रुस्तुम अचलखांब
रुस्तुम अचलखांब |
---|
प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब (१९४४ - २५ ऑक्टोबर, २०१७) हे एक मराठी लेखक व नाटककार होते. जालना जिल्ह्यातील मानेगाव हे त्यांचे मूळ गाव आहे.
अचलखांब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख होते.
लोकनाट्य, तमाशा यांवरील संशोधन
[संपादन]डॉ. अचलखांब यांनी लोकनाट्य, तमाशा आणि लोककला या विषयात विद्यावाचस्पती ह पदवी मिळवली. त्यांनी मराठी मुलखातील शाहिरीची परंपरा अभ्यासून त्यातील जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या पण मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींवर संशोधन केले आणि तमाशा कलावंतांच्या मुलाखती घेऊन, तमाशातील माणसे आणि त्यांचे जगणे यावर संशोधनपूर्ण लेखन केले. भाऊ फक्कड, शिवा-संभा, भाऊ-बापू आणि पवळाबाई यांनी शाहिरीची परंपरा समृद्ध केली असे प्रतिपादन करणाऱ्यांत अचलखांब मराठवाड्यातील प्रमुख संशोधक होते. लोककलावंतांकडील होणाऱ्या दुर्लक्षाकडे अचलखांब यांनी लक्ष वेधले व त्यांच्यातील सांस्कृतिक प्रगल्भताही दाखवून दिली.
दुर्लक्षित कलाकरांना शोधणे, ते म्हणत असणारे काव्य, त्याच्या चाली याच्या नोंदी करून घेणे, त्या चाली आणि ती कला जशास तशी मध्यमवर्गीय माणसापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी संगीत मनमोहन नावाचा प्रयोग केला. सुयोग्य कलावंत जमा करून त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये 'मनमोहन'चे मेहनतपूर्वक सादरीकरण केले.[ दुजोरा हवा]
मराठी नाट्यसृष्टीतील कामगिरी
[संपादन]अचलखांब यांनी साहित्य आणि नाट्यक्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग लक्षणीय आहेत. त्यांनी संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, गाढवाचं लग्न, राजाचा खेळ यांसह ७० नाटकांचे दिग्दर्शन केले. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या तृतीयरत्न या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन आणि सादरीकरण केले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग डॉ. अचलखांब यांनी २८ नोव्हेंबर १९८९ रोजी केला. त्यांनी 'गाढवाचे लग्न' या लोकनाट्याचे १५० प्रयोग केले. ते लोकनाट्यातून सावळा कुंभार ही भूमिका करायचे. 'एकच प्याला'चेही त्यांनी अनेक प्रयोग केले होते.
शिवरायांचा आठवावा प्रताप या नाटकातून अचलखांब यांनी गोंधळ, भारूड या माध्यमातून शिवाजी महाराज समजावून सांगितले होते.
आत्मकथन
[संपादन]त्यांच्या गावकी या आत्मकथनामध्ये त्यांच्या बालपणाचे व शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांचे तसेच जालना जिल्ह्यातील सामाजिक व्यवस्थेचेही वर्णन आहे. या पुस्तकावर जालना जिल्ह्यातील बोलीभाषेचा प्रभाव आहे.
पुस्तके
[संपादन]- अभिनयशास्त्र
- गावकी (प्रथम आवृत्ती १९८३)
- तमाशा लोकरंगभूमी
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- २००९ मध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.