कृष्णशास्त्री चिपळूणकर
कृष्णशास्त्री चिपळूणकर (इ.स. १८२४ - इ.स. १८७८) हे मराठी लेखक आणि समाजसेवक होते.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर मराठीला दर्जेदार छंदबद्ध रचनांनी अलंकृत करण्याचे कार्य ज्यांनी केले त्यांत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे नाव आदराने घेतले जाते. पुण्याच्या संस्कृत पाठशाळेत शिक्षण घेतलेल्या कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी पुढे पूना कॉलेजमधून इंग्रजीचेही शिक्षण पूर्ण केले आणि १८५२ मध्ये ते अनुवादक म्हणून सरकारी नोकरीत रुजू झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘साक्रेतिसाचे चरित्र’ हे अनुवादित पुस्तक लिहिले. यानंतरच्या काळात त्यांनी पुणे पाठशाळेत सहाय्यक प्राध्यापक, दक्षिण प्राइझ कमिटीचे चिटणीस, पूना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस अशा पदांवर काम केले. एकीकडे त्यांची ही कारकीर्द सुरू असतानाच त्यांच्या हातून निरनिराळ्या प्रकारांतली ग्रंथरचना झाली. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेपैकी १८५५ मध्ये प्रकाशित झालेला ‘अर्थशास्त्रपरिभाषा, प्रकरण पहिलें’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ म्हणजे जॉन स्टुअर्ट मिलकृत ‘प्रिन्सिपल ऑफ पोलिटिकल इकॉनमी’चे भाषांतर होय. हा ग्रंथ म्हणजे मिलच्या ग्रंथातील केवळ एकाच प्रकरणाचे भाषांतर होते. शास्त्रीबुवांनी १८५६ मध्ये दुसरे प्रकरणही भाषांतरित केले होते, पण ते प्रकाशित झाले नाही. या ग्रंथाने त्यांचे अनुवादकौशल्य दाखवून दिले.
अनुवादाच्या हातोटीबरोबरच कृष्णशास्त्रीकडे आणखी एक गुण होता, तो म्हणजे मूळ विषय समजावून घेऊन तो सुगम शैलीत सांगणे. त्यांच्या या गुणाचे दर्शन घडवणारा ‘अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह’ हा ग्रंथ १८६१ मध्ये प्रकाशित झाला. त्यात रसायनशास्त्र, ज्योतिष, गणित, साहित्य, कला, नीती आदी अनेक विषयांची माहिती देण्यात आली होती.
कृष्णशास्त्रींनी ‘पद्यरत्नावली’ हा ग्रंथ १८६५ मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथातली मेघदूत, अन्योक्तिकलाप, विद्याप्रशंसा, प्रश्नोत्तरावली व विलाप अशी पाच प्रकरणे कालिदास, भवभूती, बिल्हण, जगन्नाथराय इत्यादी अत्यंत रसिक व प्राचीन कवींच्या ग्रंथांच्या आधाराने लिहिली होती. ग्रंथात मनोवेधक व सुरस वृत्तांचे श्लोक, आर्या, साक्या, दिंडय़ा इत्यादी वृत्ते योजिली आहेत.
कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे हे नोकरी आणि भाषांतर-लेखनकार्य सुरू असतानाच त्यांनी ‘विचारलहरी’, ‘मराठी शालापत्रक’ या नियतकालिकांचे संपादनही काही काळ केले होते.
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची साहित्यरचना
[संपादन]- विचारलहरी (१८५२)
- सॉक्रेटिसचे चरित्र (१८५२)
- अर्थशास्त्र परिभाषा (१८५५)
- संस्कृतभाषेचे लघु व्याकरण (१८५९)
- पद्यरत्नावली (१८६५)
- अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी (१९६१)