Jump to content

गंगाधर गाडगीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भिरभिरे या पानावरून पुनर्निर्देशित)
गंगाधर गाडगीळ
जन्म नाव गंगाधर गोपाळ गाडगीळ
जन्म ऑगस्ट २५, इ.स. १९२३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १५ सप्टेंबर, २००८ (वय ८५)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन (अर्थशास्त्र)
साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, ललित, समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती दुर्दम्य
वडील गोपाळ
पत्नी वासंती
पुरस्कार जनस्थान पुरस्कार

गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला.

शिक्षण

[संपादन]

मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले.

कारकीर्द

[संपादन]

एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली.

साहित्यिक कारकीर्द

[संपादन]

लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला.

यानंतर ठराविक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले.

भूषवलेली पदे

[संपादन]

इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते.

'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता.

साहित्य

[संपादन]

गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे :

कथासंग्रह

[संपादन]

कादंबऱ्या

[संपादन]

प्रवासवर्णने

[संपादन]

नाटके

[संपादन]

समीक्षा ग्रंथ

[संपादन]

अन्य ललित वाङ्मय

[संपादन]
  • अशा चतुर बायका
  • अश्रूंचे झाले हिरे (बालसाहित्य)
  • आठवणीच्या गंधरेखा (आत्मकथन)
  • आम्ही आपले ढढ्ढोपंत
  • एका मुंगीचे महाभारत (आत्मचरित्र)
  • एकेकीची कथा (संपादिका - प्रभा गणोरकर)
  • गरुडाचा उतरला गर्व (बालसाहित्य)
  • जगू आणि खतरनाक अब्दुल्ला
  • निवडक गंगाधर गाडगीळ (संपादिका - सुधा जोशी)
  • निवडक फिरक्या
  • पक्याची गॅंग (बालसाहित्य)
  • पाच नाटिका
  • बंडू
  • बंडूचं गुपचुप
  • बंडू नाटक करतो
  • बंडू-नानू आणि गुलाबी हत्ती
  • बंडू बिलंदर ठरतो
  • बंडू मोकाट सुटतो
  • बाबांचं कलिंगड आणि मुलीचा स्वेटर
  • बायको आणि डोंबलं
  • बुगडी माझी सांडली गं
  • भरारी (विश्वनाथ नारायण मंडलिक यांचे चरित्र)
  • भोपळा
  • महाराष्ट्राचे प्रश्न : काही पाखंडी विचार (वैचारिक)
  • माकड झाले राजा (बालसाहित्य)
  • मुंगीचं समाधान होतच नाही (बालसाहित्य)
  • मुंबई आणि मुंबईकर
  • मुंबईच्या नवलकथा
  • यक्षकन्या आणि राजपुत्र (बालवाङ्मय)
  • रत्‍ने (ललित)
  • लंब्याचवड्या गोष्टी
  • वा रे वा नव्या फिरक्या
  • विठू कमळीच्या मुठीत
  • वेगळं जग
  • सफर बहुरंगी रसिकतेची
  • सात मजले हास्याचे
  • साता समुद्रापलीकडे (ललित लेख)
  • स्नेहलता बंडूला अमेरिकेत नेते
  • हसऱ्या कथा गंगाधर गाडगीळांच्या

गौरव

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]
  • इ.स. १९९६चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'एका मुंगीचे महाभारत'
  • जनस्थान पुरस्कार
  • वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे मराठी साहित्यात प्रायोगिक व नावीन्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकाला इ.स.१९९४सालापासून दर तीन वर्षांनी, ’गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ दिला जातो. २०१२सालचा हा पुरस्कार राजीव नाईक यांना देण्यात आला.

बाह्य दुवे

[संपादन]