शरच्चंद्र मुक्तिबोध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरच्चंद्र माधव मुक्तिबोध (१९२१ - २१ नोव्हेंबर, १९८४) हे एक मराठी कवी, कादंबरीकार आणि समीक्षक होते. नागपूर विद्यापीठातून १९४७ साली एम.ए झाल्यावर ते महाराष्ट्र सरकारच्या भाषासंचालनालयात उपसंचालक म्हणून लागले. नोकरीपश्चात् ते नागपूर महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि तेथून १९७९मध्ये सेवानिवृत्त झाले.

शरच्चंद्रांचे मोठे बंधू गजानन माधव मुक्तिबोध हेही हिंदीतले कवी आणि साहित्यिक होते.

मुक्तिबोध हे कवी, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. आपल्या साहित्यातून नव्या जाणीवांना व्यक्त करण्याचा त्यांचा ध्यास होता. मानुषतेचे मूल्य त्यांनी जपले होते. मुक्तिबोधांची जीवननिष्ठा त्यांच्या साहित्यातूनही प्रतिबिंबित झालेली प्रत्ययाला येते. मुक्तीबोधांचा जन्म इंदोर येथे दि. २१ जानेवारी १९२१ मध्ये झाला. वडलांच्या आग्रहाखातर एम. ए. नंतर त्यांनी एल. एल, बी. केले. सुजालपूर , उज्जैन , जबलपूर, इ. ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून काम केले आणि काही काळ वकिलीही केली. नागपूरच्या भाषाविभागात काही काळ सहायक संचालक म्हणून काम केल्यानंतर नागपूर महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आणि याच संस्थेतून विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. दि. २ ऑक्टोबर १९८६ रोजी नागपूर या त्यांच्या कर्मभूमीतच दम्याच्या विकाराने त्यांचा मृत्यू झाला. [१]
पुस्तके[संपादन]

 • जन हे वोळतु जेथे (कादंबरी)
 • नवी मळवाट (कवितासंग्रह)
 • मुक्तिबोधांची निवडक कविता (कवितासंग्रह)
 • यात्रिक (कवितासंग्रह)
 • सत्याची जात (कवितासंग्रह)
 • सरहद्द (कादंबरी)
 • सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमूल्य (समीक्षात्मक).
 • क्षिप्रा (कादंबरी)

मुक्तिबोधांसंबंधी पुस्तके/लेख[संपादन]

 • शरच्चंंद्र मुक्तिबोध यांच्या काव्याबद्दल मूलगामी चर्चा त्र्यं.वि. सरदेशमुखांनी त्यांच्या 'अंधारयात्रा' या पुस्तकात केली आहे.

पुरस्कार[संपादन]

 • १९७९ सालाचा साहित्य अकादमी पुरस्कार - 'सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमूल्य' या ग्रंथाबद्दल
 1. ^ संपादक तावरे, डॉ. स्नेहल (२००७). वैदर्भी प्रतिभा. पुणे: स्नेहवर्धन प्रकाशन. pp. २६२-२६३. ISBN 81-89634-10-0.