ल.सि. जाधव
लक्ष्मण सिद्राम जाधव (जन्म : इ.. १९४५; - ५ जून २०१९) हे एक मराठी लेखक होते. त्यांचे बालपण सोलापूर येथे मातंग वस्तीत गेले. पुढे ते भारतीय स्टेट बँकेत अधिकारी झाले. त्र्यं.वि. सरदेशमुख यांच्या सान्निध्यात त्यांच्या 'डांगोरा एका नगरीचा' या कादंबरीची मुद्रणप्रत तयात करताना ल.सि. जाधवांना खऱ्या लेखनाच्या खाणाखुणा कळायला लागल्या. पण नोकरीच्या काळात हे सर्व दडपलेले राहिले. मग जाधवांनी बँकेतून ३१ मार्च २००१ रोजी स्वेच्छनिवृत्ती घेतली. त्यानंतर चारएक वर्षे गेली. दरम्यान जाधवांचे स्फूर्तिदात्रे त्र्यं.वि. सरदेशमुखही वारले. जाधवांना एकटेपण जाणवू लागला, आणि त्यातून वयाच्या ६६व्या वर्षी, सप्टेंबर २०११मध्ये त्यांचे 'होरपळ' हे आत्मकथनात्मक पहिले पुस्तक बाहेर आले.
सेवानिवृत्तीनंतरच्या काळात वयाच्या पासष्टीनंतर लेखनाला सुरुवात करून जाधव यांनी 'होरपळ' हे आत्मकथन, 'पराभूत धर्म' व 'सुंभ आणि पीळ' या कादंबऱ्या, अशा सरस साहित्यकृती निर्माण केल्यानंतर त्यांनी 'मावळतीची उन्हे' ही अभिनव आणि गुणवत्तापूर्ण कादंबरी लिहिली. त्यांचे कवितासंग्रह, कथासंग्रह, बालवाङ्मय हे सर्व साहित्य साकेत प्रकाशन, मॅजेस्टिक प्रकाशन, विजय प्रकाशन आदी नामवंत प्रकाशकांकडून प्रकाशित झाले आहे.
ल.सि. जाधव यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अडगळ
- केतकीची फुले (कवितासंग्रह)
- गुदमरते शालीन जगणे(कवितासंग्रह)
- तुमचा खेळ होतो पण (किशोर कादंबरी)
- दाह
- परतीचे पक्षी (कवितासंग्रह)
- पराभूत धर्म (कादंबरी)
- पाथेय (कवितासंग्रह)
- मावळती उन्हे (कादंबरी)
- शूर जवान (किशोर कादंबरी)
- सं गच्छध्वम् (दलित चळवळीतले प्रामाणिक कार्यकर्ते भिकाभाऊ साळवे यांच्या आयुष्यावरची कादंबरी)
- सुंभ आणि पीळ (आत्मकथन)
- सूळकाटा (आत्मकथन) : 'होरपळ'चा पुढचा भाग.
- होरपळ (आत्मकथन) (हिंदीत ‘दाह’, इंग्रजीत ‘Singe' आणि कोंकणीत ‘हुलपावेणी’)
ल.सि. जाधव यांना मिळालेले पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र सरकारचा इ.स. २०११-१२ सालचा आत्मचरित्रासाठीचा लक्ष्मीबाई टिळक हा एक लाख रुपयांचा पुरस्कार : डॉ. श.रा. राणे यांना ’प्रिय वत्सला’साठी व ल.सि. जाधव यांना ’होरपळ’साठी विभागून
- महाराष्ट्र शासनाचा प्रौढ वाङ्मय - दलित साहित्य - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार - ’सुंभ आणि पीळ’साठी (२७-११-२०१४)
- ’सुंभ आणि पीळ’साठी पै फ्रेन्ड्स लायब्ररीचा मधुश्री पुरस्कार (२०१५)
- ’सुंभ आणि पीळ’साठी मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार (२०१५)
- ’सुंभ आणि पीळ’साठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वा.म. जोशी पुरस्कार (२०१५)
- सोलापूरच्या डॉ.निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानचा साहित्य सेवा पुरस्कार (२०१६)