Jump to content

तारा बेनोडिक्ट रिचर्ड्‌स वनारसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तारा बेनोडिक्ट रिचर्ड्‌स वनारसे

डॉ. तारा वनारसे अथवा तारा रिचर्ड्स (मे १२, इ.स. १९३० - मे १३, इ.स. २०१०)[] या प्रसूतितज्‍ज्ञ डॉक्टर आणि मराठी भाषेतल्या लेखिका होत्या. मूळच्या महाराष्ट्रातील पुण्याच्या असलेल्या डॉ. वनारसे, मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. इ.स. १९७० ते इ.स. १९७५ या काळात त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस केली. मात्र त्यानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी इंग्लंडमधील हेमेल हेम्पस्टेड येथे निधन झाले.

डॉ. बेनोडिक्ट रिचर्ड्‌स (मृत्यू इ.स. १९९५) हे त्यांचे पती आणि मिरांडा रिचर्ड्‌स ही त्यांची कन्या होत. तारा वनारसे मराठी नवकथेच्या सुरुवातीपासून साक्षीदार होत्या. त्यांनी लिहिलेले ’कक्षा’ हे नाटक मराठी नाटकाला नवे वळण देणारे ठरले. इंग्लंडमधील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या. लंडन येथील महाराष्ट्र मंडळासाठी त्यांनी बरेच काम केले आहे. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते.

जीवन

[संपादन]

तारा वनारसे यांच्या आई या महर्षी कर्वे यांच्या आश्रमात वाढलेल्या बालविधवा होत्या. त्या आश्रमात हॉस्टेलवर देखरेख करीत असत. कृष्णाबाई व बाळूताई खरे(मालती बेडेकर) या त्यांच्या हाताखाली होत्या. पुढे ताराबाईंच्या आईने वनारसे यांच्याशी पुनर्विवाह केला.

ताराबाईंचे पती बेनोडिक्ट हे शल्यविशारद डॉक्टर होते. ताराबाईंच्या सासूबाई इंग्लंडमधील ओलिव्हिए या इंग्लंडमधील खानदानी कुटुंबातल्या होत्या.

साहित्यिक कारकीर्द

[संपादन]

तारा वनारसे यांची 'श्यामिनी' ही कादंबरी रामायणातल्या शूर्पणखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिली आहे. तिच्यातली प्रकरणे लक्ष्मण, ऊर्मिला, शंबुक, रावण आणि बिभीषण यांच्या नजरेतून सांगितली गेली आहेत. कक्षा हे नाटक इ.स. १९५५ साली म्हणजे ताराबाईंच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रसिद्ध झाले. त्याच जानेवारीत नाटकाचा पहिला प्रयोग आत्माराम भेंड्यांच्या कलाकार नाट्यसंस्थेने केला. त्यात आत्माराम भेंडे (दिग्दर्शक), आशा भेंडे, कुसुम कुलकर्णी, आणि सुधाकर कुलकर्णी यांनी भूमिका केल्या होत्या. नायिकेच्या मनातील आंदोलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे हे नाटक त्या काळात विशेष गाजले होते. सूर ही कादंबरी जुळ्या मुलांच्या मनांतील सहकंप आणि त्याचे आजूबाजूच्या व्यक्तींवरील पडसाद या विषयावर होती. गुप्त वरदान हे एलिझाबेथ बोवेन व एच. ई. बेट्‌स या आणि काही इतर लेखकांच्या अनुवादित नवकथांचा संग्रह आहे.

त्यांच्या बारा वाऱ्यावरचे घर या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

मृत्यूपूर्वी काही वर्षे तारा वनारसे पार्किन्सन विकाराने आजारी होत्या, तरी संगणकासमोर बसून त्यांनी लिखाण चालूच ठेवले होते.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • कक्षा(नाटक)
  • केवल कांचन(लघुकथासंग्रह)
  • गुप्त वरदान (अनुवादित कथांचा संग्रह)
  • तिळा तिळा दार उघड(प्रवासवर्णन)
  • नर्सेस क्वार्टर्स(एकांकिका)
  • पश्चिमकडा(लघुकथासंग्रह)
  • बारा वाऱ्यांवरचे घर(कवितासंग्रह)
  • श्यामिनी(कादंबरी)
  • सूर(कादंबरी)

पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर

  1. ^ "डॉ. तारा वनारसे यांचे निधन". १४. ५.२०१०. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]