मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to searchमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे संदर्भग्रंथालय आहे. महाराष्ट्रातील शतायू म्हणजे शंभर वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ग्रंथालयांपैकी हे एक ग्रंथालय आहे. मुंबईभर ह्या संस्थेच्या ३१ विभागीय शाखा कार्यरत आहेत. तसेच ह्या संस्थेच्या संलग्न संस्थांपैकी इतिहास संशोधन मंडळ, मराठी संशोधन मंडळ ह्या दोन महत्त्वाच्या संस्था आहेत. ह्या संस्थांच्या तिमाही संशोधन पत्रिका प्रसिद्ध होत असतात. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दाते सूचिमंडळाद्वारे मराठी नियतकालिकांच्या सूचींचे खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. संस्थेच्या संदर्भग्रंथालयात दोन लाखांवर ग्रंथसंपदा, दैनिके व साप्ताहिकांची लेखसूची, मासिकांतील लेखसूची, संदर्भमंजूषा तसेच दुर्मिळ १२००० ग्रंथ आणि ८८९ दोलामुद्रिते ह्यांचा समावेश आहे.[१]

स्थापना[संपादन]

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना १ ऑगस्ट १८९८ रोजी नारळीपौर्णिमेच्या मुहूर्तावर झाली. मुकुंद बाळकृष्ण गुर्जर, नरहर महादेव जोशी, श्रीधर बाळाजी मोडक, अनंत नीळकंठ पिठकर, विनायक बळवंत जोशी, नारायण कृष्ण गद्रे, शंकर हरी शेजवलकर, नारायण महादेव बाक्रे, विठ्ठल वासुदेव टिल्लू, गणेश लक्ष्मण पागे, अंबादास गोपाल पुणतांबेकर हे ह्या संस्थेचे संस्थापक होते.[१] संस्थेच्या नायगाव, दादर येथील मध्यवर्ती ग्रंथालय व कार्यालयाच्या वास्तुचे उद्‌घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दि. १० मार्च १९५९ रोजी झाले.

संदर्भ[संपादन]

  1. a b मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संकेतस्थळावरील परिचय हा विभाग; दि. ०८ जानेवारी २०१७ रोजी १४.१४ वाजता पाहिल्याप्रमाणे

बाह्य दुवे[संपादन]

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संकेतस्थळ