Jump to content

ज.र. आजगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज.र. आजगावकर
जन्म नाव जगन्नाथ रघुनाथ आजगावकर
जन्म १६ ऑगस्ट, १८७९
वराड, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ऑगस्ट २७, १९५५
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, चरित्र

महाराष्ट्र-भाषाभूषण ज.र. आजगावकर (जन्म : वराड (मालवण तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा), १६ ऑगस्ट, इ.स. १८७९, - मुंबई, ऑगस्ट २७, १९५५) हे मराठी चरित्रकार, लेखक, पत्रकार होते.

जीवन

[संपादन]

आजगावकरांचे मूळ गाव महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानातले आजगांव. तेथेच त्यांचे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षण झाले. चरितार्थासाठी त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी लहानमोठ्या नोकऱ्या केल्या.

आजगावकरांनी पुढे पत्रकारितेस आरंभ केला. पुण्याच्या 'ज्ञानप्रकाशात' उपसंपादक म्हणून व मुंबईच्या 'इंदुप्रकाशात' संपादकीय विभागात काम केले. डिसेंबर २८, १९२८ रोजी आजगावकरांनी व रामकृष्ण विठ्ठल मतकरी यांनी 'सुदर्शन' नावाचे साप्ताहिक सुरू केले. आजगावकरांनी 'ज्ञानांजन' नावाचे मासिकही चालवले. अच्युतराव कोल्हटकरांचे ’संदेश’ हे पत्र, तसेच ’सुधाकर’ व ’रणगर्जना’ या पत्रांचे अप्रकट संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.

पत्रकारितेखेरीज आजगावकरांनी साहित्यनिर्मितीही केली. १९०१ साली त्यांनी 'कवनकुतूहल' नावाचे दीर्घकाव्य रचले. 'प्रणयविकसन' व 'प्रणयानंद' अशी दोन नाटकेही त्यांनी लिहिली. परंतु ज्या कार्याकरता आजगावकरांना ओळखले जाते, अशी त्यांची साहित्यनिर्मिती म्हणजे 'महाराष्ट्र कविचरित्रमाला'. १९०८ साली पहिला खंड प्रकाशित झालेल्या या चरित्रमालेचे एकूण अकरा खंड प्रकाशित झाले. १९३९ साली 'महाराष्ट्र संत कवयित्री' हा चरित्रपर ग्रंथही त्यांनी लिहिला. संत कवींची चरित्रे लिहिताना आजगावकरांनी परिश्रमपूर्वक माहिती गोळा केली. ज्ञानेश्वर-तुकारामांबरोबरच हरी नारायण, लिंगनाथ योगी, चिदंबरदास राजाराम, रघुपती महाजन, गणपतराव साधू, ठाकुरदास बावा, दादा नाईक भिडे, नगाजी महाराज, पांडुरंग दाढी, नाथभुजंग यांसारख्या सर्वस्वी अप्रसिद्ध व उपे्क्षित कवींना ज.र. आजगावकरांनी प्रकाशात आणले. संतचरित्रकार महिपतीनंतर प्राचीन कवींची चरित्रे एवढ्या परिश्रमाने व एवढ्या मोठ्या संख्येने लिहिणारे लेखक म्हणून आजगावकरांचे नाव महत्त्वाचे आहे.

ऑगस्ट २७, १९५५ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

ज.र. आजगावकरांची ग्रंथरचना

[संपादन]
  • इसापनीती (१९११-१२)
  • कवनकुतूहल (काव्य, १९०१)
  • चिमुकल्या गोष्टी (बालसाहित्य, १९१३)
  • नित्यपाठ भजनमाला (१९१९)
  • प्रणयविकसन (नाटक, १९१०)
  • प्रणयानंद (नाटक, १९१०)
  • भरतपूरचा वेढा (१९०४, १९१९)
  • भूतविद्येचे चमत्कार (१९१८)
  • महाराष्ट्र कविचरित्रमाला : पहिला खंड, (१९०८); ३००० पृष्ठांच्या एकूण अकरा खंडांत प्रसिद्ध-अप्रसिद्ध अशा शे-सव्वाशे जुन्या मराठी कवींची चरित्रे या मालेतून प्रसिद्ध झाली आहेत.
  • महाराष्ट्र संत कवयित्री (१९३९)
  • वीरशैव संगीत भजन (१९१०)
  • श्रीहरिभजनामृत (१९१६)