Jump to content

विजय तेंडुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विजय धोंडोपंत तेंडुलकर या पानावरून पुनर्निर्देशित)

[]

विजय तेंडुलकर
जन्म नाव विजय धोंडोपंत तेंडुलकर
जन्म ६ जानेवारी १९२८
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १९ मे, २००८ (वय ८०)
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, कथा
अपत्ये प्रिया तेंडुलकर, सुषमा तेंडुलकर

विजय तेंडुलकर (जन्म: मुंबई, ६ जानेवारी १९२८; - पुणे, १९ मे २००८)[] हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.

मनोगत

[संपादन]

विजय तेंडुलकरांचा जन्म जानेवारी ६, १९२८ रोजी मुंबई येथील मुगभाट , गिरगांव येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यांचे वास्तव्य पुण्यात आणि मुंबईत असे. लेखिका आणि अभिनेत्री प्रिया तेंडुलकर या त्यांच्या कन्या होत.

कारकीर्द

[संपादन]

तेंडुलकर, विजय : (६ जानेवारी १९२८– ). एक चतुरस्र लेखक, वृत्तपत्रव्यवसायी, लघुकथालेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. शिक्षण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे झाले. १९४३ मध्ये शालेय शिक्षणात खंड पडला. शालेय शिक्षणापेक्षा घरातील वाङ्‌मयप्रेमी वातावरणाचे संस्कार प्रेरक ठरले. त्यांचे वडील प्रकाशक, लेखक, हौशी नट–दिग्दर्शक होते. वडिलांच्या पुस्तकांच्या दुकानात बसणे, मुद्रिते तपासणे इत्यादींमधून वाङ्‌मयग्रहणाचे व लेखनाचे पाठ तेंडुलकरांना मिळाले. प्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील हे त्यांना पुण्यास शिक्षक म्हणून लाभले. बोकिलांप्रमाणेच दि. बा मोकाशी ह्यांच्या कथालेखनाचे तसेच अनंत काणेकर व शिवराम वाशीकर ह्यांच्या संवादलेखनाचे संस्कार तेंडुलकरांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वावर झालेले आहेत. १९५७ पर्यंत त्यांचे वास्तव्य पुण्यात होते पुढे काही काळ मुंबईत. पुणे–मुंबई, मुंबई–पुणे असा अनिश्चित भ्रमंतीचा काही काळ लोटल्यानंतर १९६६ पासून मुंबई हेच वास्तव्याचे व कामाचे कायम स्थान बनले. मुंबईतील वास्तव्यामुळेच तेंडुलकरांचा प्रयोगशील रंगभूमीशी व ‘रंगायन’, ‘आविष्कार’, ‘भारतीय विद्या भवन कला केंद्र’, ‘अनिकेत’ यांसारख्या नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्थांशी व त्यांतील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध आला. रंगभूमीशी आंरभापासूनच आत्मीयतेने निगडित असूनही तेंडुलकरांनी नाटकांकडे व्यावसायिक दृष्टिकोणातून पाहण्याचे कटाक्षाने टाळलेले आहे. वृत्तपत्रीय लेखन आणि नियतकालिकांचे संपादन हेच त्यांचे आरंभीचे आणि नंतरचेही उपजीविकेचे प्रमुख साधन. कोवळी उन्हे (१९७१), रातराणी (१९७१), फुगे साबणाचे (१९७४) यांसारखे त्यांचे स्फुट ललितनिबंधसंग्रह यातूनच जन्माला आले. तेंडुलकर हे नियतकालिकांशी निगडित राहिल्याने त्यांनी लघुकथास्वरूपाचे किंवा व्यक्तिचित्रणात्माक पद्धतीचेही बरेच लेखन केलेले आहे. त्यातील काही काचपात्रे (१९५८), द्वंद्व (१९६१), मेषपात्रे (१९६५), गाणे (१९६६), फुलपाखरू (१९७०) इ. नावांनी संकलित केले गेले आहे. दिवाकरांच्या नाट्यछटाही त्यांनी संपादिल्या आहेत.

तेंडुलकरांचे प्रधान कार्यक्षेत्र रंगभूमी हेच. १९५५ पासून आजतगायत ते नाट्यलेखन करीत आहेत. त्यांच्या नाट्यलेखनाचा प्रारंभ एकांकिकालेखनाने झाला. नभोवाणीकरिता लिहिलेली ‘रात्र’ ही त्यांची पहिली एकांकिका. ती बरीच लोकप्रिय ठरली. ध्वनिमाध्यमाचे तीत चातुर्याने उपयोजन केले आहे. रात्र आणि इतर एकांकिका हा त्यांचा पहिला एकांकिकासंग्रह (१९५७). नंतर अजगर आणि गंधर्व (१९६६) व भेकड आणि इतर एकांकिका (१९६९) हे दोन एकांकिकासंग्रह प्रसिद्ध झाले. तेंडुलकरांनी पाटलाच्या पोरीचे लगीन (१९६५), चिमणा बांधतो बंगला (१९६६), चांभारचौकशीचे नाटक (१९७०), मुलांसाठी तीन नाटिका (१९७३) इत्यादींसारखी काही बालनाट्येही लिहिला आहेत. तेंडुलकरांनी काही अनुवादापर नाट्यलेखनही केलेले आहे. त्यात टेनेसी विल्यम्सच्या स्ट्रीट कार नेम्ड डिझायरचा वासनाचक्र या नावाने केलेला अनुवाद विशेष लक्षणीय आहे. मोहन राकेश यांच्या आधे अधुरेचा व गिरीश कार्नांड यांच्या तुघलखचाही त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. सामना, निशांत, शांतता कोर्ट चालू आहे यांसारख्या बोलपटांची कथानकेही त्यांनी अलीकडेच लिहिली आहेत. त्यांच्या ह्या तिन्ही चित्रपटकथांना पारितोषिके लाभलेली आहेत. सध्या यूनेस्कोने सोपविलेल्या दूरचित्रवाणीविषयक कार्यात ते मग्न आहेत.

तेंडुलकरांचे प्रसिद्धी दृष्ट्या पहिले नाटक श्रीमंत (१९५५) हे बरेच गाजले. त्यानंतर त्यांची माणूस नावाचे बेट (१९५६), मधल्या भिंती (१९५८), चिमणीचं घऱ होतं मेणाचं (१९६०), मी जिंकलो–मी हरलो (१९६३), कावळ्यांची शाळा (१९६४), सरी ग सरी (१९६४), एक हट्टी मुलगी (१९६७) ही नाटके रंगभूमीवर आली. त्यांतील माणूस नावाचे बेट हे रंगभूमीवरील स्थित्यंतराचे निदर्शक मानावे लागेल. यात तेंडुलकरांनी वास्तवतेचा संपूर्ण पुरस्कार केलेला आहे. चिमणीचं घर होतं मेणाचं हे प्रयोगशीलतेच्या दृष्टीने व एक हट्टी मुलगी हे व्यक्तिदर्शनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तेंडुलकरांना अखिल भारतीय स्वरूपाची कीर्ती मिळवून देणारे शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक १९६८ साली रंगभूमीवर आले. या नाटकाला कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक मिळाले आहे. भारतीय भाषांत त्याची भाषांतरे झाली आहेत. त्याच्या पाठोपाठ अशी पाखरे येती (१९७०), गिधाडे (१९७१) ही नाटके पुढे आली. गिधाडेतील उग्रकठोर वास्तववादी चित्रणाने बरीच खळबळ उडवून दिली. अशी पाखरे येती हे गिधाडेच्या उलट प्रकृतीचे नाटक. तेंडुलकर एकाच वेळी भिन्नभिन्न प्रकृतीची नाटके निर्माण करू शकतात याचेच हे निदर्शक. गिधाडेपेक्षाही तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर (१९७२) व घाशीराम कोतवाल (१९७३) या नाटकांनी अधिक प्रक्षोभ निर्माण केला. सखाराम बाइंडर तर काही काळ सेन्सॉरच्या अवकृपेस पात्र ठरले. घाशीराम कोतवाल हे नाना फडणीसांच्या जीवनावर आधारलेले नाटक. ऐतिहासिक दृष्ट्या हे चित्रण विवाद्य ठरले पण या नाटकात केला गेलेला लोकनाट्यातील घटकांचा अवलंब प्रशंसनीय ठरला. दंबद्वीपचा मुकाबला (१९७४), मल्याकाका (१९७४) व बेबी (१९७६) ही त्यांची अलीकडेच प्रसिद्ध झालेली नाटके. त्यांच्या नाट्यकृतींची एकूण संख्या विसांहून अधिक भरेल.

आशय–अभिव्यक्ती दृष्ट्या तेंडुलकरी नाटकात बरीच स्थित्यंतरे झालेली आहेत. तेंडुलकर हे मूलतः वास्तववादी परंपरेचे नाटककार आहेत. प्रसंगवशात त्यांनी कल्पनारम्यतेचा आश्रय केलेला असतो पण तो वास्तवाचा पाया बळकट करण्यासाठीच. सामान्य स्तरातील पांढरपेशा वर्ग आणि त्याची सुखदुःखे-विशेषतः दुःखेच–हा त्यांच्या चित्रणाचा व चिंतनाचा मुख्य विषय. साध्या दैनंदिन घटनेतील नाट्य समर्थपणे पेलणे हा त्यांच्या नाट्यलेखनाचा धर्म. त्यांच्या प्रारंभकालीन नाटकांत जी हळवी भावविवशता दिसते ती उत्तरोत्तर कमी होत जाऊन चित्रणात उग्र, कठोर वास्तवता अधिक प्रमाणात येऊ लागल्याचे जाणवते. मानवी मनातील व जीवनातील हिंस्त्रता, विकृती, कुरूपता यांचे निडर दर्शन त्यांची आजची नाटके घडवितात (गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल इ.) त्यात काव्य आणि कारुण्य यांच्या छटाही अधूनमधून मिसळलेल्या दिसतील, तंत्रदृष्ट्याही ते नवेनवे प्रयोग करीत असतात.

या तेंडुलकरी नाटकाचे सारे विशेष शांतता कोर्ट चालू आहे मध्ये कलात्मक रीत्या एकत्र आलेले आहेत. व्यक्तीचे किंवा व्यक्तीसमूहाचे बाह्य आचार–उच्चार व त्याच्या अंतर्मनातील प्रवाह यांतील विरोध, विसंगती, उपरोध परिणामकारक रीत्या या नाटकात चित्रित झाले आहेत.

भारतीय समाजातील हिंसाचार ह्या विषयावरील संशोधनार्थ त्यांना नेहरू अभ्यासवृत्ती देण्यात आली होती (१९७४–७५)

नाटके

[संपादन]

लेखनदृष्ट्या 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता! कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.

'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्ष झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.

चित्रपट

[संपादन]

तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले.

मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात, त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते, काव्य-कारुण्य, व्यक्ती-समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते. नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते.

"देशातील वाढता हिंसाचार" या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस" या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता.

तेंडुलकरांच्या 'झाला अनंत हनुमंत' या नाटकावर चित्रपट बनला आहे. मिना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘झाला अनंत हनुमंत’ची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली असून, दिग्दर्शनही त्यांचेच आहे.

साहित्य

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, इ.स. १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णूदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. इ.स. १९९८ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्ती मिळाली होती.

तेंडुलकरांच्या लेखनाबरोबरच त्यांच्या मुलाखतीही तितक्‍याच गाजल्या. त्यातून अनेक वादविवादही झडले. त्यांचा स्वभावच वादळे अंगावर घेण्याचा. त्यातूनच हजारो लोकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारी माणसे आज समाजात आहेत. त्यांचे मारेकरी होण्यास मला आवडेल असे जळजळीत उद्‌गारही बाहेर पडले. पुरस्कार स्वीकारताना जाहीर व्यासपीठावरून आमच्या पिढीने स्वतःलाच फसवले अशी खंतही तितक्‍याच सहजपणे व्यक्त झाली.

तेंडुलकर यांच्याविषयी किंवा त्यांच्या लेखनाविषयी लिहिली गेलेली पुस्तके/चित्रपट/नाटके वगैरे

[संपादन]
  • अ-जून तेंडुलकर (संपादिका : रेखा इनामदार-साने)
  • तेंडुलकर : असेही तसेही (मुकुंद टाकसाळे)
  • तेंडुलकर आणि हिंसा (माहितीपट : निर्माते - अतुल पेठे)
  • तेंडुलकरांची नाटके (डॉ. चंद्रशेखर बर्वे; पुस्तकाची दुसरी आवृत्ती ६-१-२०१७ रोजी प्रकाशित झाली.)

व्याख्यानमाला

[संपादन]
  • पुण्यात अनेक व्याख्यानमाला होत असतात, त्यांत विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालाही होत असते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ तेंडुलकर, विजय (१९ जुलै १९७१). गिधाडे. पुणे: शशिकांत महादेव देव (सुलभ मुद्रणालय ) नीलकंठ प्रकाशन.
  2. ^ या 5 कारणांमुळे विजय तेंडुलकरांचा प्रभाव आजही कायम. BBC News मराठी. 20-05-2018 रोजी पाहिले. 19 मे 2008 रोजी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला होता. तेंडुलकर हे लेखक, पत्रकार, पटकथा लेखक होते.कन्यादान, घाशीराम कोतवाल, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे, बेबी, माणूस नावाचे बेट ही त्यांची नाटके विशेष गाजली. त्यांनी लहान मुलांसाठी देखील नाटके लिहिली. तसेच ते एक उत्तम पटकथाकार होते. त्यांना मंथन या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]

अधिक माहिती

[संपादन]
  • शांतता! कोर्ट चालू आहे, या नाटकाचा पाकिस्तानातील प्रयोग