Jump to content

विष्णुदास भावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विष्णूदास भावे या पानावरून पुनर्निर्देशित)
विष्णुदास भावे
जन्म नाव विष्णूदास अमृतराव भावे
जन्म ९ ऑगस्ट १८१९
मृत्यू ९ ऑगस्ट १९०१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटक
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक

विष्णूदास अमृत भावे (जन्म : सांगली, ९ ऑगस्ट १८१९; - ९ ऑगस्ट १९०१) हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात. त्यांचा उल्लेख " महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून केला जातो."

जीवन

[संपादन]

विष्णूदास भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे यांचे पुत्र. विष्णूदास भावे हे स्वतः अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णूदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल’मध्ये नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णूदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला 'ग्रांट रोड थिएटर' येथे 'इंद्रजित वध' पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णूदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. मात्र १८६२ मध्ये त्‍यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला.

विष्णूदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णूदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.

कारकीर्द

[संपादन]

नाटके

[संपादन]
नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
इंद्रजित वध १८५३ मराठी लेखन, दिग्दर्शन
राजा गोपीचंद १८५४ हिंदी लेखन, दिग्दर्शन
सीता स्वयंवर १८४३ मराठी लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन
राजा गोपीचंद १८५४ हिंदी लेखन, दिग्दर्शन

विष्णूदास भावे यांच्यावरील पुस्तके

[संपादन]
  • हिंदी आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक विष्णूदास भावे (अनुवादित, मूळ लेखक - चनुलाल दुबे, मराठी अनुवाद - व्यंकटेश कोटबागे)

बाह्य दुवे

[संपादन]