा लेखन

[संपादन]

साहित्याची निर्मिती, आकलन, स्वरूप आणि आस्वाद या संदर्भात स्वतःचे चिंतन त्यांनी आपल्या समीक्षा ग्रंथांतून मांडले आहेत.

मानवी जीवनात असलेले शोकात्मता हे सरदेशमुखांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य आहे. बालकवी, केशवसुत, गोविदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितांचा वेध त्यांनी आपल्या अंधारयात्रा या पुस्तकात घेतला आहे. तसेच गडकरी, ग्रेस, नारायण सुर्वे, शरच्चंद्र मुक्तिबोध, कुसुमाग्रज यांच्या काव्याबद्दल मूळगामी चर्चा सरदेशमुखांनी केली आहे. सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या दोन्हीचा आत्मप्रत्यय सरदेशमुखांच्या लिखाणातून आपल्याला दिसतो.

त्र्यं.वि. सरदेशमुख यांची पुस्तके

[संपादन]
 • अंधारयात्रा (समीक्षा ग्रंथ)
 • उच्छाद (कादंबरी)
 • उत्तररात्र (कवितासंग्रह)
 • काफ्काशी संवाद (ललित)
 • कालिदास आणि शाकुंतल : एक अर्घ्यदान (समीक्षा ग्रंथ)
 • गडकऱ्यांची संसारनाटके (राम गणेश गडकऱ्यांच्या नाटकांचे आस्वादन व समीक्षा)
 • डांगोरा एका नगरीचा (कादंबरी)
 • तुरे चंद्रफुलांचे (कवितांच्या कार्यक्रमाची संहिता)
 • धुके आणि शिल्प (समीक्षा)
 • बखर एका राजाची (कादंबरी)
 • रामदास : प्रतिमा आणि प्रबोध (रामदासांच्या काव्यप्रतिभेचे आकलन)
 • ससेमिरा (कादंबरी)

अप्रसिद्ध साहित्य

[संपादन]

सरदेशमुख यांचे बरेचसे साहित्य हस्तलिखित स्वरूपात होते. वाचक चळवळीचे कार्यकर्ते नीतीन वैद्य यांनी अनेक लोकांकडून सरदेशमुखांनी लिहिलेली सुमारे हजार पानांचे साहित्य एकत्र केले आहे. या शोध मोहिमेला सरदेशमुखांच्या कन्या अनुराधा कशेळीकर, मराठी वाङ्मय सूचीकार डॉ. सु.रा. चुनेकर व शिल्पा सबनीस वगैरेंची मदत मिळाली. या अप्रसिद्ध साहित्यापैकी ’कालिदास आणि शाकुंतल : एक अर्घ्यदान’ हा ग्रंथ २०१४ सालातील आषाढाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २८ जूनला प्रकाशित झाला.

शोध मोहिमेतून सापडलेले सरदेशमुखांचे साहित्य

[संपादन]
 • १ अनुवादित नाटक
 • १५ आत्मपर लेख
 • ३२ कथा
 • १५० कविता
 • ३ कादंबऱ्या
 • १३ पुस्तक प्रीक्षणे
 • १ प्रदीर्घ निबंध
 • ६ प्रस्तावना
 • ६ भाषणांची हस्तलिखितेे
 • ७ मुलाखती
 • ३२ वैचारिक लेख, समीक्षा, आणि
 • १ व्यक्तिचित्रण

सोलापूरचे साहित्यिक

[संपादन]

कवी रामजोशी, कवी कुंजविहारी, कवी रा.ना. पवार आणि कवी संजीव यांच्यानंतर त्र्यं.वि. सरदेशमुख हेच सोलापूरला मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवून देणारे सारस्वत ठरले. ते ल.सि. जाधवांसारख्या अनेक उगवत्या लेखकांचे स्फूर्तिदात्रे होते.

पुरस्कार

[संपादन]
 • साहित्य अकादमी पुरस्कार - २००३ (डांगोरा एका नगरीचा या पुस्तकाला).

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]