Jump to content

दत्ताराम मारुती मिरासदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द. मा. मिरासदार या पानावरून पुनर्निर्देशित)
दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार
Mirasdar candid photo
जन्म १४ एप्रिल, १९२७
अकलूज
मृत्यू २ ऑक्टोबर, २०२१ (वय ९४)
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटक, साहित्य
वडील मारुती मिरासदार
पुरस्कार साहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

दत्ताराम मारुती मिरासदार (१४ एप्रिल, १९२७ - २ ऑक्टोबर २०२१)[] (रूढ नाव द. मा. मिरासदार) हे मराठीतले साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारीता केल्यानंतर त्यांनी इ.स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. इ.स. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी १९६२ सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने करीत असत. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची उत्तम करमणूक केली होती. कथाकथनाचे तीनहजारांहून अधिक कार्यक्रम केल्याने या त्रयीच्या कार्यक्रमात परिपक्वता जाणवत असे. द. मा. मिरासदार ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे. मिरासदारांच्या कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरही कलकत्ता, इंदूर, हैदराबादसारख्या शहरांतून कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे त्यांनी कॅनडा-अमेरिकेतल्या २३ गावांतून २५ कार्यक्रम करायचा विक्रमही केला होता. कथाकथनाखेरीज त्यांची विनोदी भाषणेही गाजत असत. द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम वाईच्या वसंत व्याख्यानमालेत आणि वाई प्राज्ञपाठशाळेच्या सरस्वती उत्सवामध्ये अनेकदा झाले आहेत.

मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी वढवली होती. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तथापि त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिस्किल कथा लिहिण्याकडेच आहे.

पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या द.मा. मिरासदारांनी 'भुताची गोष्ट' ऐकवली. ही गोष्ट दीड तासाहून अधिक काळ रंगली होती. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. आवाजातला नाट्यमय चढउतार, छोट्या छोट्या प्रसंगांतून आणि संवादातून कथा फुलवत नेण्याची त्यांची करामत, अस्सल गावरान पात्रे श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभी करण्याची त्यांची क्षमता ८३ व्या वर्षीही अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.

एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून गुरुकिल्ली हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. त्यांच्यानंतर ‘द.मा. मिरासदार प्रतिष्ठान’ ही संस्था कार्यरत आहे.

साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अंगतपंगतलेख संग्रहसुयोग प्रकाशन
खडे आणि ओरखडेलेख संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन
गप्पांगणलेख संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन१९८५
गप्पा गोष्टीकथा संग्रहरसिक आंतरभारती
गंमतगोष्टीकथा संग्रहसुपर्ण प्रकाशन
गाणारा मुलुखबाल-नाटिकाकॉंटिनेन्टल प्रकाशन१९६९
गुदगुल्याकथा संग्रहसुपर्ण प्रकाशन
गोष्टीच गोष्टीलेख संग्रहमनोरमा प्रकाशन
चकाट्याकथा संग्रहरसिक आंतरभारती
चुटक्यांच्या गोष्टीकथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन
जावईबापूंच्या गोष्टीबालसाहित्यसुपर्ण प्रकाशन१९८०
ताजवाकथा संग्रह
नावेतील तीन प्रवासीभाषांतरित कादंबरीकॉंटिनेन्टल प्रकाशन
फुकटकथा संग्रहदिलिपराज प्रकाशन
बेंडबाजाकथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन
भुताचा जन्मविनोदी कथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन
भोकरवाडीच्या गोष्टीकथा संग्रह१९८३
भोकरवाडीतील रसवंतीगृहकथा संग्रहमेहता प्रकाशन१९५७
माकडमेवालेख संग्रहसुपर्ण प्रकाशन
माझ्या बापाची पेंडविनोदी कथा संग्रहमौज प्रकाशन
मिरासदारीकथासंग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन१९६६
मी लाडाची मैना तुमचीवगनाट्यसुपर्ण प्रकाशन१९७०
विरंगुळा१९६१
सरमिसळललित लेखसंग्रह]कॉंटिनेन्टल प्रकाशन१९८१
सुट्टी आणि इतर पाच एकांकिकाएकांकिका संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन१९६८
स्पर्श१९६२
हसणावळकथा संग्रहसुपर्ण प्रकाशन१९७५
हुबेहूबविनोदी कथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन१९६०

गौरव

[संपादन]


निधन

[संपादन]

वृद्धापकाळाने मिरसदारांचे पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले.[]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. 1 2 "DM Mirasdar passes away: ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने निधन". महाराष्ट्र टाइम्स. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.