विष्णुशास्त्री चिपळूणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विष्णूशास्त्री चिपळूणकर
विष्णूशास्त्री चिपळूणकर
जन्म २० मे १८५० (1850-05-20)
पुणे (महाराष्ट्र)
मृत्यू १७ मार्च, १८८२ (वय ३१)
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण
भाषा मराठी
साहित्य प्रकार निबंध
चळवळ भारतीय स्वातंत्र्यलढा
प्रसिद्ध साहित्यकृती निबंधमाला

विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर (जन्म : पुणे, २० मे, १८५० - १७ मार्च, १८८२) हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील एक नामवंत लेखक होते.

जीवन[संपादन]

विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेजडेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णूशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. बी.ए. होण्यापूर्वी विष्णूशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी इ.स. १८७५मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक (पहिला अंक : २५ जानेवारी १८७४) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी सन १८७२ ते १८७७ या सालांदरम्यान पुण्यातील, तर १८७८ -१८७९ या सालांदरम्यान त्यांनी रत्‍नागिरीतील शाळांमधून अध्यापनाचे काम केले.

१८७४ साली चिपळूणकरांनी निबंधमाला ह्या मासिकाचे प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी इ.स. १८७८मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. इ.स. १८७५मध्ये मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने चिपळूणकरांनी किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून,१८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळकगोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.१८८१ सालच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. त्यांनी, आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास, भवभूती, बाण, सुबंधु व दंडी या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उताऱ्यांसहित, रसपूर्ण विवरण असे.[ संदर्भ हवा ]

सामाजिक कार्य[संपादन]

चिपळूणकरांनी खालील संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला :

विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

  • अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी (६ भाग; सहलेखक कृष्णशास्त्री चिपळूणकर, हरि कृष्ण दामले
  • आमच्या देशाची स्थिती
  • इतिहास
  • संस्कृत कविपंचक (सन १८९१)
  • किरकोळ लेख
  • केसरीतील लेख
  • बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)
  • कालिदासावरील निबंध
  • विष्णूशास्त्र्यांनी लिहिलेले निबंध निबंधमाला या नावाखाली पुस्तकरूपाने, दोन खंडांत प्रकाशित झाले आहेत.
  • निबंधमालेतील तीन निबंध
  • पद्य रत्नावली
  • मराठी व्याकरणातील निबंध
  • लेखसंग्रह
  • वक्तृत्व
  • वाङ्मय विषयक निबंध
  • विनोद आणि महदाख्यायिका (सन १९०१)
  • विद्वत्त्व आणि कवित्व व वक्तृत्व
  • विष्णूपदी (३ खंड)
  • सॅम्युएल जॉन्सन यांच्या द हिस्टरी ऑफ रासेलस (इंग्लिश: The History of Rasselas) या पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)
  • संस्कृत कविता
  • साक्रेतिसाचे चरित्र
  • सुभाषिते
  • हरिदास गोविंद

विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्याविषयीची पुस्तके[संपादन]

  • चिपळूणकर लेखसंग्रह (संपादक - मा.ग. बुद्धिसागर)
  • वृत्त सुदर्शन (विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - अनंत शंकर ओगले)
  • भाषाशिवाजी (अनंत ओगले)

अवांतर[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

त्यांच्या मराठी भाषेतील अतुलनीय कामगिरीसाठी विष्णूशास्त्री चिपळूणकरांना, मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात.

संदर्भ[संपादन]