Jump to content

तृतीय रत्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तृतीयरत्न या पानावरून पुनर्निर्देशित)

" तृतीय रत्न " हे महात्मा फुले लिखित नाटक आहे. विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। हे सारे अनर्थ एका अविद्येने केले।। हे अनर्थ दूर करण्यासाठी जोतिराव फुल्यांनी व्रत घेतले शूद्रातिशूद्रांना शिक्षण देण्याचे! ‘शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे’, या सिद्धांतावर जोतीरावांचा पूर्ण विश्वास होता. त्याचबरोबर दलाली आणि मक्तेदारीविरुद्ध बंडखोरी ही त्यांची निष्ठा होती. या कार्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपली वाणी, लेखणी वापरली. प्रत्यक्ष कृतीमधून समाजाला प्रेरणा दिली. मानव्याची आच निर्माण करण्यासाठी माणूस प्रथम जागा केला पाहिजे, या जाणिवेने फुल्यांनी साहित्य निर्माण केले. त्या साहित्य प्रकारात त्यांनी नाटक हा प्रकारसुद्धा वापरला. त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे नाव ‘तृतीय रत्न’!

पार्श्वभूमी

[संपादन]

तृतीय रत्न या नाटकाचा सारा इतिहासच मुळी नाट्यपूर्ण आहे. पण हे नाटक प्रत्यक्ष लिहिण्यापूर्वी जोतिबा फुल्यांची जडणघडण कशी होत होती हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. १८४१ ते ४७ या काळात जोतिबांचे माध्यमिक शिक्षण इंग्रजी मिशनरी शाळेत झाले होते. १८४७ साली टॉमस पेनच्या ‘राइट्स ऑफ मॅन’ या क्रांतिकारक ग्रंथाचे त्यांचे वाचन झाले होते. १८५४ मध्ये त्यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली होती. थोडक्यात जोतिबा फुल्यांची कार्याची दिशा अस्पष्टशी का होईना तयार झाली होती. १८४८ मध्ये त्यांनी शूद्रातिशूद्र मुलींसाठी शाळा काढली. तेव्हा जोतिबांचे वय अवघे २१ वर्षांचे होते आणि वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी नाटक लिहिले ‘तृतीय रत्न’. त्यावेळी त्यांच्या स्वतंत्र विचारांची सिद्धता झाली होती आणि नाटक या माध्यमामधून आपले विचार समाजासमोर मांडू शकू याची खात्रीही त्यांना वाटत होती. तृतीय रत्न नाटक लिहिण्याचा आपला हेतू जोतिबांनीच एके ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेला आहे. जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून सन १८५५ सालात दक्षिणा प्राइझ कमिटीला अर्पण केले.[]

नाटकाचे खेळ

[संपादन]

तृतीय रत्न या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी आजतरी काहीही ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र मधे १२५ वर्षांचा दीर्घकाळ लोटल्यानंतर इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह तृतीय रत्न हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर तृतीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. प्रारंभी ‘त्रितीय’ असा शब्द होता, असेही दिसते. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ १८४३ साली विष्णूदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि ते गो. म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई. पण तृतीय रत्न (तृतीय नेत्र) या १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे ते पहिले लिखित मराठी नाटक आहे, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत, असे दिसते.

'तृतीय रत्न’ नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे. हे नाटक ग्रामीण जोडप्याची कहाणी सांगते. एक शेतकरी आणि त्याची गर्भवती पत्नी स्थानिक ब्राह्मण पुजाऱ्याच्या धार्मिक फसवणूकीला बळी पडतात. पुजारी, त्याची पत्नी आणि त्याच्या नातेवाईकांच्या फसवणूकीचा सामना अत्यंत काळजीपूर्वक केला गेला आहे. नाटकातील विदूषकाच्या टिप्पण्याही तीव्र आहेत. या नाटकाचा निष्कर्ष असा आहे की अशिक्षित आणि मागासवर्गीय ग्रामस्थांकडे शोषणापासून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे - शिक्षण. नाटकाच्या शेवटी, शेतकरी आणि त्याची पत्नी फुले दाम्पत्याच्या रात्रीच्या शाळेत प्रवेश घेण्याचा आणि आपल्या भावी पिढीसाठी नवीन भविष्य घडविण्याचा निर्णय घेतात.

संदर्भ

[संपादन]

या नाटकावर वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स (फिल्म अँड थिएटर)चे साहाय्यक प्राध्यापक डॉ. सतीश पावडे यांनी."आद्य मराठी नाटक : तृतीय रत्न " हे पुस्तक लिहिले आहे. इच्छुक त्यांचेशी ९३७२१५०१५८/९४२२५३५१५८ या क्रमांकावर अथवा satishpawade1963@gmail.com वर संपर्क साधू शकता.

  1. ^ लोकसत्ता १३ मार्च २०१७[permanent dead link]